मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही दोन महत्त्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. सीएसएमटी स्थानकातून दररोज सुमारे ९० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यात येतात. १०,११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १३ डब्यांच्या तर १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १७ डब्यांच्या गाड्या धावतात. तर १४ ते १८ क्रमांकावरून २४ डब्यांच्या मेल-एक्सप्रेस धावतात. १० ते १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्याकरिता या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार प्लॅटफॉर्मवरून रोज १० गाड्यांच्या फेऱ्या होऊ शकतील. एका डब्यातील आसनक्षमता ७० धरली तरी रोज ४९०० प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. तसेच वेटिंग लिस्ट कमी होईल. प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसूलात देखील वाढ होणार आहे. या चार प्लॅटफॉर्मटचा विस्तार करण्याचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. हे काम नुकतेच सुरू केले आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
दिवसेंदिवस मुंबईत वाढणारी गर्दी आणि प्रवासी संख्या पाहता २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील लांब पल्याच्या चार प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते १३ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. यामुळे दररोज सुमारे ५ हजार जादा प्रवासी प्रवास करू शकतील.