Friday, May 3, 2024

भाषेचा आवाज

डॉ. वीणा सानेकर

आपण भाषेच्या आधारे बोलतो. आपण भाषा ऐकतो. सगळे जग भाषेच्या डोळ्यांनी पाहतो. समजून घेतो. आपली भाषा ही आपली दुर्बिण असते. तिच्या सहाय्याने आपण जगाचे कोन न्याहाळतो किंवा कोनाकोनातून जग न्याहाळतो. मात्र आपण भाषेला किती समजून घेतो ?

तिचा प्रवास किती जाणून घेतो? कवी वसंत बापट यांनी म्हटले आहे, ‘कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर पण माझाच.’
मानवतेला करुणेने भारून टाकणाऱ्या महाकवींबद्दल जरी मला आदर असला तरी माझ्या ज्ञानदेवांबद्दलचा अभिमान वेगळाच! माझा मराठाचि बोलु कवतिके परि अमृतातेहि पैजा जिंके…

असे ठामपणे व्यक्त करणारे संत ज्ञानेश्वर मराठीचं रोपटं रुजावं, बहरावं म्हणून मराठीतच रचना करतात. मराठीचा वेलू गगनापर्यंत जावा म्हणून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग, गौळणी असा मायबोलीतला आविष्कार पाहताना मन थक्क होते.

संत नामदेव पार पंजाबापर्यंत भक्ती चळवळ नेतात, तर ‘तुकाराम आम्हा घरी धन शब्द हेचि शस्त्र…’ असे म्हणत शब्दांचा गौरव करतात. संत एकनाथ लोक संस्कृतीचा सखोल अभ्यास करतात आणि रंजनातून अंजन घालतात. फटका, ओवी, अभंग, भारुड, कटाव असे विविध रचनाबंध योजतात.

महाराष्ट्री असावे, अशा भूमिकेतून महानुभावी संत या भूमीसकट मराठी जपतात. मराठीची समृद्ध परंपरा घडवणारी मांदियाळी मोठी आहे. या सर्वांनी आपल्या भाषेचे गूज वेळोवेळी ऐकले. कुणी तिचे धारदार ओजस्वी सामर्थ्य जाणले, तर कुणी तिचे कुसुमांकित कोवळेपण जपले. शिवाजीराजांनी मराठीतून राज्यव्यवहार व्हावा म्हणून कर्त्या सिंहासनाधीश्वराची भूमिका चोखपणे पार पाडली. मुस्लीम राजवटीत घुसमटलेल्या मराठीचा श्वास मोकळा केला.

आपल्या राष्ट्रावर झालेले इंग्रजांचे आक्रमण पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्राण तळमळत होते. आपल्या भाषेवर आक्रमण होऊ नये म्हणून त्यांनी आपली सर्व शक्ती एक केली. चोराप्रमाणे आत शिरलेल्या परकीय शब्दांचे उच्चाटन करून त्या जागी आपल्या भाषेची प्रतिष्ठापना करण्याकरिता सावरकर अविरत झटले. भाषाशुद्धीचे आंदोलनच त्यांनी हाती घेतले.

एक प्रकारे हे आंदोलन बौद्धिक गुलामगिरीविरुद्धचे आंदोलन म्हणायला हवे. आपण इंग्रजांच्या राजवटीत फार मोठा काळ राहिलो. त्यांच्या राजवटीवरचा सूर्य मावळत नाही, असे म्हणताना आपल्या भूमीवरचा अंधार सोसत राहिलो. सावरकरांसारख्या युगपुरुषांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवला. आपल्या भाषेत व्यक्त होण्याकरता आपणच शब्दनिर्मिती केली पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. आपली भाषा हा आपला मानबिंदू आहे, हे मराठी मनांवर ठसवले.

ही केवळ काही नावे. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अशा व्यक्तींनी भाषेचा आवाज ऐकला म्हणून आपली भाषा जगली. त्या त्या कालपटावरची भाषेसमोरची आव्हाने वेगवेगळी होती.

ती ओळखून आपल्या भाषेचे जतन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न माणसांनी कसे केले, हे मागे वळून अभ्यासण्यासारखे आहे. त्या अभ्यासाचा उपयोग आता नि पुढेही आपल्याला होणार आहे.

आजची आव्हाने वेगळी आहेत. आयुष्य इतकी गतिमान झाली आहेत की, माणसांना एकमेकांचा आवाज ऐकायला वेळ नाही. मग भाषेचा आवाज ऐकणे ही तर दूरचीच गोष्ट राहिली. त्यात आपणच आपल्या भाषेला दुबळे करत गेल्याने तिचा आवाज अधिकच क्षीण होत गेलेला!

जग हे वैश्विक खेडे करण्याचा डाव चारी बाजूंनी मांडला गेला आहे. सगळे काही एकसारखे कसे होईल? निसर्गाने त्याची विविधता सोडली नाही. प्रत्येक देश, राज्य नि भूमीची स्वतंत्र वैशिष्ट्ये असतातच आणि ते वेगळेपण ती-ती भूमी आनंदाने मिरवते. प्रत्येक भूमीची भाषा वैशिष्ट्येही वेगवेगळी असतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणूनच जगाची भाषा एकमेव होऊ शकत नाही.

हजारो बोली नि भाषांचे अनेक आवाज जगात विखुरलेले आहेत. त्यांच्या मेळाने मानवी जीवन सुंदर झाले आहे. आपली भाषा जर भविष्यात आपल्याला हवी असेल, तर तिचा आवाज आधी ऐकला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -