Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरतारापूर औद्योगिक वसाहत समस्यांच्या विळख्यात

तारापूर औद्योगिक वसाहत समस्यांच्या विळख्यात

बोईसर (वार्ताहर) : औद्योगिक विकास महामंडळाचे तारापूर एमआयडीसीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील अनेक गावे विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असूनही तारापूर औद्योगिक वसाहतीची वाताहत होत चालली आहे.

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये समस्यांचा महापूर आल्यामुळे कामगार व गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामोरो जावे लागत आहे. या अडचणी व समस्या डोळ्यांनी दिसत असल्या तरी औद्योगिक विकास महामंडळ याकडे डोळेझाकपणा करत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे वसाहतीत मूलभूत सुविधा नसल्यावरून दिसून येत आहे.

औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या मान, बेटेगाव, सरावली, कुंभवली, कोलवडे, सालवड, पास्थल, आणि बोईसर या ग्रामपंचायतीत कारखानदारांनी आपले कारखाने थाटून विस्तार केला असला तरी अनेक मूलभूत सुविधा न पुरवल्या गेल्याने हजारो कारखानदारांच्या मालकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. हजारो कारखाने असलेल्या या वसाहतीमधून कारखानदारांना मार्फत कोट्यावधीचे महसूल शासन दरबारी येत असले तरी करदात्यांना हवी तशी सुविधा पुरवली जात नाही, अशी खंत येथे व्यक्त होत आहे. वसाहतीसह अनेक गावांमध्ये रस्ते, गटारे, दिवाबत्ती, डेब्रिज, वाढत्या झोपड्या, पाण्याची गळती, ड्रेनेजची समस्या, तसेच मोकळ्या जागेत कारखान्याचे अतिक्रमण आदी प्रकारांमुळे एमआयडीसीला समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

प्रकल्पग्रस्तांनी या एमआयडीसीला शेकडो एकर जमिनी कसित असलेल्या शेतजमिनी दिल्या. एमआयडीसीने मोठमोठ्या टोलेगंज इमारती उभारण्यासाठी मातीमोल भावाने विकत घेतल्या. वसाहती उभ्या राहात असताना येथील भूमिपुत्रांना नोकर भरतीची मोठी आमिषे दिली गेली, मात्र सद्यस्थितीत भूमिपुत्रांना येथे नोकऱ्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या वेळेला आश्वासने दिली व आता भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेली आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांमधूनही संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९६० ते १९७० च्या कालावधीत येथील स्थानिकांकडून कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या. त्यामुळे औद्योगिक वसाहत उभी राहिली असली तरी त्याचा कणभरही फायदा स्थानिकांना झालेला नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रदूषण कामगार सुरक्षा अशा अनेक प्रश्नांमुळेही वसाहत दरदिवशी चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी मूलभूत सुविधा घेऊन अनेक मागण्यांची निवेदने औद्योगिक कार्यालयात दिलेली आहेत. त्यानंतरही त्यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही.

आजही बोईसर औद्योगिक वसाहतीत नियोजनशून्य कारभार पाहावयास मिळतो. रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांच्या साईड पट्ट्या नाहीत, रस्त्याच्या बाजूला पाणी निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था नाही, कारखानदार आपला कचरा थेट उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी टाकत आहेत. काही औद्योगिक परिसरात तर अग्निशमन दलाची गाडी किंवा बंब जाण्यासाठीही रस्ता नाही. त्यामुळे सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. एखाद्या ठिकाणी गंभीर अपघात किंवा घटना घडली तर त्या ठिकाणी अग्निशमन प्रशासनासह पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औद्योगिक वसाहतींसह औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे कार्यालयही बोईसर परिसरात नाही. त्यामुळे इतर ठिकाणांहून कारभार हाकताना किंवा एखादी घटना घडताना या अधिकाऱ्यांना येण्यास बराच वेळ होतो. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहत भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची कामगिरी बजावत असली तरी या वसाहतीमध्ये अनेक समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस उभा राहत आहे. त्यामुळे या समस्यांचा त्रास कामगारांसह स्थानिक नागरिक व शेतकरीवर्गाला सोसावा लागत आहे.

डेब्रिजचे डोंगर

एमआयडीसीतील अनेक रस्त्यांच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडांवर कचरा तसेच बांधकाम साहित्याचे डेब्रिज टाकले जाते. ते उचलले जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग आहेत. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील डीसी कंपनीच्या बाजूला, सालवड ग्रामपंचायत हद्दीतील आरती ड्रग कंपनीच्या गेट समोर, एकलारे रोड याठिकाणी ही समस्या गंभीर आहे.

रस्त्यावर चिखल आणि सांडपाणी

करमतारा कंपनीकडून कॅमालिन नाक्याकडे जाणाऱ्या वळणावरील वाहतुकीच्या रस्त्यावर गटारातील दूषित चिखल आणि दूषित सांडपाणी साचले होते. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांप्रमाणे प्रवाशांना तसेच चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

फेरीवाल्यांचा सुळसुळाट

तारापूर एमआयडीसीतील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू असूनही एमआयडीसीच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याची येथील नोकरवर्गाची तक्रार आहे.

खड्डेमय रस्ते मृत्यूचे सापळे

औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक नियमावली केलेली नाही. त्यामुळे दररोज औद्योगिक वसाहतींच्या रस्त्यावरून अवजड वाहने धडधडत असतात. परिणामी अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय होऊन त्यांची चाळण झालेली आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना व कामगारांना होत आहे. अनेकदा मोठे अपघातही घडलेले आहेत, तर काही घटनांमध्ये वाहनचालकांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली

बोईसर – चिल्हार रस्त्यासाठी जे भूसंपादन केले त्याचे आजतायागत प्रकल्पग्रस्तांना ना मोबदला दिला, ना साधे प्रकल्प दाखले. त्यामुळे आजही बोईसर-चिल्हार रस्ता समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. इतकेच नव्हे तर दुपदरीकरणावेळीही प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत.

वाहने पार्किंगची असुविधा

बोईसर-चिल्हार रस्ता, थुंगा हॉस्पिटल ते टाकीनाका, सत्तर बंगला, टाकी नाका ते कॅमलिन नाका, शिवाजी नगर रोड, लुपिन कंपनी परिसर आणि मुकट पंप ते गोमटे नाका, करमतारा कंपनी या एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था एमआयडीसीने केली नसल्याने वर्षाचे बाराही महिने येथे ज्वलनशील रसायनांनी भरलेले कंटेनर व एमआयडीसीत पार्किंगची समस्या आजही कायम आहे. अनधिकृत पार्किंग फोफावल्याने एमआयडीसीत पार्किंगची दैना उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -