Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ; पक्ष सांभाळता आले नाही पण सल्ले...

उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ; पक्ष सांभाळता आले नाही पण सल्ले देत आघाड्या करताहेत

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका

अहमदनगर : विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या? या देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केले ते फोल ठरले. विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी त्यांच्यात एकमत होत नाही. त्यांचा नेता कोण हे ठरत नाही. बैठकांचे आयोजन केले जाते. मात्र माणसे येत नसल्याने त्या बैठका पुढे ढकलण्याची नाचक्की विरोधकांवर येते. आघाडीच्या ज्या बैठक होतायत, त्या पर्यटनासाठी आहेत. त्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली, मुंबईत देखील झाली. त्यानंतर कदाचित ते आता अंदमान निकोबारला देखील बैठक घेतील. ज्यांना आपले पक्ष, आमदार सांभाळता आले नाही ते आघाड्या करु लागलेत, असे शाब्दिक टोले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांना लगावले.

नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंचावरून जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणूनच त्यांच्या पक्षातील आमदार त्यांची साथ सोडून गेले. उद्धव ठाकरे व शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ, अशी उपमा देखील यावेळी मंत्री विखेंनी दिली. निवडणुका तसेच हिंदुत्व अशा मुद्द्यांवरून मंत्री विखे यांनी ठाकरे यांच्यासह शरद पवारांवर जोरदार टीका केली.

सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले

दोन दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचतात. आता दोघांचेही सरकार गेले, आता दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता पु्हा एकदा त्यांनी पवार आणि ठाकरेंवर टीकास्त्र डागले.

हे कसलं हिंदुत्व?

यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, प्रभू श्रीरामांविषयी अवमानकारक उद्गार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड करतात, आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. हे कसलं हिंदुत्व आहे? ते काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवणाऱ्या लोकांच्या सोबत हे सत्तेसाठी जाऊन बसतात. मग याचं हिदुत्व कोणतं आहे? असा सवाल देखील यावेळी मंत्री विखे यांनी ठाकरे यांना केला. आज देव देवतांचा अपमान होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्या संबंधित पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत देखील नाही. त्यामुळे त्यांनी तरी किमान हिंदुत्वाबद्दल बोलू नये, असे विखे म्हणाले.

कितीही आघाड्या झाल्या तरी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्ष सांभाळता आले नाही, आपले आमदार सांभाळता आले नाही, आज ते एकत्र येऊन आघाड्या करू लागले आहेत, अशी अवस्था आता विरोधकांची झाली आहे. मात्र कितीही आघाड्या झाल्या तरी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होतील व त्यांना जनता निवडून देईल, असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -