Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात दिसली घटक पक्षांमध्ये नाराजी

नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात दिसली घटक पक्षांमध्ये नाराजी

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल

मायकल खरात

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन ४०० ची हाकाटी पिटली असली तरी या मिशनला, नाशिक लोकसभा मतदार संघात मात्र पालकमंत्र्यांबाबतची आत्मकेंद्री भूमिका घटक पक्षांच्या नाराजीला कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी सर्वच राजकीय पक्षातील श्रेष्ठींनी आपापल्या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मिशन ४०० प्लसच्या तयारीला वेग आला आहे. महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना मेळाव्यानिमित्त एकत्रित बोलवत सातपूर येथील डेमोक्रेसी हॉल येथे मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणून सर्वांनी एकत्र रहात एकमेकांशी गोड बोलण्याचा सल्ला वरिष्ठ नेत्यांनी दिला. मात्र मेळाव्याच्या बॅनर पासून ते मिळणाऱ्या वागणुकी बाबत घटक पक्षातील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

आम्ही कढी पत्ता आहोत का?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी तर आमचा नेहमीच कढीपत्त्यासारखा वापर केला जातो, अशी जाहीर खंत व्यक्त केली. निवडणुका आल्या की घटक पक्षांची आठवण येते. मात्र निवडून आल्यानंतर सत्ता उपभोगत असताना आम्हाला अलगद कढीपत्त्यासारखं बाजूला टाकण्याची मानसिकता आता बदला असा थेट इशारा त्यांनी दिला.

तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांनी देखिल वरिष्ठ नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नोंदवले व मनपातील भूखंडाचे श्रीखंड कोणी खाल्ले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत भ्रष्टाचार प्रकरणी लक्ष वेधले.

महायुतीच्या बैठकीत घटक पक्षांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केल्याने भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी याची दखल घेतली. समजूतदारपणा दाखवत घरातील वाद घरातच मिटवले गेले पाहिजे, आपल्यातील भांडण रस्त्यावर आणू नका, ते वरिष्ठांच्या मध्यस्थीने चार भिंतीतच मिटले पाहिजे, असा सल्ला देत यापुढे एकजुटीने काम करावे अशाही सूचना मंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना केल्या.

नाशिक लोकसभा अदलाबदलीचा खेळ?

या मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत वेगवेगळी खूमासदार चर्चा रंगल्याचे दिसून येत होते. खासदार गोडसे यांना दोन वेळेला संधी देऊन देखील त्यांच्या ठराविक कार्यकर्ते किंवा जवळच्या माणसांव्यतिरिक्त इतरांकडे गोडसेंचे लक्ष जात नाही. म्हणून येत्या निवडणुकीत थोडं दुर्लक्ष आपणही करणे गरजेचे आहे म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याचं काम भविष्यात तरी आप्पा करणार नाहीत, अशी चर्चा सुरू होती. यासोबतच भाजपाकडून नाशिक लोकसभा लढवण्यासाठी दिनकर पाटील यांनी देखील कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचे वेध लागले असल्याबाबत बोलले जात आहे. काहींच्या मते धुळे लोकसभा मतदारसंघासाठी दादा भुसे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघावर स्वतःची दावेदारी त्या काळात सांगू शकतात. त्यांचा प्लॅन सक्सेस झाल्यास नाशिक लोकसभेची जागा भाजपाला आणि धुळे मतदार संघाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या म्हणजेच स्वतः भुसे किंवा त्यांच्या मुलास मिळू शकते. मात्र नाशिक लोकसभा मतदार संघात जर महायुतीला अपयश आलेच तर त्याचे अपश्रेय भाजपा नव्हे तर पालक मंत्र्यांच्याच नावावर लिहिले जाईल, यात जाणकारांना शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -