Tuesday, May 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनंतर...

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनंतर निकाल!

दोघांना जन्मठेप आणि सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या (Murder case) करण्यात आली होती. यानंतर आता तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून जन्मठेप सुनावली आहे, तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यांच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे विशेष न्यायाधीशांनी निकालात म्हटले.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष सोडले आहे. आरोपी संजीव पुनाळेकर यांनी मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. विक्रम भावे यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. तर शरद कळसकर आणि सचिन अंदूरे यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणखी वाढणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

कधी करण्यात आली होती हत्या?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -