Sunday, May 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकोण आदित्य? त्याला काय प्रतिष्ठा?

कोण आदित्य? त्याला काय प्रतिष्ठा?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फटकारले

मुंबई : कोण आहे आदित्य ठाकरे? त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो, मी अजिबात उत्तर देणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना फटकारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ७१ हजार लोकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. यानिमित्ताने बोलत असताना नारायण राणेंना माध्यम प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणार नसल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंना तो बालिश असल्याचे म्हटले.

“एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याआधी मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर नाही गेलो, तर मला अटक होईल असं म्हणाले होते”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. या दाव्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले की, तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का? एकनाथ शिंदे भाजपाबरोबर गेले नाही. ते शिवसेना पक्ष घेऊन आले आहेत. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजपा अशी ही युती आहे. अशा प्रश्नांची तुम्ही का दखल घेताय मला कळत नाही. मी त्यांच्या मुद्द्यावर उत्तर देणार नाही. काहीही बोलतात ते. म्हणे रडले होते. कोणत्या वर्षी रडले होते?, असा प्रतिसवाल राणे यांनी यावेळी केला.

दरम्यान, संजय राऊतांनी सरकारवर केलेल्या टीकेवरही नारायण राणेंनी उत्तर दिले. बेरोजगारांना नोकरीची पत्रं वाटण्याचं काम आमच्याकडे शाखाप्रमुख करतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “एखादा रोजगार जर असेल कुणाकडे तर संजय राऊतांनाच द्यायला सांगा. त्यांच्याकडे आहे ना रोजगार, तर संजय राऊतांना द्या म्हणावं.”

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रोजगारासाठी एक योजना तयार केली आहे. त्यातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नोक-या देण्याचे काम करतोय. पण विरोधकांनी त्याला विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडे काही काम नाही. कारण विरोधकांच्या हातात फक्त बोंबलायचे काम शिल्लक राहिलेले आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -