Saturday, May 11, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखउद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडविण्यामागे अग्रेसर : नितेश राणे

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडविण्यामागे अग्रेसर : नितेश राणे

अरुण बेतकेकर: (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)

नितेश राणे, आपल्या १७ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘मीरा बोरवणकर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे, त्यानुसार उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडविण्यामागे अग्रेसर आहेत. मी तेव्हा त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. बोरवणकर यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले, नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याविरुद्ध पोलीस खात्याकडे सर्व सायन्टिफिक पुरावे होते. पुण्यामध्ये दंगल भडकविण्यामध्ये त्यांचा कॉल रेकॉर्डिंग झाला. त्यांना उद्धव ठाकरे आदेश देत होते की, तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवा. या बाबतची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी जे काही सत्य सांगितले ती माहिती पोलीस खात्याकडे आहे. राममंदिराकडे जाणाऱ्या ट्रेनला, रामभक्तांना अपघात घडवत दंगली घडतील असे उद्धव ठाकरे आतापासूनच आपल्या भाषणात म्हणतात. त्यांचा हा नवा पुरावा आला आहे. ‘राणेंच्या या म्हणण्या पृष्ट्यर्थ स्पष्टता दर्शविण्यासाठी खालीलप्रमाणे खुलासा करत आहे. तसेच माझ्यासोबत घडलेल्या अशाच घटनेचा गौप्यस्फोटही पुढे करीत आहे.

उद्धव ठाकरे हे विश्वातील प्रकांड पंडितच. त्यांनी सिद्धांत मांडला आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव येथील भाषणात तो जाहीर केला. ती बातमी ११ सप्टेंबर रोजी वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर अतिरंजित करत दाखविण्यात आली. गौप्यस्फोटाची बातमी अशी, “येणाऱ्या काळात देशात काय होऊ शकतं याची भीतीच उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून ही भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाचे अनेक अर्थही काढले जात आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर घणाघाती हल्ला करताना मोठा गौप्यस्फोटही केला. राम मंदिराचं येत्या २३ जानेवारीला उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण उद्घाटनामागे एक डाव असू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या उद्घाटनाला लाखो हिंदूंना बोलवायचं. बस, रेल्वे आणि ट्रकने बोलवायचं आणि परतताना एखादा गोध्रा घडवायचा असं होऊ शकतं. हल्ला घडवू शकतात. कोणत्या तरी वस्तीत बस जाळायची, दगडफेक करायची. माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील. घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यावर हे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील. हे डावपेच त्यांचे होतील.”

ही उद्धवजींची पराकोटीची नीच प्रवृत्ती. नीच प्रवृत्ती हा त्यांचा स्थायी भाव आहे. ६ डिसेंबर १९९२ बाबरी मस्जिद विध्वंस झाले. हा विध्वंस माझ्या शिवसैनिकांनी केला अशी असत्य फुशारकी उद्धवजी मारत असतात. डिसेंबर १९९२ – जानेवारी १९९३ हिंदू-मस्लीम दंगली घडल्या. यास काय म्हणावे? याचाच फायदा आगामी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेस झाला, प्रथमच सत्ता आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रास लाभला. याचाच अर्थ ही दंगल सत्तेसाठी घडवली गेली असे म्हणावे का? गोध्रा, त्यानंतरची दंगल याचा राजकीय लाभ उद्धवजींनी स्वतःसाठी पुरेपूर करून घेतला आहे. गोध्रा घडले २७ फेब्रुवारी २००२. तरी ते भाजपाबरोबर शय्यासोबत करत राहिले २०१९ पर्यंत. २०१९ ला सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसवासी झाले. तब्बल १७ – १८ वर्षांनंतर प्रथमच त्याना साक्षात्कार झाला, गोध्रा हे पाप आहे. वाह उद्धवजी वाह ! उद्धवजी शिवसेनेत कार्यरत झालेल्यास दंगलीचा इतिहास आहे. पृष्ठर्थ अनेक दाखले देता येतील पण खालील काही ठळक उदाहरणे पाहता हा निव्वळ योगायोग असू शकेल हे शक्य नाही.

उदाहरण १ : १९९२ – ९३ मधील धार्मिक घटनाक्रमांचा शिवसेनेने करून घेतलेला उपयोग
अ) ६ डिसेंबर १९९२ बाबरी विध्वंस. त्यानंतर
ब) डिसेंबर १९९२ ते जानेवारी १९९३ हिंदू – मुस्लीम दंगल.
क) १२ मार्च १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट.
ड) फेब्रुवारी १९९५ प्रथमच महाराष्ट्रात शिवसेना – भाजप सत्तेत आली.
इ) दंगलीचा फायदा शिवसेनेला झाला. उद्धवजी तर आजही ह्या घटनेचा वारंवार वापर करतात.

उदाहरण २ : १९९९ विधानसभा निवडणुकीपूर्वी १९९७ ला जातीय दंगल घडली.
अ) ११ जुलै १९९७ रमाबाईनगर घाटकोपर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना कारणास्तव दंगल घडली.
ब) पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १० दलितांचा बळी व २६ जखमी.
क) त्यावेळी महाराष्ट्रात १९९५ – १९९९ भाजप – शिवसेना युतीचे सरकार होते.
ड) आणि छगन भुजबळ विधान परिषद विरोधी पक्षनेते होते.
इ) या दरम्यान मी अरुण बेतकेकर धुळे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो. पुढे १ जुलै १९९८ ला धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे निर्माण झाले. मी ह्या दोन्ही जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो.
ई) या दंगलीच्या चौकशी दरम्यान श्री. राजेंद्र गुप्ता हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी. तेथील जिल्हाप्रमुख दिवंगत शशांक टंकसाळे यांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात आले. त्यांचे म्हणणे होते, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विडंबन करण्याची जबाबदारी त्यांना छगन भुजबळ यांनी सोपवली होती. ते मला जमले नाही. पण ही घटना जशाच्या तशी घडली. याचाच अर्थ हे कृत्य त्यांनी अन्य कोणाकडून तरी घडवून घेतले.’
उ) मी या संदर्भात उद्धवजींना भेटलो. त्यांनी वरील दोघांनाही मुंबईला बोलावून घेण्याची सूचना केली. पुढे त्यांच्याच सूचनेनुसार या दोघांनाही घेऊन सुभाष देसाई यांची भेट घेतली आणि त्यांनी हे प्रकरण पुढे नेण्याची सूचना केली. उद्धवजी व देसाई यांच्या सूचनेनुसार हे प्रकरण शपथपत्राद्वारे कोर्टात नेले.
ऊ) यातील गांभीर्य पाहता यास प्रचंड प्रसिद्धी मिळाली. छगन भुजबळ ह्यांना घेरत त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची योजना होती. दलितांना भडकविण्याचा प्रकार होत राहिला. राजकीय लाभासाठी हे प्रकरण सातत्याने पेटवत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दंगल व घटनांचा लाभ उद्धवजी उठवत राहिले.

उदाहरण ३ : ऑक्टोबर २००० कुलाबा पोटनिवडणुकीपूर्वी जातीय दंगल काँग्रेस आमदार मर्जबान पात्रावाला यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या कुलाबा विधानसभा मतदार संघात दि. २० फेब्रुवारी २००० रोजी पोटनिवडणूक होणार होती. कुलाबा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. तत्पूर्वी १५ दिवस आधी पवईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर लगेच तेथे दंगल पेटली. पुढे त्याची लागण घाटकोपरस्थित रमाबाई आंबेडकर नगरापर्यंत पोहोचली. शिवसेना शाखेवर हल्ला झाला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड झाली अशी आव उठवण्यात आली. पुढील काही दिवस दंगल धुमसत राहिली. वाकयुद्ध सुरू झाले. उद्धवजींनी निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनवला. याचा फायदा कुलाबा निवडणुकीत शिवसेनेला झाला. प्रथमच कुलाब्यातून शिवसेना उमेदवार दिनाज पात्रावाला या निवडून आल्या. दंगलीचा लाभ उद्धवजींनी उपसला.

उदाहरण ४ : सप्टेंबर २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व दंगल
१३ ऑक्टोबर २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली – मिरज येथे गणेशोत्सव दरम्यान सप्टेंबर २००९ मध्ये हिंदू – मुस्लीम दंगल घडविण्यात आली. निमित्त ठरले ते, एके ठिकाणी गणेश मंडळाने, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला हा देखावा केला होता. कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा बालेकिल्ला. उद्धवजींनी ही दंगल निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणली. या दंगलीचा फायदा मिळवत शिवसेनेने प्रथमच १० पैकी ६ मतदारसंघात विजय संपादन केला. दंगलीचा लाभ उद्धवजींनी उपसला.

उदाहरण ५ : एक गौप्यस्फोट, २००४ विधानसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक दंगल घडविण्याची योजना ऑक्टोबर २००४ विधानसभा निवडणुकीपूर्वी, साधारण १३ ऑगस्ट २००४ हे निश्चित आठवते कारण लागलीच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता. गजानन कीर्तिकरांचा मला फोन आला, म्हणाले उद्धवजींना भेटायचे आहे. त्यानुसार मीही पोहोचलो. चर्चेला सुरुवात होताच त्याचक्षणी लक्षात आले या दोघातील काही तरी पूर्वनियोजित योजना असावी. उद्धवजी यांनी एक गंभीर कल्पना मांडली.

‘महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक आहे. मला स्वतःला महाराष्ट्राचा कारभार हाती घ्यावयाचा आहे. महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचे सरकार आणायचे असेल, तर १९९३ प्रमाणे हिंदू – मुसलमान दंगे’ घडवणे आवश्यक आहे. आपले मागील सरकार हे दंगे झाल्यामुळेच प्रस्थापित झाले होते. त्याची पुनरावृत्ती व्हावी. त्या दंग्याची सुरुवात लोकाधिकार महासंघाचे कार्यक्षेत्र व प्राबल्य असलेल्या दक्षिण मुंबईतील फोर्ट – नरिमन पॉइंट – कुलाबा येथून व्हावी. तेथील पदपथावरील फेरीवाल्या मुसलमानांना सुरा भोसकून पळ काढण्याचे सत्र सुरू करावे. त्यानंतर मुंबई – महाराष्ट्रात दंगल पेटविण्याची जबाबदारी माझी.” मला भुलवण्यासाठी गजानन कीर्तिकर यांनी नाटकीय पद्धतीने उसळी घेत उद्धवजींच्या मतास उत्स्फ़ूर्त प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर वाकून नमस्कारही केला. हा एक पूर्वनियोजित कट. हेतू हा मला भडकवण्याचा होता आणि माझ्याकरवी हे कृत्य घडवून आणावयाचा डाव होता; परंतु ह्या मतास मी ठाम नकार दिला व म्हणालो, ‘यातील कोणी पकडला गेल्यास ते शिवसैनिक देशोधडीला लागतीलच, पक्षही अडचणीत येईल. मला मनस्वी हे पटत नाही.’ माझ्या ठाम भूमिकेने प्रकरण येथेच तात्पुरते थांबले.

याबाबत उद्धवजींना एक निश्चित अवगत असावे, दोन – चार मुसलमानास भोसकून पळ काढल्याने दंगल उसळत नसते. दंगलीची पार्श्वभूमी तयार होते ती भोसकून पळ काढणाऱ्या हिंदूस प्रक्षुब्ध जमावाने ठेचून मारल्यानंतर. गृहीत धरा तो हिंदू मी, अन् भर रस्त्यात जमावाने मला ठेचून मारले. अन् दंगल घडवल्या गेल्या. अशात उद्धवजी नामानिराळे राहत मुख्यमंत्रीपदी आरूढ होतील, ते माझ्या मढ्यावर. त्यानंतर हुतात्मा म्हणून माझी साधी आठवणही होणार नाही. आजपावेतो शिवसेनेसाठी असे अनेक हुतात्मे झाले. यातील कोण स्मरणात राहिला. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी वाहिली का? एकाचा तरी फोटो सेनाभवनात लागला आहे का? पुढे कोणी उद्धवजींना म्हणाले, अरुणच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचे हाल होत आहेत, तर हेच उद्धवजी म्हणतील कशाला झक मारायला सुरा भोसकायला गेला होता? मला विचारून थोडाच गेला होता? अशी कामे शिवसैनिकांना चिटकवून स्वतः फोन बंद करून विजनवासात नाहीसे होणे हाही त्यांचा स्थायीभाव आहे.

आजचे भाजपाचे बलाढ्य स्वरूप पाहता सत्तेवर येण्यासाठी त्यांना दंगली घडविण्याची आवश्यकता बिलकुल भासणार नाही. राम मंदिर उभे राहणार आणि या मंदिर उभारणीद्वारे स्वयं श्रीरामच त्यांना तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान करणार, दंगल घडविण्याची आवश्यकता आपणासारख्यांना आहे. मग त्या धार्मिक, जातीय, प्रांतीय असतील वा भाषिक. आपल्यावरील ‘राम मंदिर उद्घाटन प्रसंगी गोध्रा घडेल’ वक्तव्यास काटकारस्थानाची दुर्गंधी येते आहे. ही दंगल घडविण्याची आपलीच पूर्वनियोजित योजना तर नाही ना? हेतू दंगलीची पार्श्वभूमी निर्माण करणे तर नव्हे ना? आज आपणास इतर पक्षाप्रमाणेच सत्तेसाठी मुसलमानांची मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. त्या मतांची वाटमारी करण्याचाच आपला डाव असण्याचे येथे संभवते. वरील घटनाक्रम पाहता सरकारने वेळीच याची दखल घेणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -