मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी साचण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने मंजुरीही दिली होती. मात्र केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्यांची प्रतिक्षा मुंबई महापालिका प्रशासनाला असल्याने माहुल पम्पिंग स्टेशनचे काम अद्याप पूर्णत्वास येऊ शकले नाही. त्यामुळे गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर येथील सिंधी सोसायटी व कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यातही पाणी तुंबण्याच्या घटनेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
माहुल येथे पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने हिरवा कंदील दिला आहे. मात्र पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण व सीआरझेड विभागाची परवानगी मिळण्यास तीन ते चार महिन्यांचा वेळ लागणार आहे. गांधी मार्केट, चेंबूर सिंधी सोसायटी, नेहरू नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक परिसर दरवर्षी पावसाळ्यात जलमय होतो. यावर उपाय म्हणून माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने मंजुरी दिली. मिठागरच्या जागेच्या मोबदल्यात मुंबई महापालिका केंद्र सरकारला ११८ कोटी रुपये मोजणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रखडलेल्या माहुल पम्पिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असले, तरी केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्यांची प्रतिक्षा मुंबई महापालिका प्रशासनाला आहे. त्यामुळे गांधी मार्केट, कुर्ला नेहरू नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यात तरी पाणी साचण्याच्या समस्येपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.