Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवेळच मिळत नाही...

वेळच मिळत नाही…

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

तुकाराम महाराजांच्या चरित्रातली ही एक गोष्ट. तुकाराम महाराज दरवर्षी देहू, पंढरपूर दिंडीत सामील होत असत. आषाढी आणि कार्तिकीच्या दोन्ही वाऱ्या न चुकता करीत. तुकाराम महाराजांच्याच देहू गावात रहाणारा एक शेतकरी होता भिवबा. तुकाराम महाराज देऊ पंढरपूर वारीत जायला निघाले की, हा भिवबा नेहमी म्हणायचा,
“तुकारामबोवा, यंदाच्या वर्षाला तुमच्या संगाती वारीला जायची मनापासून इच्छा होती.”
“अरे इच्छा होती, तर माशी कुठं शिंकली भिवबा?” तुकाराम महाराज हसून विचारीत.
“ते काय विचारू नका म्हाराज, नुकतीच बियाणीं पेरलीयेत शेतात. नव्या जातीची बियाणी हायेत. नीट राखण करायला पायजेल हाये.”
“ठीक आहे. तुझी इच्छा.” तुकाराम महाराज पुढे निघून जात. त्यानंतर खजील झालेला भिवबा त्यांच्या मागे जात म्हणे, “तसं न्हायी म्हाराज, या आषाढीला यायला न्हायी जमत. पन कार्तिकीला मात्र नक्की येतो.”
“ठीक आहे. तुझी इच्छा.” तुकाराम महाराज पुन्हा हसत आणि अभंग गुणगुणत निघून जात.

कार्तिकीच्या वारीच्या वेळीही हाच प्रकार त्यावेळी भिवबाचं कारण थोडंसं वेगळं असायचं. कार्तिकीच्या वारीचे वेळी भिवबा म्हणायचा, “यंदाच्याला बक्कळ पीक आलंय कापणीची कामं नुकतीच झालीत अजून मळणी शिल्लक हाये. शिवाय दाणा नेऊन बाजारात विकायचं काम…”  तुकाराम महाराज हसले की, भिवबा थोडा खजील व्हायचा नि पुढे म्हणायचा, “पण बुवा, यंदाच्या आषाढीला मात्र नक्की येतो बघा.”  अशा किती आषाढी आणि कार्तिकीच्या वाऱ्या आल्या नि गेल्या. पण भिवबा मात्र वारीला कधीच गेला नाही. प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणं मात्र सांगायचा. कधी बायकोचं आजारपण तर कधी मुलाचं लग्न…

एके दिवशी तुकाराम महाराज भिवबाच्या घराजवळून चालले असता त्यांनी त्या वडाच्या पारंब्यांचा जमिनीच्या दिशेने उतरलेला जुडगा हातात धरून मोठमोठ्यांदा बोंब मारायला सुरुवात केली. “मेलो मेलो. धावा धावा. सोडवा. सोडवा.” आजूबाजूनं जाणारे लोक गोळा झाले. भिवबासह त्याचं कुटुंब घरातून बाहेर आलं. तुकाराम महाराज ओरडतच होते. “धावा धावा. सोडवा, सोडवा.”
भिवबाने विचारलं, “काय झालं तरी
काय म्हाराज?”

“अरे काय झालं काय विचारतोय भिवबा. तुझ्या या वडाच्या पारंब्यांनी मला जखडून टाकलंय.
बघ ना माझे हात कसे बांधून टाकलेत सोडव मला या पारंब्यांतून.”
भिवबा चक्रावला, “अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही ? पारंब्यांनी तुम्हाला धरलंय की तुम्ही या पारंब्यांना धरलंय? तुम्ही हात सोडा. बघूया पारंब्या कशा धरतात ते.”
तुकाराम महाराजांनी पारंब्या अधिकच घट्ट धरून ठेवल्या आणि चेहऱ्यावर मिश्किल भाव आणून म्हणाले,
“असं कसं बोलतोस भिवबा? तू सुद्धा नेहमी म्हणतोस ना की संसाराने तुला धरून ठेवलंय म्हणून पंढरीला जाता येत नाही. तसंच
मला या पारंब्यांनी धरून ठेवलंय. तूच सोडव रे आता मला…”
भिवबा वरमला. तुकाराम महाराजांच्या पाया पडला आणि त्या वर्षी सर्व कामं दूर ठेवून
वारीला गेला.

तुकाराम महाराजांच्या चरित्रातली ही एक गोष्ट. तुम्ही पूर्वी वाचली-ऐकली देखील असेल. पण पुन्हा वाचली-ऐकली म्हणून काही बिघडत नाही. या गोष्टीतून आपल्यासारख्या सामान्यांसाठी निघणारा मतितार्थ महत्त्वाचा. आपण सर्वसामान्य माणसं त्या भिवबासारखीच वागतो असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्यालाही बरंच काही करायचं असतं. पण आपल्याला त्यासाठी वेळच नसतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं म्हणजे आपण फार “बिझी.” असतो.

डॉक्टर सांगतात, “वजन कमी करा. सकाळी चालायला, धावायला जा.” आपल्यालाही ते पटतं. आपलं पोट सुटत चाललंय याची आपल्यालाही जाणीव असते. सहा महिन्यांपूर्वी शिवलेले कपडे आपल्याला आता घट्ट घट्ट होताहेत हे आपल्यालाही उमगतं. पण… पण सकाळी आपल्याला उठवत नाही. अंथरुणातून उठायलाच उशीर होतो. कारण…
कारण आपल्याला टीव्हीवर रात्री उशिरापर्यंत चालणारे लहान मुलांच्या नाचगाण्यांचे कार्यक्रम आणि सासू-सुनांच्या सीरिअल बघायच्या असतात.

रतिब घातल्यासारखे वर्षभर चालणारे क्रिकेटच्या मॅचेस बघायच्या असतात. कसली कसली ॲवॉर्ड फंक्शन्स बघायची असतात. झालंच तर नेटफ्लिक्सवर आणि इतर अमेझॉन प्राइमवरच्या सीरिज बघायच्या असतात. असे अनेक करमणुकींचे कार्यक्रम फक्त बघायचे असतात… जे बघून निव्वळ टाइमपासशिवाय काहीही साध्य होत नाही असं बरंच काही आपण केवळ “बघत” बसतो. रात्रीची निरर्थक जाग्रणं आपल्याला सहज शक्य होतात पण सकाळी उठून चालायला पळायला जायचं मात्र जिवावर येतं. सकाळचा व्यायाम करायचा असतो पण… कथी वाटतं की, आपल्या जुन्या शाळेतल्या मित्रांचे पत्ते मिळवावेत सगळ्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन भरवावं. ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. पण… पण आपल्याला वेळ नसतो. कारण… कारण आपल्याला ऑफिसात कामं असतात. यंदा आपलं प्रमोशन ड्यू असतं. त्यामुळे काम नसलं तरी ऑफिसात थांबून बॉससमोर खूप काम असल्याचं नाटक करावं लागतं. गरज नसतानाही टाइमपास करावा लागतो.

कधी वाटतं की मुलाबाळांबरोबर कुठंतरी बाहेगावी गावं. रानावनात हिंडावं. कुटुंबासमवेत निसर्ग अनुभवावा. मुलांच्या सहवासात मूल व्हावं. निरभ्र आकाशातल्या चांदण्या पहाव्यात. पण आपल्याला ते जमत नाही. कारण नेमकी त्यावेळी वल्ड कपच्या “डे अँड नाईट” मॅच सुरू झालेल्या असतात. कधी वाटतं की गाणं शिकावं. एखादं वाद्य वाजवायला शिकावं. एखादी नवी भाषा शिकावी. कधी वाटतं की यंदा दिवाळीला फटाके न उडवता, नवीन कपडे न शिवता ती रक्कम भाऊबीज म्हणून एखाद्या अनाथ महिलाश्रमाला द्यावी. पण… पण नाही जमत. बऱ्याच अडचणी येतात.

आपल्याला जी कामं करावीशी वाटतात ती न करण्यासाठी आपण जी कारणं पुढे करतो ती कारणं खरोखरीच गंभीर स्वरुपाची असतात का? की आपण काहीतरी सबबी सांगून कामं टाळतो? नीट विचार केला तर जाणवेल की, आपल्या बहुतेक अडचणी या आपण स्वतः निर्माण केलेल्या आहेत. अडचणींच्या पारंब्यांना धरून आपण लोंबकळतो आणि ओरडतो. “वेळ नाही. वेळ नाही.” बहुतेक अडचणी मानसिक असतात, काल्पनिक असतात. त्यावर मात करण्यासाठी गरज असते ती प्रखर दृढनिश्चयाची, जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची. इंग्रजीत एक वचन आहे. If you really want to do something, you will find a way. But if you do not want to do it, you will find an excuse.

आपल्याला कामं करायची नसली की, अनेक सबबी सापडतात. मग आपण अडचणींचा पाढा वाचून दाखवतो. आपल्याला अडचणींवर मात करता येत नाही कारण, आपल्याकडे ती इच्छाशक्ती नसते. इच्छाशक्ती नसल्यामुळे आपण अनेक कारणं शोधून काढतो. एकदा का माणसाला कारणं शोधायची सवय झाली की तशा प्रकारची कारणं सापडत जातात… त्या कारणांची ढाल पुढे काढून आपण आपण आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करतो. सबबी शोधतो. पुढे पुढे तर हा नाकर्तेपणाच माणसाच्या जीवनाचा स्थायीभाव बनतो. कारणं शोधायची सवय हाडीमाशी खिळते. शोधलेली कारणं खरी आहेत असं स्वतःलाच वाटू लागलं. मग टीव्हीवरची मालिका पहाणं ही करमणूक न रहाता गरज बनते. व्यसन बनते. नाही पाहिली तर कसंतरीच होतं. इतर कोणत्याही कामात मन लागत नाही. मालिकेतील त्या अमुक तमुक पात्राचं काय झालं असेल? या कल्पनेनं जीव धास्तावतो. वास्तवीक ती सगळी पात्रं खोटी असतात, पण आपण त्यांना खरी समजून त्यांच्या सुखदुःखावर आपलं सुखदुःख अवलंबीत करून टाकतो. एकदा लागलेलं हे व्यसन सुटता सुटत नाही. वेळ वाया जातोच जातो, पण इतर महत्त्वाची कामं रखडतात. सहज आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो.

दोन साधू नदीकिनारी स्नान करीत होते. तेवढय़ात त्यांना नदीच्या पात्रात एक कांबळं वहात येताना दिसलं. दोघांपैकी एका साधूला त्या कांबळ्याचा मोह झाला. तो म्हणाला, “कांबळं चांगलं दिसतंय. आपल्याच दिशेनं तरंगत येतंय चटकन पोहत जातो आणि पटकन घेऊन येतो.” दुसरा म्हणाला, “अरे आपण संन्यासी मंडळी. कोणत्याही गोष्टीचा संग्रह करायचा नसतो. शिवाय हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. कांबळ्याची गरजच काय आपल्याला?”

तरीही तो पहिला साधू ऐकेना. त्याने नदीच्या पात्रात उडी घेतली आणि पोहत पोहत त्या कांबळ्याजवळ गेला. एका झटक्यात त्याने त्या कांबळ्याचं एक टोक धरलं आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की ते कांबळं नव्हतं. ते नदीच्या पात्रात पोहोणारं एक अस्वल होतं. पण तोवर खूप उशीर झाला होता. त्या अस्वलाने साधूचा हात धरून त्याला आपल्याबरोबर पाण्यात ओढून न्यायला सुरुवात केली होती. साधू “ वाचवा, वाचवा.” असं ओरडू लागला. किनाऱ्यावरच्या साधूला नेमकं काय झालं हे कळलं नाही. त्याने किनाऱ्यावरूनच ओरडून सूचना दिली, “अरे ते कांबळं सोड आणि परत ये.” त्यावेळी बुडणारा तो साधू असहाय्यतेनं ओरडून म्हणाला, “अरे मी तर ते कांबळं केव्हाच सोडलंय. पण आता मलाच त्या कांबळ्यानं धरलंय. ते कांबळंच मला सोडत नाहीये रे.”

आपल्या सवयी, आपली व्यसनं आपल्या ताब्यात आहेत, असं वाटलं तरी त्या एका कालानंतर आपल्या ताब्यात रहात नाहीत. मग हे व्यसन टीव्हीवरच्या बिनडोक मालिका पहाण्याचं असो किंवा क्रिकेटच्या बारमाही मॅच पहाण्याचं असो. काहीही कारण नसताना उगाचच शॉपिंग किंवा विंडोशॉपिंग करीत निरर्थक भटकण्याचं असो किंवा एखाद्या बुवा-बाबाच्या सत्संगात जाऊन भजन-कीर्तनात जाऊन बसण्याचं असोत. व्यसन हे केवळ सिगारेट-तंबाखूचं किंवा दारूचं नसतं. वरकरणी निरुपद्रवी भासणारी इतर अनेक प्रकारची व्यसनं आपला वेळ खात असतात.

अलीकडच्या काळात जगभरातील लहान थोरांना आणखी एक व्यसन लागलंय. ते व्यसन आहे सोशल मीडियाचं. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सुरुवातीला उपयुक्त वाटणाऱ्या पण चटक लावणाऱ्या व्यसनाच्या भोवऱ्यात माणूस गुरफटला की, त्याची सुटका होणं जवळजवळ अशक्य. तुम्ही फेसबुकचं एखादं पेज उघडलं की झालं. बघता बघता मेंदू बधिर होतो आणि एकातून दुसऱ्यात अशा पोस्ट बघता बघता, त्या पोस्टना लाइक्स देता देता किती वेळ निघून गेला हे समजतच नाही. अनेकांना तर इकडच्या तिकडच्या पोस्ट आणि प्रत्येक व्यक्तिगत अनुभवाचे फोटो शेअर करतात आणि त्याला किती लाइक्स मिळाले ते मोजून धन्यता मानतात. पोस्टला मिळालेल्या लाइक्समुळे आपली लायकी वाढते असा आपण सोयीस्कर समज करून घेतलेला असतो.

व्हॉट्सॲपबद्दल तर काही विचारायलाच नको. अनेक ग्रुपचे आपण सभासद असतो. त्या ग्रुपमधल्या अनेकांना आपण प्रत्यक्ष कधीही भेटलेले नसतो. पण तरीही त्यांच्या वाढदिवसाला केकचे फोटो आणि फुलांच्या गुच्छाचे फोटो पाठवून आपण त्यांना विश करतो. ग्रुपवर आलेले प्रत्येक व्हीडिओ डाऊनलोड करून बघतो, आणि पुढे पाठवतो. त्याशिवाय दररोज सकाळी गुडमॉर्निंग आणि रात्री गुडनाईट आहेच. हे सगळं करण्यात दिवसाचे किती तास वाया जातात याचा हिशेब केला तर…
तर त्या वाचवलेल्या वेळात आपण इतर बरंच काही करू शकतो. ग्रुपवर गुड मॉर्निंग पाठवण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा इतर काही विधायक काम केलं, तर आपली मॉर्निंगच नव्हे तर अख्खा दिवस “गुड” होऊ शकेल. पण…
पण… हे सांगून कुणाला पटत नाही. इंटरनेटचा पॅक फुकट मिळतोय ना… तो वापरायलाच हवा.
इंटरनेटचा पॅक जरी फुकट मिळाला तरी आपला वेळ अमूल्य असतो. तो अशा व्यसनात वाया घालवायचा नसतो. पण… हे सांगून समजत नाही. कळलं तरी वळत नाही.
व्यसनाच्या अस्वलाने मिठी मारली की, त्यातून सुटका होणं कठीण म्हणूनच मनात योजलेली विधायक कामं टाळण्यासाठी सबबी शोधण्याचं व्यसन लागण्याआधीच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. स्वतःला वेळीच बदलावं. सुधारावं. नाहीतर मनात योजलेली बरीच कामं कामं तशीच राहून जातील. एक संस्कृत श्लोक आहे…
नष्टंद्रव्यं प्राप्यते उद्यमेन।
नष्टाविद्या प्राप्यते अभ्यासयुक्त्या।
नष्टारोग्यं सूपचारे सुसाध्यं।
नष्टा वेला या गता सा गतैव।।

भावार्थ : धन नाहिसं झालं, तर उद्योग करून ते पुन्हा प्राप्त करून घेता येईल. विद्या नष्ट झाली, तर पुन्हा अभ्यास करून ती मिळवता येईल. आरोग्य हरवलं, तर योग्य ते उपचार करून पुन्हा प्राप्त करून घेता येईल. पण एकदा का वेळ निघून गेली की ती गेलीच. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येणार नाही.

टाइमपासच्या बाबतीत सांगायचं, तर टाइम आयुष्यातून पास होतो आणि टाइमपास करणारा मात्र आयुष्यात फेल होतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारचा टाइमपास करताना मनात योजलेल्या कामांच्या यादीचं थोडं भान राखायला हवं. एका तत्त्वज्ञाने म्हटलेच आहे की, “केवळ मनात विचार ठरवून काहीही साध्य होत नाही. मनातले विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे लागतात. त्यासाठी आत्मपरीक्षण करून, वेळेचं योग्य नियोजन करून प्रत्यक्ष कृती करावी लागते.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -