सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ३ जानेवारी २०२२च्या अंकात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचा थोडक्यात मी समाचार घेतो. या संपादकांसारखा मी मोकळा नाही. या अग्रलेखात त्यांनी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये प्रत्येक निवडणुकीत खून, अपहरण, दहशतवाद होतो, असे सांगून कोकणाची तसेच सिंधुदुर्गातील जनतेची बदनामी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ‘जे घडले ते रक्तरंजित, हा इतिहास एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो,’ असे लिहून हयात नसलेल्या काही व्यक्तींची नावे लिहून या सर्वांच्या हत्या एकाच व्यक्तीने केल्या, असे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत नव्हते. शिवसेनेचे चांगले दिवस आले तेव्हा ‘सामना’ वृत्तपत्र सुरू झाले त्यावेळी ते शिवसैनिक झाले. आज ते जशी आमच्यावर टीका करताहेत तशी टीका ‘लोकप्रभा’मध्ये असताना शिवसेनेवर करत होते, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे माहीत नाही. कोकणात हत्या झाली त्यांची यादी छापली, त्या घटना मी शिवसेनेत असताना म्हणजे २००५ पूर्वीच्या आहेत. एखादी अपवादात्मक २००५ नंतरची असू शकते. म्हणजे कोकणात दहशत, खून, अपहरण, हे सर्व शिवसेनेमुळे, असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का?
शिवसेनेच्या जन्मापासून लाखो तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिक झाले. शिवसैनिक म्हणून सोपवलेली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडली. म्हणूनच आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहेत. त्यातील एक संजय राऊत! एका वृत्तपत्राचा संपादक असून पत्रकारितेचे पावित्र्य न राखता, ज्या शब्दांचा वापर करताहेत, ते पाहता त्यांची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतरचे माझे एक वाक्य त्यांना चांगलेच झोंबले. ‘जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली, आता महाराष्ट्राकडे पाऊल’. ही भाषा बोलण्याचा अधिकार मला आहे. शिवसेनेत असतानाही काँग्रेसचे सरकार पाडण्याचे धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी तेव्हा केले होते. त्यामुळे मी काय करू शकतो, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. संजयजी, माझे गुरू बाळासाहेब ठाकरे आहेत. मला राजकारण शिकवू नये. शिवसेनेचा इतिहास सांगू नये. शिवसेनेचा इतिहास घडत असताना त्या इतिहासात मीही होतो. तुम्ही तेव्हा कुठे होतात?
आजची महाराष्ट्रातील शिवसेनेची सत्ता ही जनतेने मिळवून दिलेली सत्ता नाही. भाजपसोबतच्या युतीचा तुम्हाला फायदा झाला आहे. जे आमदार-खासदार निवडून आले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. त्यांचे फोटो लावून आणि त्यांची भाषणे लोकांना ऐकवून जिंकलात. भाजपशी बेईमानी करून, गद्दारी करून. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला कायम दूर ठेवले तसेच मराठी माणूस आणि हिंदुत्व यासाठी आयुष्य घालवले, तेव्हाचा तो इतिहास आठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. आपण कोण आहोत? समाजातील आपले स्थान काय? आपली ओळख काय आहे? याचे आत्मपरीक्षण करा आणि त्यानंतर मोदींवर टीका करण्याचे धाडस करा. सात वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव मोठे केले. नावलौकिक मिळवला. आपले पंतप्रधान रोज १८-१८ तास काम करतात. जनहितासाठी, आत्मनिर्भर भारतासाठी, भारत महासत्ता बनण्यासाठी मोदी हे दिवस-रात्र काम करत असताना राऊतांची लेखणी आणि तोंड त्यांच्यावर टीका करायला धजते, यातच त्यांची बुद्धिमत्ता आणि लेखणी काय दर्जाची आहे, हे स्पष्ट होते.
संजय राऊत, जरा आपल्या पायाखाली काय जळतंय तेही नीट बघा. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. दीड लाखांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रातील आहेत. त्याचे काहीच वाटत नाही का? राज्यात आरोग्य व्यवस्था व वैद्यकीय उपचार वेळेवर, पुरेसे व दर्जेदार देण्यास ठाकरे सरकार पूर्ण अपयशी ठरले. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही ठाकरे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या घटनेत ठाकरे सरकारची देशपातळीवर नालस्ती झाली. सामूहिक बलात्कार करून दिशा सालियनची हत्या झाली. पूजा चव्हाणच्या मृत्यूमध्ये एका मंत्र्यांचे नाव गुंतले होते, त्याला राजीनामा देणे भाग पडले. सरकार यशस्वीपणे चालवायचे असेल, तर बुद्धिमत्ता, चातुर्य आणि प्रशासनावर खंबीर अंकुश असावा लागतो. यापैकी काहीच या सरकारकडे नाही.
राज्यातील सत्ता ही शिवसैनिकांची नाही. मातोश्री आणि निवडक पाच नेते सोडले, तर सत्तेचा लाभ कुणाला नाही. सत्ता मिळाल्यानंतर सर्वसामान्य आणि निष्ठावान शिवसैनिकाच्या जीवनात कुठलाही बदल झालेला नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांची साधी भेटही मिळत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला या सत्तेने काय दिले? शेतकरी, मजूर, कामगार, उद्योजकांची आजची स्थिती हलाखीची आणि गंभीर आहे. मात्र, दुसऱ्यांवर टीका करून आम्ही फार मोठे कार्य करत आहोत, असे दाखवता; परंतु पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी कधीही कॅबिनेट चुकवली नाही. अधिवेशन काळात संसदेत गेले नाहीत, असे झाले नाही. दररोज आपल्या कार्यालयात जातात. मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचे ‘सीएम’ किती वेळा कॅबिनेटला गेले? विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळा उपस्थित राहिले. जनतेच्या प्रश्नांची कधी दखल घेतली, हे सांगा हो संजय जी.
तेव्हा गद्दारीने मिळवलेले पद हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी शिवसैनिकांसाठी, ज्यांनी शिवसेनेसाठी बलिदान केले, आपले संसार पणाला लावले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी नाही. त्यामुळे तोंड बंद ठेऊन जे गिळताय, ते गिळण्यात सातत्य ठेवा.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारातून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने एका बाचाबाचीच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांना अडकवण्याचे कुभांड रचले. त्यासाठी पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करून घेतला. सिंधुदुर्गातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे भासवताना राज्य पातळीवरील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना कणकवलीत आणून बसवण्यात आले. मात्र सत्तेचा गैरवापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने शिवसेना आणि त्यांच्या आघाडीतील मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवून दिली. १९ पैकी ११ जागा जिंकताना भाजपप्रणीत आघाडीने मोठे यश मिळवले. विरोधकांना हा विजय निसटता वाटत असला तरी राणेंना बँकेच्या निवडणुकीत रोखता न आल्याचे शल्य त्यांना बोचते आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…