Monday, June 3, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यVoting celebration : चला मतदानाचा उत्सव साजरा करू या...!

Voting celebration : चला मतदानाचा उत्सव साजरा करू या…!

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याची जबाबदारी लोकशाहीच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक आहे. मात्र मतदान करणे सरकारने बंधनकारक केले नसले, तरी देशातील नागरिकांनी पुढे येऊन, हे कर्तव्य स्वेच्छेने पार पाडणे, ही नैतिक जबाबदारी आहे. सरकार किंवा त्यांच्या कोणत्याही धोरणाप्रति नागरिकांना नाराजी व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असला, तरी मतदान हे एखाद्याचा आवाज नोंदवण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. देशातील नागरिकांचा आवाज किंवा जनादेश हा सत्ता बदलासाठी सर्वात मोठा आवाज असू शकतो. भूतकाळात अशी असंख्य उदाहरणे देता येतील की, देशातील नागरिकांनी काम न करणाऱ्या सरकारला घरी पाठवून देशात आवश्यक ते बदल घडवून आणण्यास भाग पाडले आहे.

असे बरेच लोक आहेत, ज्यांना असे वाटते की, त्यांच्या मताने काही फरक पडत नाही आणि म्हणून ते मतदान करण्यासाठी निरुत्साहीपणा दाखवतात; किंबहुना ते स्वतःची मतदार नोंदणी देखील करत नाहीत. तथापि आपण बऱ्याचदा हे विसरतो की, एका मताचा फरक हा चांगले सरकार आणि वाईट सरकार, सक्षम आणि मजबूत व कमकुवत यांच्यातील एक फरकही असू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने साहजिकच मतदान हे मूलभूत कर्तव्य म्हणून मानले पाहिजे. याला काही लोक गेम चेंजर पर्याय म्हणूनही संबोधतात. तसेच अशी काही प्रकरणेही असू शकतात, जेव्हा मतदाराला असे वाटते की, निवडणूक लढवणारा कोणीही उमेदवार त्याच्या किंवा तिच्या मतास पात्र नाही. अशा परिस्थितीसाठी भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये वरीलपैकी काहीही नाही म्हणजेच नोटा हा पर्याय दिला आहे. बहुसंख्य मतदारांना असे वाटत असेल की, उमेदवार सत्तेसाठी संधी देण्यास पात्र नाहीत, तर या नोटाच्या पर्यायामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे नव्या उमेदवारांसह नव्याने निवडणुका होतील. इतकी या लोकशाही देशातील जनतेच्या जनादेशाची ताकद आहे.

मतदानाचा हक्क अभिमानाच्या भावनेशी निगडित आहे, विशेषत: तरुण मतदार किंवा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी विविध सोशल मीडियावर त्यांच्या शाई लावलेल्या बोटाचे चित्र शेअर करून त्यांची जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येते. आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्याचा हा उदात्त मार्ग आहे, ज्यांनी आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले आणि अत्यंत कष्ट घेतले. भारतीय निवडणूक आयोगाने देखील मतदार जागरूकता वाढवण्यासाठी आणि देशभरातील नागरिकांमध्ये मतदानाची गरज आणि महत्त्व वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. अशा उपक्रमांचे परिणाम वर्षानुवर्षे वाढत्या मतदानात दिसून येत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. चला तर मग आपणही आज याच पूर्वाश्रमीच्या आदर्शांचा अभिमान बाळगू या व मतदानाला घराबाहेर पडू या.

मतदान करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकतात. मात्र दिव्यांग नागरिक पोहोचू शकत नाहीत. ते मतदानासारख्या कार्यापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने बऱ्याच तरतुदी केल्या आहेत.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अानुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५+ वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयी-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन मुंबई शहर जिल्हा व उपनगर निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशी काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग मतदारांकरिता एक दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे दहा दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बस सेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता १० लो फ्लोर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आलेले आहेत.प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रानुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी मार्ग नकाशा उपलब्ध करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता ५ व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक साहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण १३ दिव्यांग मित्र नियुक्त केलेले आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे अरुंद रस्त्यामध्ये बसेस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय एक टॅक्सी म्हणजेच एकूण दहा टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे. आज मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन, आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मंगळवार, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्रांवर ‘या’ सुविधा उपलब्ध

मुंबई शहर जिल्ह्यात असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधेची खात्री अंतर्गत मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप, प्रसाधन गृह, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका (Ramps), स्वयंसेवक, व्हीलचेअर्स व विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार माहिती स्लिपचे वाटप सर्व नोंदणीकृत मतदारांना करण्यात आले आहे. त्यामुळे चला लोकशाहीच्या या उत्सवात आपण सहभागी होऊ या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -