जळगाव जिल्हयात यंदाही कापसाची विक्रमी पेरणी ! 

  126

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वात जास्त ५ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवडीचा जिल्हा जळगावच राहणार आहे. दरम्यान, आज पावसाने उघडीप दिली असल्याने पाच दिवसानंतर सूर्य दर्शन झाले. याचा पिकांना लाभ होईल. शेतक-यांसाठी बफर्स स्टॉकमधून युरिया व डीएपी ही खते वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषि विभागाला दिले असल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी दिली.


जळगाव जिल्हयाचे लागवडी लायक क्षेत्र ८ लाख ४८ हजार ३०० हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६६ हजार ९२८ हेक्टर आहे. गेल्या खरीप हंगामात जिल्हयात ५ लाख ३७ हजार ३३७ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन यंदा ५ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत आहे. त्यामुळे यंदादेखील राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड जिल्हा म्हणजे जळगावचा समावेश होईल, असा दावा केला जात आहे.


कापसाच्या वाढत्या लागवडीमुळे जिल्हयात यंदा ज्वारी, बाजरी, मका व अन्य तृणधान्य यांच्या खरीप क्षेत्रात देखील २५ टक्के घट झालेली आहे, त्याचबरोबर कडधान्य पेरणीत देखील २४ टक्के घट आहे. चाळीस वर्षापूर्वी जळगाव जिल्हयात सर्वात जास्त तेलबियांची लागवड होत असे. आज तेलबियांचे क्षेत्र नगण्य झाले असून आज जिल्हयातील शेतकरी नगदी पिक असलेल्या कापूस लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड ही जळगाव जिल्हयात झाली आहे. आज जिल्हयात कापसावर प्रक्रीया करणा-या ११० वर जिनिंग प्रेस असून त्यांची ८०० कोटींची उलाढाल आहे. जिल्हयाचे कापसाचे संपूर्ण अर्थकारण तीन हजार कोटींचे असण्याचे सांगण्यात येते. मध्यंतरीच्या काळात जिल्हयात साखर कारखानदारीमुळे उसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र जिल्हयातील साखर कारखाने बंद पडल्याने उसाचे क्षेत्रदेखील मोठया प्रमाणावर घटले आहे.


जिल्हयात पाच लाख ५० हजार हेक्टरमध्ये होणारी कापूस लागवड लक्षात घेता २७ लाख ५० हजार बियाणे पाकीटांची मागणी राहील, असा अंदाज होता. आतापर्यंत २५ लाख बियाणे पाकीटांची विक्री झाली आहे. खतांचा तुटवडा भासू नये म्हणून काळजी घेतली जात असून आज एक लाख ४८ हजार मे. टन खते उपलब्ध झाले आहेत. पेरणी झाल्यानंतर खतांची गरज भासणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरूवारी कृषि विभागाला बफर्स स्टॉकमधून ५३०० मे.टन युरिया वाटपाचे तसेच ६०० मे. टन डीएपी खते वितरीत करण्याचे आदेश दिले. कृषीविभागाने एक ब्लॉग केला असून त्यावर प्रत्येक तालुक्यात असलेले किरकोळ खतविक्रेते त्यांचाकडे उपलब्ध असलेला खतांचा स्टॉक एका क्लीकवर शेतक-यांना पाहता येतो. या अद्ययावत माहितीचा शेतक-यांना लाभ होत असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी बोलतांना सांगितले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची