Sunday, May 12, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘संघा’ने द्वेष पसरवला नाही 

‘संघा’ने द्वेष पसरवला नाही 

श्रीपाद कोठे जेष्ठ पत्रकार

आदरणीय डॉ. अभय बंग,
नमस्कार…

नागपूरला महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात आपण केलेल्या भाषणाचे वृत्त वाचून धक्का बसला. गडचिरोली जिल्ह्यात शोधग्राम चालवणारे, बालमृत्यूवर मोठं काम करणारे, त्यासाठी जागतिक स्तरावर मान्यता असलेले ही ओळख तर आहेच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपण आला होता, हेही मला माहिती आहे. त्या कार्यक्रमातलं तुमचं भाषणही मी ऐकलेलं आहे. ते भाषण फार काही आठवत नाही. पण दोन दिवसांपूर्वी तुम्ही संघाबद्दल जे काही बोलला तसं मात्र त्या भाषणात काही नव्हतं एवढं मी नक्की सांगू शकेन. याशिवाय… साधारण १७-१८ वर्षांपूर्वी मी तुमची मुलाखत घ्यायला शोधग्रामला आलो होतो. त्यावेळचे तुम्ही मला नीट आठवता. विषय फारच वेगळे आणि मोठे होते. खूपसं बोलणं वैचारिक, तात्त्विक असंच होतं. चर्चेदरम्यान तुम्ही काढून दाखवलेल्या यिन यांगच्या आकृती वगैरे पूर्ण लक्षात आहेत. एक संयमी, विचारशील, व्यापक चिंतन करणारा; अशी एक प्रतिमा माझ्या मनात आहे. ती अजूनही तशीच आहे. मात्र ,संघाबद्दलचे आपले मत चुकीचे व निराधार आहे.

संघाने द्वेष पसरवला, विशेषतः हिंदू आणि मुस्लीम समाजात द्वेष निर्माण केला. हा आपला मुख्य आरोप आहे. संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही हाही आपला एक आणखीन आरोप आहे. या दुसऱ्या आरोपाबाबत मला फार काही म्हणायचं नाही. त्याबद्दल संघ आणि अनेक संघ अभ्यासक लिहीत असतात, बोलत असतात. माझं याबद्दल थोडं वेगळं मत आहे. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय? फक्त आंदोलन? तसं असेल तर कोट्यवधी भारतीय त्यात नव्हते. दुसरं – स्वातंत्र्य म्हणजे जसे इंग्रजांपासून राज्यव्यवस्था स्वतःकडे घेणे होते तसेच इथला समाज उभा करणे हेही होते. अनेकजण काँग्रेसपासून दूर राहून ते करत होतेच. संघ आपल्या पद्धतीने करत होता. काँग्रेसच्या झेंड्याखाली न आलेले अनेकजण या देशात होते. ते सगळेच स्वातंत्र्यलढ्यापासून दूर होते आणि म्हणून त्यांना देशाशी काही घेणे-देणे नव्हते, असे म्हणणार का? कथित समाजवादी वा अन्य काही गट आपापल्या स्वार्थासाठी काँग्रेस अंतर्गतच स्वतःचे वेगळे झेंडे फडकवीत राहिले. त्यामुळे ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते असं समजलं जातं. पण संघाने आपला झेंडा न फडकविता, वेगळी चूल न मांडता, वेगळी प्रदर्शनीय ओळख न दाखवता काँग्रेसच्या नेतृत्वातच काम केले; तर संघ स्वातंत्र्यलढ्यात नव्हता? हो, एका अर्थाने तो नव्हता. कारण स्वातंत्र्यासाठी लढताना आपलं वेगळं अस्तित्व दाखवून श्रेय घेण्याची हिणकस वृत्ती संघाकडे नव्हती.

संघाने द्वेष पसरवला, त्यासाठी त्याची शंभर वर्षांची योजना होती. इत्यादी अनाकलनीय आरोप आपण केले. अहो डॉक्टर, एखादं सर्वशक्तिमान सरकारदेखील शंभर वर्षांची कोणतीही योजना करत नाही, करू शकत नाही अन् एखादी संघटना जवळ साधने नसताना, लोक हा floating घटक असताना, कशाच्या भरवशावर अशी योजना करेल? बरं, तुमच्या आरोपांना आधार तरी काय? काय आधार आहे की संघाने द्वेष पसरवला? अयोध्येतील विवादित इमारत पाडली हा आधार? गुजरात दंगली हा आधार? की आणखीन काही आधार? ज्या दोन घटनांचा मी उल्लेख केला आहे त्याची समाजात, विचारवंतांमध्ये, न्यायालयात सगळीकडे इतकी चिरफाड झाली आहे की, शहाण्या माणसाला ती पुरेशी ठरेल. पण आम्ही अमुक अमुक निष्कर्ष आमच्या मनाशी पक्का केलेला आहे अन् तो आम्ही तहहयात सोडणार नाही; असा दुराग्रह असेल, तर त्यावर या जगात आजवर तरी कोणताही उपाय सापडलेला नाही.

द्वेषाचं आयुष्य फार थोडं असतं अन् द्वेषाला लपून-छपून काम करावं लागतं. जगभरातली शेकडो उदाहरणं देता येतील. संघ लवकरच शंभर वर्षे पूर्ण करणार आहे अन् तो उघडपणे काम करतो, ही एकच गोष्ट संघ द्वेष शिकवत नाही, हे सिद्ध करायला पुरेशी आहे. द्वेषाचं आणखी एक गुण म्हणजे, ते अल्पसंख्य असतं. द्वेष करणाऱ्या व्यक्तीला वा संस्थेला माणसं मिळत नाहीत. मिळू शकत नाहीत. कारण तुम्हाला, मला किंवा जगात कोणाला काय वाटतं, यापेक्षाही एक नैसर्गिक तत्त्व सत्य आहे; ते म्हणजे सामान्य माणूस द्वेषापासून दूरच असतो. त्याचा चांगल्या वाईटाचा विवेक फार मोठा असतो अन् त्याला सुखी शांत जीवन जगायचं असतं. त्याला द्वेषाचे झमेले नको असतात. पापभिरू असतो. संघ द्वेष शिकवत राहिला असता, तर कोणी स्वतः संघात आले नसते आणि आपल्या पोराबाळांना कोणी संघात पाठवलं नसतं. संघाच्या प्रेरणेने चालणाऱ्या सुमारे तीन डझन संस्था आहेत. त्यात सगळ्या समाजघटकांचे, सगळ्या जातीपातींचे, सगळ्या आर्थिक स्तरातले, एवढेच नाही तर सगळ्या उपासना पद्धतीचे पुरुष आणि स्त्रियाही सहभागी असतात, सक्रिय असतात. माझं खुलं आव्हान आहे, कोणीही द्वेषाच्या आधारावर कार्य करावं आणि एवढी माणसं जोडून आणि टिकवून दाखवावी. बरं तर बरं. संघाशी संबंध नसलेले अनेक लोक, त्यांची आंदोलने, त्यांच्या संस्था, हेही संघाशी समन्वय ठेवतात, संपर्क ठेवतात. सगळेच मूर्ख आणि सगळेच द्वेष्टे, असं म्हणणं अजिबातच शहाणपणाचं नाही म्हणता येणार.

आणखीनही खूप काही सांगता येईल. देशभरातील अनेक संकटांच्या, आपत्तीच्या वेळी संघाने केलेलं सेवेचं काम हे तर उघडं पुस्तक आहे. त्या त्या वेळी संघाने कधीही जातीपातीचा, उपासना पद्धतींचा विचार केला नाही. हरयाणातील चरखी दादरी येथे झालेला विमान अपघात, तर ठळक उदाहरण आहे. असंख्य वेळा संघाच्या स्वयंसेवकांनी मुस्लिमांचे अंत्यसंस्कार त्यांच्या पद्धतीने पार पाडले आहेत. रमजान असेल, तर त्यांच्या जेवणाची त्यानुसार व्यवस्था केलेली आहे. द्वेष शिकवून अशी मने तयार होतात का?

दिल्लीच्या विज्ञान भवनात संघाचे सरसंघचालक जाहीरपणे सांगतात की, मुस्लीम exclude करणे हे हिंदुत्व असूच शकत नाही किंवा राम जन्मभूमीचा निकाल लागतो त्यावेळी ते जाहीर वक्तव्य करतात की, हा जय-पराजयाचा विषय नाही. एक समस्या संपली एवढेच. हा द्वेष असतो का? एकीकडे पॉप जॉन पॉल राजधानीत येऊन घोषित करतात की, आम्हाला आशिया ख्रिश्चन करायचा आहे, तरीही संघ हा ख्रिश्चन प्रतिनिधींशी चर्चा करतो. सरसंघचालक त्या प्रतिनिधींसह जेवतात; मुस्लीम प्रतिनिधींशी चर्चा होते तेव्हा, नमाजाच्या वेळेला संघाच्या कार्यालयात त्यांना जागा दिली जाते, हे सगळे म्हणजे द्वेष? द्वेष या शब्दाचा अर्थच तुम्ही बदलून टाकला की हो!! की तुमचा शब्दकोशच वेगळा आहे? बरं क्षणभर, अगदी क्षणभर, चर्चेपुरतं धरून चालू की, संघाने द्वेष पसरवण्याची योजना केली आहे. मग तुमच्यासारख्या देशाची, मानवतेची चिंता वाहणाऱ्या लोकांचे काम काय असू शकते? हे द्वेष कमी करणे आणि त्यासाठी संवादाची प्रक्रिया सुरू करणे? मला सांगा, डॉ. बंग, काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी, सर्वोदयी किंवा आणखी कोण कोण असतील, त्यांच्यापैकी कोणी आणि कधी संघ आणि मुस्लीम वा संघ आणि ख्रिश्चन यांच्यात संवादाचे पूल उभारण्याचा प्रयत्न केला? तुम्ही म्हणता तसे खरेच असेल, तर त्यातून मार्ग कसा निघणार? त्यासाठी तुम्ही काय केले? खरे तर संघाचा विवेक कौतुकास्पदच नव्हे, अनुकरणीय आदर्श आहे. संघाला ७५ वर्षे पूर्ण झाली होती. साधारण त्या सुमारास संघाला विश्वास निर्माण झाला की, आता संवाद करायला हरकत नाही. तेव्हा त्यावेळच्या सरसंघचालकांनी पुढाकार घेत हिंदू-मुस्लीम संवादाची प्रक्रिया सुरू केली. आज त्याचा देशव्यापी मुस्लीम राष्ट्रीय मंच आकाराला आला आहे. हे द्वेष भावनेतून होते का? बाकी संघाच्या कार्यक्रमांमध्ये, शिबिरांमध्ये, संघप्रेरित संस्थांमध्ये; मुस्लीम स्त्री-पुरुष येत असतात ते वेगळेच. तुम्ही नाटक, साहित्य वगैरेचाही उल्लेख केला आहे. तुम्हाला हे सांगायला हवं की, कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीच्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात मुस्लीम महिला आपल्या मुस्लीम मुलांना कृष्णरूपात सजवून आणत असतात. त्यांनाही चालतं अन् यांनाही चालतं. संघाचे विद्यमान सरसंघचालक निरनिराळ्या लोकांना भेटतात. त्यात उस्ताद राशीद खान आणि उस्ताद अली अकबर खान यांचाही समावेश असतो. संघाचे १९५१ पासूनचे प्रतिनिधी सभेचे श्रद्धांजली अहवाल वाचून पाहा. सगळ्या राजकीय पक्षांचे लोक; सगळ्यांचे उल्लेख सापडतील. संघाला विरोध करणाऱ्या कितीजणांनी संघाबाबत एवढी उदारता दाखवली आहे.

बाकी जाऊ द्या, पण तुमच्यासारखीच सेवेची कामे करणारी संघाची अनेक मंडळी आहेत. त्यांना संघ कधीच बोचत नाही. यांच्याशी तरी मनमोकळी चर्चा करून संघ समजून घेण्याचा प्रयत्न आपण वा आपणासारख्यांनी केला आहे का कधी? डॉक्टर, आपली एक प्रतिमा आहे. मुख्य म्हणजे, आपल्याबद्दल पूर्ण आदर राखूनही एक प्रार्थना करेन, संघ समजून घ्या. फॅशनेबल प्रवाहात वाहून जाऊ नका.

नागपूरमध्ये रविवारी झालेल्या ‘गांधी विषय’ या ग्रंथांच्या प्रकाशनावेळी ज्येष्ठ गांधीवादी डॉ. अभय बंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना, त्यांच्याकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज रोवले, अशी टीका केली. त्यांच्या टीकेला ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद कोठे यांनी दिलेले सडेतोड उत्तर…

(संदर्भ – विश्व संवाद केंद्र विदर्भ; मंगळवार, १२ एप्रिल २०२२)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -