मुंबई: टाटांच्या एअर इंडिया, विमान निर्मात्या कंपनी बोईंग आणि एअरबस यांच्यातील ताज्या करारानुसार भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे २ लाख नोकर्या निर्माण होतील, असे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या करारानुसार, सध्या टाटा कंपनी १४० विमानांचा ताफा असलेली एअर इंडिया बोईंग आणि एअरबसकडून ४७० विमाने खरेदी करणार आहे.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की या करारामुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होईल कारण एअरलाइनला ऑपरेशनल कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. या नोकऱ्यांमध्ये पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक आणि गैर-तांत्रिक कर्मचारी तसेच विमानतळ कर्मचारी, हवाई वाहतूक नियंत्रक, वाहतूक विक्रेते, सेवा प्रदाते इत्यादी पदांसाठी संधी निर्माण होणार आहे.
एअर इंडियाचे माजी कार्यकारी संचालक जितेंद्र भार्गव म्हणाले, “एअर इंडियाला अनुभवी वैमानिक, केबिन क्रू मेंबर्स, मेंटेनन्स इंजिनिअर्स, ग्राउंड क्रू इत्यादींची गरज भासेल. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कराराचा अर्थ असा आहे की आता विमाने अशा ठिकाणी पोहोचतील जी अद्याप हवाई मार्गाने जोडलेली नाहीत. यामुळे त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांना तसेच पर्यटनाला चालना मिळेल.”
केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही नोकऱ्या निर्माण होतील. एअर इंडियाने कराराची घोषणा केल्यानंतर लगेचच, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी याचे ऐतिहासिक निर्णय म्हणून स्वागत केले. तसेच या भागीदारीमुळे यूएसमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होतील असे सांगितले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या कराराचे स्वागत केले कारण हा करार त्यांच्या देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.