Saturday, May 11, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउबाठा सेनेचा इलेक्शन फंड जमा करण्याचा हेतू

उबाठा सेनेचा इलेक्शन फंड जमा करण्याचा हेतू

आमदार नितेश राणे यांचा घणाघात

मुंबई : उबाठा सेनेला समाजाचे काही पडलेले नाही. पण आज सत्तेत नसल्यामुळे वसुलीची सगळी दारे बंद झाली आहेत. म्हणून ऑनलाईन लॉटरीच्या लोकांना घाबरवून त्यांच्याकडून इलेक्शन फंड जमा करायचा हा सरळ हेतू संजय राऊत यांच्या पत्रातून दिसत आहे. याबाबत कोणाला कुठून कसे फोन गेले आहेत. याचे खुलासे मी लवकरच जाहीर करेन, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, ऑनलाईन लॉटरी आणि जुगाराबाबत संजय राऊत यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले. अचानक पत्र लिहिण्याचे कारण काय? ऑनलाईन लॉटरी आणि जुगार महाविकास आघाडी सरकारच्या काळातही चालायचा. पण आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा हेतू आहे. उबाठाला निधी द्या अशा पद्धतीचा संदेश द्यायच्या हेतूने दिलेले ते पत्र आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला.

हप्ते सरकारकडे जात आहेत की संजय राऊत यांना हप्ते मातोश्रीला जमा करायचे आहेत, याचे काही पुरावे माझ्याकडेही येत आहेत. आणि त्यासाठी मी विशेष पत्रकार परिषद घेणार असल्याचे राणे म्हणाले. ऑनलाईन लॉटरीवाल्यांना कसे धमकावले, घाबरवले गेले आहे. लोकसभेसाठी एवढे-एवढे पैसे द्या, नाहीतर आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू असे फोन गेले आहेत. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे असल्याचे राणे म्हणाले.

महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. उबाठा महाविकास आघाडी सोबत राहील का? याचे चित्र लवकरच जनतेसमोर येईल, असा दावा नितेश राणे यांनी केला.

महायुती म्हणून प्रत्येकाचे मन सांभाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार लोकसभेसाठी निवडून देऊ. आमचे ४५ प्लसचे टार्गेट असून आम्ही एकत्र काम करू, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -