Sunday, May 5, 2024

Wamanrao Pai : खरे शहाणपण

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

धर्म, जात, पंथ, कूळ, गोत्र ह्या सगळ्या कल्पना आहेत, हे आतापर्यंत कोणी सांगितलेले नाही. ह्या कल्पनांमुळे आपण इतके अडकून गेलेलो आहोत जसे की एखाद्या माणसाला खांबाला करकचून बांधून टाकावे. बांधण्यात फरक आहे तो म्हणजे उगीच फेरे मारणे आणि करकचून बांधणे. धर्म एक फेरा, जात दुसरा फेरा, कूळ तिसरा फेरा, गोत्र चौथा फेरा ह्याने माणूस करकचून बांधला गेलेला आहे. त्यापलीकडे जावे असे कोणालाच वाटत नाही. कोणी शिकवीत नाही. भगवदगीतेने शिकविले, मात्र लोकांना भगवदगीता समजत नाही. ज्ञानेश्वरी वाचायला जावी तर ज्ञानेश्वरीही कठीण आहे. चटकन समजत नाही.

९९९९ ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांना नेमके काय सांगायचे आहे हे शोधून काढणे कठीण आहे. नामदेव महाराजांनी सांगितले आहे, “एकतरी ओवी अनुभवावी”. संतांचे वर्म संतच सांगतात. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महान आहे हे खरे आहे, पण ज्ञानेश्वरी समजायला हवी असेल, तर एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवण्याचा प्रयत्न केला तरी सगळी ज्ञानेश्वरी तुमच्या हाताला लागेल हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे. समजायला कठीण का आहे? तुम्ही नुसते पारायण करत बसलात तरी त्यामागचा शब्दार्थ, गुह्यार्थ, भावार्थ, परमार्थ इथपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. अर्जुनपण म्हणजे काय? लोक काय वाटेल तो अर्थ लावतात. ह्या पाठीमागे गुह्यार्थ केवढा आहे !! अर्जुनपणाच्या पाठीमागे किती कल्पना आहेत??

धर्म, जात, पंथ ह्या सर्व कल्पना आहेत. माझा पक्ष, तुझा पक्ष, माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे, तो म्हणतो त्याचा पक्ष सत्तेत आला पाहिजे. हे मी का सांगतो आहे? श्रेष्ठ, कनिष्ठ अशी भावना येते, प्रत्येकजण म्हणू लागला की माझा पक्ष श्रेष्ठ, तुमचा कनिष्ठ तर भांडण होणार की नाही? माझा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ भांडण होणार की नाही? आज जगात तेच चाललेले आहे. जगात भांडण तंटेबखेडे चाललेलेच आहेत. शेवटी वैयक्तिक भूमिकेतून मी खरा, तू खोटा; मी सांगतो तेच खरे तर तो म्हणतो त्याचेच खरे, असे होते. प्रत्यक्षात त्याने म्हटले पाहिजे की मी बरोबर असेन, तुम्हीही बरोबर असाल; कदाचित माझे चुकत असेल, कदाचित तुमचेही चुकत असेल, जरा चर्चा करूयात. पण इतका शहाणपणा असतोच कुठे? इतका शहाणपणा आता तर जगात युद्धे झालीच नसती.

टीव्ही मालिका बघता?, मी पण काही बघतो, सगळ्याच नाही बघत, पण त्यांत जे काही भांडण तंटेबखेडे चालू असतात त्याचे मूळ काय? शहाणपणाचा अभाव हे त्याचे मूळ कारण आहे. सगळे शहाणपण कशात आहे? परमेश्वराला ओळखण्यात !!! परमेश्वराला ओळखण्यातच खरे शहाणपण आहे, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -