मुंबई: श्रमिक मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र आदी आदिवासी मंच यांच्या माध्यमातून वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला.
मुंबईतील पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. असे असताना विविध प्रकल्पासाठी त्यांच्या शेत जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. त्यांची घरे झोपडपट्टी घोषित करून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेताना आवश्यक ती प्रमाणपत्रे त्यांच्याकडे नसतात. ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने हे आदिवासी हैराण झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आदिवासीं बांधवांनी हा मोर्चा काढला.