घन:श्याम कडू
उरण : नवी मुबंई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश नवी मुबंई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिले असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे आज घडलेल्या अपघातावरून उघड होत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पहाणी करूनही उरण-पनवेल परिसरातील वाहतूककोंडी कमी होताना दिसत नाही.
उरणला अनधिकृत कंटेनर यार्डचा विळखा
आज गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरील वैश्वी गावाजवळ भरधाव ट्रेलरने इको गाडीला धडक दिली. सुदैवाने या गाडीतील ८ जण जखमी होऊन त्यांचा जीव वाचला आहे. यावरून उरणमधील अपघाताची मालिका सुरूच असल्याचे उघड होते. उरण परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून यावर उपाययोजना केली होती. तसेच, नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी आदेश काढून अवजड वाहनांस सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घातली होती. या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र, आज वैश्वी गावाजवळ झालेल्या अपघातामुळे अवजड वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे.
उरण परिसरात अनेक कंटेनर यार्ड उभे राहिले आहेत. त्यामधील अनेक कंटेनर यार्ड अनधिकृत आहेत. त्यांच्या सेवेसाठी शासकीय प्रशासन यंत्रणा राबत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. सदर कंटेनर यार्डमधील वाहनांना ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर रस्त्यावर वाट करून देणे व भर रस्त्यावर ट्रेलर उभे करणे यामुळेच वाहतूककोंडी व वारंवार अपघात घडत आहेत. अपघातामध्ये अनेक तरुणांचा जीव गेला आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारीवर्गाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे.
…अन्यथा असेच अपघात होत राहणार
अपघाताची मालिका रोखण्यासाठी अवजड वाहतुकीस बंदी असलेल्या आदेशाचे पालन करणे व परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांना अशा घडणाऱ्या अपघातांचा सामना करावा लागणार आहे.