विजय मांडे
कर्जत : कर्जत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बियाणात भेसळ आढळून आली आहे. याचा परिणाम शेतात वेगवेगळ्या जातीच्या बियाणाचे पीक उगवलेले शेतकऱ्यांना दिसत असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे येथील प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते सांगत आहेत.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात पिकाची लागवड करून भात पीक पिकवत आहेत. त्यातच भात पिकाच्या वेगवेगळ्या जातीचे पीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना प्रस्ताहन करून पुढाकार घेतला जात आहे. सध्या मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात तांबूस कलरच्या भात पिकाची लागवड करून शेतकरी भात पिकवत आहेत. या भाताला दिडशे रुपये प्रति किलो भाव मिळत असून पिकांचे उत्पन्न देखील वाढलेले आहे.
परिणामी कर्जत कृषी विभागाकडून या पिकाच्या लागवडी साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यात आले असून या पिकाची लागवडी साठी शेतकऱ्यांना काही अटी शर्तीवर पीक लागवडी साठी बियाणे मोफत देण्यात आले होते. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जत कृषी विभागाकडून हे बियाणे लागवडी साठी देण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांनी या बियाणांच्या भात पिकाची मोठ्या क्षेत्रफळावर शेतात लागवड करून पीक पिकवले आहे. मात्र आता पीक कापणीवर आले असून यात मोठया प्रमाणात भेसळ पाहायला मिळत आहे.
कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे शशिकांत मोहिते यांनी देखील या भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून या भात पिकात भेसळ आढळून आल्याने या भात पिका पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान झाले असून भात पिकाला भाव देखील मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणच बदलते हवामान व अनियमित वातावरण तर सुरुवातीला आलेले तोक्तते चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर आता मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलेले समोर आले होते, त्याच्यातून ही बळीराजा सावरत असताना आता कृषी विभागाकडून बियाणांची कोणतीही जात पडताळणीची पाहणी न करता शेतकऱ्यांना ते बियाणे पेरणी साठी देण्यात येत असल्याने देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याने कोणाच्या भरवशावर भात पिक घ्यावे. हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला.
कृषी विभागाकडून पीक लागवडीसाठी आम्हा शेतकऱ्यांना नमुना म्हणून देण्यात आले होते. सुरुवातीला पर्पल असे नाव सांगण्यात आले होते. या पिकाला चांगली मान्यता असून किलोला दिडशे रुपये मागणी मिळत आहे. त्यातच हा तांदूळ आयुर्वेदिक असल्याने डायबेटीस सारख्या आजारावर उपयुक्त ठरत आहे. आपल्या तालुक्यात देखील हे पीक शेतकऱ्याने पिकवावे या हेतूने हे पीक कृषी विभागाकडून देण्यात आले होते.परंतु आता पीक लागवड झाल्यानंतर या बियाणांच्यात भेसळ असल्याचे समोर आले असल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे. – शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी