नवी दिल्ली : झेरोधा या वित्तीय सेवा देणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे संस्थापक निखिल कामथ यांनी पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधानांवरील मीम्सबाबत बोलले. मीम्सबाबतच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी हसून उत्तर दिले. हे तर सुरू राहते, मीम्स बघण्यात वेळ वाया घालवत नाही; अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी हुशारीने प्रश्न टोलवला. ऑनलाईन चॅट करणे, मीम्स बघणे अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही; असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. खाण्यापिण्याबाबतच्या प्रश्नांनाही पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. खाण्यापिण्याचा शौकीन नाही, त्यामुळे मेन्यू कार्ड बघून पदार्थ ऑर्डर करणे कठीण जाते; असे पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे सांगितले.
एवढे परदेश दौरे केले. तिथे सरकारी शिष्टाचारानुसार खाण्यापिण्याचे पदार्थ येतात. भूक लागल्यावर जे समोर वाढले जाते ते खातो. अमूक पदार्थ तमूक पदार्थ नको; असे कधी करत नाही. संघ कार्य करत होतो. पुढे पक्ष संघटनेची कामं केली. या काळात कधी हॉटेलमध्ये जेवणाची वेळ आली तर पंचाईत व्हायची. मेन्यू कार्ड बघून पदार्थ ऑर्डर करणे कधी जमले नाही. अशा अडचणीच्या वेळी मला अरुण जेटली या मित्राची खूप मदत झाली; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पॉडकास्टमध्ये निखिल कामथ यांच्या अनेक प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी दिलखुलास उत्तरं दिली. गुजरातमध्ये रेल्वे स्थानकावर चहा विकताना हिंदी शिकत गेलो. रेल्वे स्थानकावरील ग्राहक – विक्रेते यांच्याशी संवाद साधत हिंदी शिकत होतो. समोरचा काय बोलत आहे ते लक्ष देऊन ऐकावे आणि आवश्यक ते व्यवस्थित ग्रहण करुन आत्मसात करावे याची सवय लहानपणापासूनच होती. यामुळे खूप फायदा झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
माझ्या आयुष्यात भारत देशाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वात आधी राष्ट्रहित नंतर इतर विषय असाच विचार कायम केला. संघ कार्यात असल्यापासून हेच संस्कार झाले आहेत. यामुळे देशहिताचा विचार करण्याची सवयच झाल्याचे पंतप्रधान मोदींनी पॉडकास्ट दरम्यान सांगितले.
पॉडकास्टमध्ये राजकीय आव्हानांच्या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींनी अनोखं उत्तर दिलं. आव्हानांवर, संकटांवर प्रेम करायला शिकलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चीन – भारत संबंधांशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना शी जिनपिंग आणि आपल्यात एक बंध असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. पंतप्रधान म्हणून २०१४ मध्ये पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळी अनेक देशांच्या नेत्यांनी शिष्टाचार म्हणून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याशीही बातचीत झाली होती. जिनपिंग यांनी भारत दौरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी पंतप्रधान या नात्याने त्यांना अवश्य भरत दौरा करा; असे म्हणालो होतो. पुढे जिनपिंग यांनी वडनगर या गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब होती. पण नंतर कारण समजलं. व्हेन त्सांग जो नावाचा चिनी विचारवंत भारतात वडनगरमध्ये वास्तव्यास होता. पुढे चीनमध्ये परतल्यावर त्याने जिनपिंग यांच्या गावात मुक्काम केला होता. यामुळे जिनपिंग आणि माझ्यात अनोखा बंध आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत – मुख्यमंत्री
राजकारण म्हणजे जनसेवेची उत्तम संधी. निवडणूक लढवणे आणि जिंकणे हा राजकारणातला एक भाग आहे पण ते म्हणजे राजकारण नाही; असे पंतप्रधान मोदी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. संघाचे (Team) नेतृत्व करता आले आणि एकदिलाने काम करता आले तर यश मिळते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजकारण; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दुसऱ्यांना आदेश देऊन काही काळ यश मिळेल पण ते दीर्घ काळ टिकणार नाही; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सैन्य शाळेत शिकण्याची इच्छा होती. पुढे रामकृष्ण मिशनसाठी काम करावे असेही वाटले. प्रत्यक्षात ही दोन्ही स्वप्न अपूर्ण राहिली. पण काही वेळा हे अपयश पचवावे लागते. अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा आधार घेत नव्याचा ध्यास घेऊन प्रयत्न करावा लागतो, तेव्हा यश मिळते; असे पंतप्रधान मोदींनी पॉडकास्ट दरम्यान सांगितले. यशापयश हे मानवी जीवनाचे अविभाज्य पैलू आहेत आणि त्याची जाणीव ठेवून काम केले पाहिजे; असे पंतप्रधान पॉडकास्ट दरम्यान सांगितले.
आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती होणे हा देशासाठीच मोठा बदल आहे. या बदलाचे देशावर झालेले सकारात्मक परिणाम दिसत आहेत; असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.