मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाट्य कलावंतांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. चित्रपटगृहे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स ॲन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व चर्चा केली.
आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल, याबाबत योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटांमागे २५ रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नयेत, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.
मुंबईत हॉटेल्स, दुकानांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
मुंबईत दुकाने तसेच हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर मुंबई वगळता इतर शहरांतील दुकाने तसेच हॉटेल्स संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राइड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. सध्याची कोरोनाची स्थिती तसेच निर्बंध यांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक झाली.
मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. दरम्यान, सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळून शाळा, कॉलेजेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या बुधवार पासून मुंबईतील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्यासाठी परिपत्रक, एसओपी जारी केले आहेत.