Sunday, May 5, 2024

Dnyaneshwari : तेजोमय

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

‘विश्वरूपदर्शन योग’ हा अध्याय म्हणजे ज्ञानियांच्या प्रतिभेचा कळस होय. भगवान श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांच्यात अनोखं नातं! या नात्याची इतकी रूपं! एखाद्या लोलकातून ती पाहावी, तशी ज्ञानदेव आपल्यापुढे ती साकारतात.

‘विश्वरूपदर्शन योग’ हा अध्याय म्हणजे ज्ञानियांच्या प्रतिभेचा कळस होय. त्या वर्णनातील भव्यतेने, दिव्यतेने आपण अक्षरशः दिपून जातो. असा प्रचंड पट साकारतात ज्ञानदेव ! आता पाहूया यातील काही अद्भुत ओव्या. हेही कठीणच, कारण वर्णनाच्या या महासागरातून कोणतं रत्न उचलावं, कोणतं नाही?, असा पेच पडतो.

भगवान श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांच्यात अनोखं नातं! या नात्याची इतकी रूपं ! एखाद्या लोलकातून ती पाहावी, तशी ज्ञानदेव आपल्यापुढे ती साकारतात. विश्वरूप दर्शन पाहण्याची अर्जुनाची इच्छा श्रीकृष्ण पुरी करतात. त्यावेळच्या असंख्य ओव्या आहेत. त्यातील काही ओव्या. (अकरावा अध्याय)

‘ज्याच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होऊन, त्या तेजापुढे अग्नीही दिपून जाऊन समुद्रात शिरला.’
‘जयाचिया किरणांचे निखरेपणे। नक्षत्रांचे होत फुटाणे।
तेजे खिरडला वन्हि म्हणे। समुद्रीं रिघो॥’ ओवी क्र. २१६

‘निखरेपणे’ या शब्दाचा अर्थ आहे प्रखरपणाने, तर ‘खिरडला’ याचा अर्थ दिपून गेला.
‘मग जणू काय काळकूट विषाच्या लाटाच उसळल्या आहेत किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवले आहे, अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरिता उगारल्यासारखे अपरिमित (असंख्य) हात अर्जुनाने पाहिले.’ ओवी क्र. २१७.

देवांच्या रूपाचं हे वर्णन किती भव्यदिव्य ! त्यांच्या तेजापुढे नक्षत्रांचे फुटाणे होणं. अपार सृष्टी ज्ञानदेव साकारतात या दृष्टान्तातून. आकाश असतं अनंत, उंच. या आकाशातील नक्षत्रही अशीच तेजस्वी, उत्तुंग. ‘नक्षत्र’ या कल्पनेतून सुंदरताही सुचवली जाते. व्यवहारात बोलतानाही आपण ‘नक्षत्रासारखी सुंदर मुलगी’ म्हणतो ना ! तर या तेजस्वी, सुंदर नक्षत्रांसाठी कोणती कल्पना केली आहे? फुटाण्यांची ! फुटाणे आकाराने किती लहान, तर नक्षत्र किती महान ! पण या मोठ्या असणाऱ्या नक्षत्रांनाही असं लहान रूप दिलं आहे. त्यांना सांगायची आहे देवांच्या तेजाची प्रचंडता ! त्या अपार तेजापुढे नक्षत्रदेखील ‘फुटाण्यां’सारखी वाटू लागली.

पुढची कल्पना कोणती? अग्नीही दिपून जाऊन समुद्रात शिरला. अग्नी हे पंचतत्त्वांपैकी एक. सृष्टीचा एक भाग असलेलं हे तेजस्वी तत्त्व. पण देवांच्या तेजापुढे त्याचं तेज अगदी फिकं पडलं. किती फिकं? जणू काय एखादं लहान मूल मोठ्या माणसाला पाहून लपून बसतं, कोणाचा तरी आश्रय घेतं. त्या प्रसंगाची आठवण हा दाखला वाचताना होते. इथे अग्नी जणू छोटं बालक, समुद्राचा आसरा घेणारं ! ही ज्ञानदेवांची किमया ! त्यांना श्रीकृष्णांचं महाकाय तेज चित्रित करायचं आहे. ते असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे की, आपण म्हणतो ‘अहाहा!’

त्यानंतरचं वर्णन देवांच्या अक्राळविक्राळ बाहूंचं. हात अपरिमित आणि आयुधं घेतलेले, मारण्याकरिता उभारलेले ! त्याचं चित्रच चितारतात ज्ञानदेव पुढच्या दृष्टान्तातून.

काळकूट हे महाभयंकर विष. याचा एक थेंबदेखील मृत्यूपर्यंत पोहोचवतो. अशा विषाच्या लाटा. सागराच्या लाटा ही नेहमीची उपमा. ज्ञानदेव म्हणतात, काळकूट विषाच्या लाटांप्रमाणे शस्त्र पुन्हा या लाटा उसळत्या म्हणजे अधिक आवेग, गती असलेल्या ! दुर्जनांच्या संहाराकरिता सज्ज बाहू यातून उमगतात. याच शस्त्रांसाठी अजून एक दाखला – ‘महाविजांचे अरण्य’ जंगल म्हणजे गर्द, घनदाट असलेलं. ज्ञानदेवांच्या डोळ्यांना काय दिसलं महाविजांचं अरण्य ! त्याप्रमाणे शस्त्र उगारलेले बाहू !

विश्वरूप दर्शनचा हा संपूर्ण प्रसंग. ज्ञानदेवांना जाणवली त्यात विलक्षण गती, स्फूर्ती आणि ऊर्जा! ती आपल्यापुढे अशी चित्रित करतात ज्ञानदेव ! त्या महानतेने आपण अवाक होतो. उन्नत होतो आणि ‘ज्ञानदेवां’पुढे नत होतो…

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -