Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीआंगणेवाडीची श्री भराडी देवी

आंगणेवाडीची श्री भराडी देवी

आज ४ फेब्रुवारी आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त…

कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा (होळी), गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवासाठी तो आपली हजेरी कोकणात आवर्जून लावीत असतो. या सण-उत्सवाप्रमाणे कोकणातील, गावोगावच्या यात्रांनाही तो आपली उपस्थिती लावीत असतो.

कोकणातील मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी आदी यात्राही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मालवण तालुक्यापासून १५ किमीवर मसुरे गाव असून त्यातील आंगणे. आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे. त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर (माळरानावर) असल्यामुळे तसेच देवालयांचे माहेरघर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी देवालय. मसुरे-आंगणेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे, तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती सातासमुद्रापार पोहोचली आहे, ती आई भराडी देवीमुळेच. भक्तांच्या हाकेला ओ देऊन संकटाला धावून जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावच पावन केले आहे.

या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्री देवी तांदळाच्या वड्यातून भरड माळावर प्रकटली असेही सांगितले जाते. ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणूनच आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी येथे पूजा-अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं. श्रीभराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे. ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात. या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते. याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते. त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष, चिमाजी अप्पांच्या सेवेत होता. अटकेपार झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, असा इतिहास सांगितला जातो. या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली. या वीर पुरुषाला दृष्टांत झाला. त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली. तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्याचा अभिषेक करताना गाय दिसली. या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली. गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची, त्या जागी सजीव पाषाण सापडले. त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या देवीचा महिमा अगाध आहे. दक्षिण कोकणची ‘प्रति भवानी’ असाच भराडी देवीचा महिमा आहे. तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत, भक्तिभावाने इतका चिंब झालेला आहे की, सारे पाहिले म्हणजे आई भराडी देवी भक्तजणांच्या नवसाला पावणारी, तर आहेच पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने, कधीकाळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल म्हणूनच तुळजापूरची भवानी स्वत्वरूपाने आंगणेवाडीच्या या भरडमाळावर अवतरली असणार, असे वाटल्याशिवाय राहात नाही. भराडी आईचा साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे या पुण्यभूमीने बोललेल्या नवसाची फेड असावी, असे वाटू लागते म्हणूनच या भराडी देवीला ‘देवी माझी नवसाची’ असे बोलले जाते.

२५ वर्षांपूर्वीही जत्रा काही हजारांत होत होती. मात्र वर्षागणिक भक्ताच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे दहा लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते. आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथे पाषाणमूर्ती असून तिची नियमितपणे पूजाअर्चा केली जाते. दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते.

कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, होमगार्डसचे जवान तैनात असतात. राज्यातील मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेतील नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रीभराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधा येथील राजकीय पक्ष देत असतात. जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवितात.

या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय. हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल, त्याच दिवशी होतो. विविध देव-देवतांच्या यात्रा-जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात; परंतु भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की, देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो.
देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळ-मांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात.

देवीचा कौल घेऊन शिकारीस जाण्यात येते. ही पारध करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात. सात ते आठ जणांचे गट करून रान काढले जाते व डुकराचीच शिकार केली जाते. ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत-गाजत देवळाजवळ आणला जातो. सुवासिनींकडून पारध करणाऱ्यांना ओवाळले जाते व डुकराची पूजा होते. मंदिराच्या उजव्या बाजूस ‘पातोळी’ असून या ठिकाणी डुक्कर कापले जाते व कोष्टी प्रसाद म्हणून दिले जाते. शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो. धार्मिकविधी झाल्यानंतर देवीपुढे पंचांग ठेवले जाते व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो. देवीने कौल देताच जत्रेची तारिख निश्चित होते. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटांत गाड्यांचे बुकिंग केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा ही यात्रा ४ फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित झालेले आहे. आंगणेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येथे येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.

यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौनव्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जात दाम्पत्यांकडून तो नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो. यात्रोत्सवात पूर्वी एकाच वेळी प्रसाद वाटप करणे शक्य होत नव्हते. यामुळे हा प्रसाद उडवला जात होता. त्यामुळे काहीजणांना तो मिळत नव्हता शिवाय तो पायाखालीही येत होता. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली. येणाऱ्या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ५ वर्षांपासून बदललेल्या प्रसाद वाटपाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अशाच प्रकारे यात्रेची तारीख ठरविण्यापूर्वी केली जाणारी शिकारीची प्रथा बंद व्हावी, अशी अपेक्षाही भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.

मालवणमधील भराडीदेवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे दहा लाख भाविक येत असतात. कोरोना संकटामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने गेली दोन वर्षे यात्रा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने सर्व सणांवरील निर्बंध उठविल्यामुळे यंदाच्या या भराडीदेवीच्या यात्रेला भाविकांचा उत्साह प्रचंड द्विगुणित झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून यावेळी सुमारे २५ लाख भाविक भराडीदेवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध आगरांमधून तसेच प्रमुख रेल्वे स्थानकामधूनही आंगणेवाडीला एसटी बसेस सोडल्या आहेत. १४५ बसेसची व्यवस्था ठेवली असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. देशमुख यांनी दिली आहे. देशमुख म्हणाले, ४ फेब्रुवारीच्या आंगणेवडीची जत्रेसाठी ५ फेब्रुवारीपर्यंत एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने शुक्रवारपासूनच बससेवा सुरू होत असून कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकातूनही प्रवासी उपलब्धतेप्रमाणे थेट आंगणेवाडीसाठी एसटी बसेस सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

-राजेंद्र साळसकर
rajendrasalaskar1@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -