Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

डहाणू-कासा (वार्ताहर) : परतीच्या पावसाने उघडीप घेतल्याने मागील काही दिवसांपासून डहाणू, तलासरी, विक्रमगड, पालघर, आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. तथापि, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. परिणामी, भात कापावे किंवा आणखी काही दिवस वाट पाहावी, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेत भातशेती केली आहे. दरम्यान, ती कापणीला आली असताना परतीच्या पावसानी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरीही सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताचे दाणे पूर्णपणे भरले गेले नाहीत. सततच्या पावसाने अनेक रोपांवरील फुले खाली पडली. तसेच, जी फुले दाण्यात रूपांतरीत होण्यास सुरुवात झाली, त्यांच्यातही पावसामुळे भात तयार होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले भातपीक तयारच झाले नाही.

दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या शेतात थोडफार पीक आले होते. तेही परतीच्या पावसाने संपूर्ण पीक आडवे केले आहे. त्यामुळे भात दाणे भिजून त्याला मोड (कोंब) आले होते. तरीही निसर्गाच्या संकटापुढे न झुकता हातात आलेले व उरले-सुरले पीक शेतातून काढून घेण्यास बळीराजा कामाला लागला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून आकाशात पुन्हा ढग जमा होत असून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत अजून भर पडत आहे. जेमतेम आलेले पीक पुन्हा पाऊस आला तर तेही वाया जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्याला रोज सतावत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कापलेले भात पीक व्यवस्थितपणे सुकत नसल्याने दोन ते तीन दिवस कापलेले भात पीक शेतातच ठेवावे लागत आहे.

पीक ओले राहण्याची भीती

कापलेले भातपीक नीट कोरडे झाले नाही तर त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भात कापल्यानंतरही ते नीटपणे कोरडे करणे आवश्यक असते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कापलेले भातपीक व्यवस्थित कोरडे होत नसल्याने ते ओले राहून नुकसान होण्याची शक्यता बळावत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -