Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणपेण कुंभार आळी येथील पाण्याची टाकी कोसळली

पेण कुंभार आळी येथील पाण्याची टाकी कोसळली

जीवितहानी टळली; फणसडोंगरीतील टाकीही धोकादायक

देवा पेरवी

पेण : पेण नगरपरिषद हद्दीतील कुंभार आळी परिसरातील गुरुकुल शाळेच्या पाठीमागे असलेली पेण नगरपालिकेची पाण्याची टाकी रविवारी सायंकाळी अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून काही मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. ही टाकी कोसळल्याने कुंभारआळी, म्हाडा कॉलनी परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कुंभार आळी येथील टाकी कोसळण्याची घटना घडली असतानाच फणस डोंगरीवरील फिल्टरेशन प्लान्टजवळील पाच लाख लिटर क्षमतेची आणखी एक जुनी टाकी देखील धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

पेण शहराला आंबेगाव धरण, मोतीराम तलाव, हेटवणे धरण यामधून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी साठवणूक करण्यासाठी ३ लाख ४० हजार लिटर क्षमतेच्या सहा टाक्या उभारण्यात आलेल्या आहेत. पेण कुंभारआळी, म्हाडा कॉलनी परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी २००९-१० मध्ये गुरुकुल शाळेच्या मागे ही टाकी उभारण्यात आली होती. मात्र या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने २०१४ – १५ मध्ये या टाकीची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र कमकुवत असलेल्या या टाकीचा वापर करण्यात येत नव्हता.

म्हाडा कॉलनी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने ही पाण्याची टाकी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यासाठी यामध्ये मागील काही दिवसांपासून पाणी साठवणूक करण्यात येत होते. कमकुवत झालेले बांधकाम आणि आजुबाजुच्या परिसरात असणारी दलदल यामुळे ही पाण्याची टाकी धोकादायक झालेली होती. घटना घडलेल्या दिवशी ही टाकी पाण्याने भरली असतांना सदर ५० ते ६० फुट उंच टाकी कोसळून जमिनदोस्त झाली.

सुदैवाने यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र पाण्याने भरलेल्या टाकीमुळे परिसरातील अनेक घरांचे, झाडांचे तसेच मोटारसायकलींचे अतोनात नुकसान झालेले आहे. तर या घटनेनंतर नगरपालिकेचे गटनेते अनिरूद्ध पाटील, नगरसेविका वसुधा पाटील, राजेंद्र वारकर, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ व सामाजिक कार्यकर्ते आदिंनी घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली.

सदर पाण्याची टाकी कोणाच्या काळात बांधण्यात आली हे महत्वाचे नाही. नगरपालिकेत असलेल्या सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. टाकीत पाणी साठवणूक करण्याआधी तिचे स्ट्रक्चरल ऑडीट होणे गरजेचे होते. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. जीवित हानी झाली असती तरी नगरपालिकेने हात झटकले असते का ? – शोमेर पेणकर, नगरसेवक, पेण नगरपरिषद

कुंभारआळी येथील कोसळलेली टाकी 2008 – 09 मध्ये बांधण्यात आलेली होती. या अगोदर तिच्या मधून पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. पूर्ववत सुरु करावी का ? यासाठी ट्रायल बेसिक वर चाचपणी करण्यात येत असताना ती कोसळली. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले असून 2013 मध्ये त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला आहे. पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून सर्व पाणीपुरवठा टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. – अनिरुद्ध पाटील, गटनेते, पेण नगरपरिषद

फणस डोंगरी वरील पाण्याची टाकीही धोकादायक

पेण नगरपरिषद हद्दीतील फणस डोंगरी वरील फिल्टरेशन प्लँट जवळील पाच लाख लिटर क्षमता असलेली जुनी टाकी देखील धोकादायक झाली आहे. ती देखील कधीही कोसळण्याची शक्यता आहे. ही ही अचानक कोसळल्या नंतर कोणतीही जीवित अगर वित्त हानी होऊ नये म्हणून पेण नगरपरिषदेने पूर्व तयारी करणे गरजेचे असल्याचे पेणकर जनतेतून मागणी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -