Thursday, May 28, 2026

Israeli strikes hit southern Lebanon : दक्षिण लेबनॉनवर इस्रायलचा महाविनाशक हल्ला; 'टायर' शहर धुराच्या विळख्यात

Israeli strikes hit southern Lebanon : दक्षिण लेबनॉनवर इस्रायलचा महाविनाशक हल्ला; 'टायर' शहर धुराच्या विळख्यात

दक्षिण लेबनॉनमधील ( southern Lebanon) परिस्थिती चिघळली असून इस्रायली हवाई दलाने (IAF) हिजबुल्लाहच्या तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी झालेला युद्धबंदीचा करार पूर्णपणे मोडीत निघाला आहे. लेबनॉनमधील ऐतिहासिक आणि प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या 'टायर' (Tyre) शहरावर रात्रभर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. या हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये संपूर्ण शहर धूर, धूळ आणि आगीच्या ज्वालांनी वेढलेले दिसत असून अनेक टोलेजंग इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. कोसळलेल्या ढिगाऱ्यांखाली शेकडो लोक अडकल्याची भीती असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

इस्रायलचे 'extreme force' चे फर्मान

लढाईचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) अधिकृत लष्करी आदेश जारी केला आहे. इस्रायली सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'झहरानी नदी'च्या (Zahrani River) दक्षिण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना तातडीने नदी ओलांडून उत्तर दिशेला निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात इस्रायली लष्कर 'अत्यंत तीव्र बळाचा' (Extreme Force) वापर करून हिजबुल्लाहचा खात्मा करणार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाह या शिया संघटनेने एकमेकांवर युद्धबंदीच्या नियमांचे शेकडो वेळा उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

रात्रभर रस्ते आगीच्या ज्वाळांनी पेटले

लेबनॉनच्या अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने (NNA) दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास टायर शहर आणि त्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाला इस्रायली फायटर जेट्सनी लक्ष्य केले. रात्रभर झालेल्या या हल्ल्यांमुळे टायर शहराचे रस्ते नारंगी रंगाच्या आगीच्या ज्वालांनी न्हाऊन निघाले होते. सर्वत्र जळणाऱ्या गाड्या आणि धुराचे साम्राज्य पाहायला मिळत होते. गुरुवारी सकाळी दिवसा उजेडात जेव्हा एका निवासी वस्तीजवळ इस्रायलने क्षेपणास्त्र डागले, तेव्हा तिथे झालेल्या महाविस्फोटानंतर आकाशात मशरुमच्या (भूछत्राच्या) आकाराचे धुराचे अवाढव्य लोट उठले. हा थरार प्रत्यक्ष पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अंगावर काटा आला असून संपूर्ण रस्त्यांवर इमारतींचे अवशेष विखुरले गेले आहेत.

इस्रायली लष्कराकडून थेट धमक्यांचे फोन

इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी केवळ हिजबुल्लाहच्या भूमिगत तळांना आणि पायाभूत सुविधांना नष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात निवासी भागाला मोठा फटका बसला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ढिगाऱ्यांखाली दबलेल्या निष्पाप नागरिकांना बाहेर काढण्याचे कामही आता थांबले आहे. एका हिजबुल्लाह सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, बचाव आणि मदत पथकातील कर्मचाऱ्यांना थेट इस्रायली लष्कराकडून फोन येत असून त्यांना 'हा परिसर तातडीने खाली करा अन्यथा बॉम्बने उडवून देऊ' अशा धमक्या दिल्या जात आहेत. परिस्थिती अत्यंत धोकादायक बनल्याने रुग्णवाहिका चालक गल्लोगल्ली फिरून लोकांना जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचे आवाहन करत आहेत.

लेबनॉनमध्ये अभूतपूर्व विस्थापन संकट

बुधवारी रात्री लोक झोपेत असताना इस्रायलने अचानक नवीन भागांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले. यामुळे लेबनॉनमध्ये स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे मानवी विस्थापन संकट निर्माण झाले आहे. हा आदेश लेबनॉनच्या एकूण भूभागापैकी तब्बल १४ टक्के भागावर परिणाम करणारा आहे. टायर शहरातून पळून जाणाऱ्या हजारो नागरिकांनी शेजारच्या 'सिदोन' (Sidon) शहरात धाव घेतली आहे. मात्र, सिदोनच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथल्या सर्व आश्रय छावण्या आणि निवारे (Shelters) पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले असून नवीन विस्थापित लोकांसाठी तिथे तीळ धरण्यासही जागा उरलेली नाही. परिणामी, टायर प्रशासन आता हताश होऊन लोकांना थेट राजधानी 'बेरूत'कडे जाण्यास सांगत आहे.

पळून जाणाऱ्या निष्पाप कुटुंबावर ड्रोन हल्ला

या युद्धाच्या भीषणतेत निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे. लेबनॉन वृत्तसंस्थेच्या (NNA) माहितीनुसार, इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यानंतर आपली घरे सोडून सुरक्षित स्थळाच्या शोधात निघालेल्या एका दुर्दैवी कुटुंबाच्या गाडीवर इस्रायली ड्रोनने थेट क्षेपणास्त्र डागले. या भीषण हल्ल्यात गाडीतील निष्पाप लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण लेबनॉनमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आक्रमक

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्यावर आणि उत्तर इस्रायलमधील नागरिकांवर हिजबुल्लाहने केलेल्या ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्यासाठीच हे ऑपरेशन वाढवण्यात आले आहे. त्यांनी ग्राउंड ऑपरेशनचा (जमिनीवरील लष्करी कारवाई) विस्तार करण्याची घोषणा केली आहे. टायर शहरात राहणारे ५२ वर्षीय रिदा, ज्यांचे घर आणि हॉटेल गेल्या महिन्यात युद्धबंदी लागू होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी झालेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाले होते, त्यांनी यापूर्वी कधीही शहर न सोडण्याची शपथ घेतली होती. मात्र, आता परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून ते स्वतः सामान बांधून समुद्रकिनाऱ्याकडे जीवाच्या आकांताने पळत सुटले आहेत.

३०० गावांवर संकट; परिस्थिती अत्यंत धोकादायक वळणावर

झहरानी नदीच्या दक्षिणेकडील सुमारे ३०० शहरे आणि गावांना या नव्या लष्करी आदेशाचा थेट फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेच्या (ICRC) लेबनॉनमधील प्रमुख 'ॲग्नेस धुर' यांनी जागतिक समुदायाला चेतावणी दिली आहे की, दक्षिण लेबनॉनमधील परिस्थिती आता अत्यंत धोकादायक आणि मानवी सहनशीलतेच्या पलीकडच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दरम्यान, हिजबुल्लाहने दावा केला आहे की त्यांच्या सैनिकांनी इस्रायलच्या बफर झोनच्या बाहेर असलेल्या 'झौतार अल-शर्किया' (Zawtar al-Sharqiyeh) भागात घुसलेल्या इस्रायली सैनिकांशी अगदी समोरासमोर (point-blank range) तीव्र लढाई लढली आहे.

अमेरिका-इराण शांतता चर्चेला सुरुंग

हा ताजा संघर्ष अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या पडद्यामागील शांतता चर्चेला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. इराणचा असा आग्रह आहे की लेबनॉनमधील युद्धाचाही या करारात समावेश व्हावा, तर इस्रायलने हिजबुल्लाहचा धोका पूर्णपणे संपेपर्यंत लढत राहण्याचा पवित्रा घेतला आहे. या युद्धाची ठिणगी २ मार्च रोजी पडली होती, जेव्हा इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले होते आणि त्याचा बदला म्हणून हिजबुल्लाहने इस्रायलवर हजारो रॉकेट्स डागले होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या युद्धात आतापर्यंत ३,२१३ लेबनानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलने आपले २३ सैनिक आणि ४ नागरिक गमावल्याचे मान्य केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा