Friday, May 3, 2024
Homeकोकणरत्नागिरीरत्नागिरीतील शासकीय दूध डेअरीला अखेर टाळे

रत्नागिरीतील शासकीय दूध डेअरीला अखेर टाळे

अल्पदरामुळे जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्थांनी फिरवली पाठ

रत्नागिरी (प्रतिनिधी) : बाजारात दूधाचे दर गगनाला भिडलेले असताना शासकीय दूध डेअरीमार्फत अल्पदर दिला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्था खासगी दूध डेअरीकडे वळल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील शासकीय दूध डेअरी अखेर बंद पडली आहे. बुधवारपासून दूध पुरवठा बंद झाल्याने दूध डेअरीला कुलूप लागण्याची वेळ आली आहे. मात्र याकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन विभागांत शासकीय दूध डेअरी कार्यरत होती. सर्वप्रथम रत्नागिरीतील उद्यमनगर एमआयडीसीत, तर दुसरी चिपळूण येथे दूध डेअरीमार्फत हजारो लिटर दूध संकलन करून त्याची जिल्ह्यात विक्री केली जात होती. उद्यमनगर येथील दूध डेअरीत हजारो लिटर दूधावर प्रक्रिया केली जात होती.

मात्र कालांतराने त्यांना जागा अपूरी पडू लागल्यानंतर सन १९९०मध्ये मिरजोळे एमआयडीसीत नवी इमारत उभारून तेथे नवी शासकीय दूध डेअरी सुरू करण्यात आली होती. तिथे हजारो लिटर दूध लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातून संकलीत करून त्यावर प्रक्रिया करून रत्नागिरी शहरात, तर काही प्रमाणात चिपळूण येथील डेअरीला पाठविण्यात येत होते. आज हीच दूध डेअरी बंद झाली आहे.

गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत दुग्ध संस्था दूध संकलनासाठी कोकणात उतरल्यानंतर त्यांनी शासकीय दूध डेअरीपेक्षा जास्त दर दुग्ध संस्थाना देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित केले. पूर्वी रत्नागिरी शासकीय दूध डेअरीला ३३ संस्था दूध पुरवठा करत होत्या. जुलै महिन्यात त्यातील ३२ संस्थांनी कोल्हापूरातील दूध संस्थांना दूध पुरवठा सुरू केला. त्यानंतर लांजातील केवळ एक संस्था शासकीय दूध डेअरीला १४०० लिटर दूधाचा पुरवठा करत होती. त्यावर दूध डेअरी सुरू होती.

मात्र खासगी दूध डेअरी चालक लिटरला ३३ दर देत आहेत, तर शासकीय दूध डेअरीतून केवळ २५ रु. दर लिटरला मिळत असल्याने एकमेव लांजातील संस्थेनेही दूध पुरवठा बंद करून खासगी दूध डेअरील दूध पुरवठा सुरू केला. त्यामुळे शासकीय दूध डेअरील होणारा दूध पुरवठा बंद झाल्याने दूध डेअरी बंद करण्याची वेळ आली आहे.

खासगी डेअरीमार्फत दर दहा दिवसांनी दूधाचे पैसे दिले जातात. शासकीय दूध डेअरीमार्फत निधी आल्यानंतर संस्थांना पैसे दिले जातात. रत्नागिरीतील दूध डेअरीमार्फत ऑगस्टपासून सुमारे ३२ लाखांचे देणे एका दूध डेअरीचे असल्याने अखेर त्यांनी दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेऊन खासगी दूध डेअरील दूध पुरवठा सुरू केल्याने शासकीय दूध डेअरी बंद झाली आहे. रत्नागिरी शासकीय दूध डेअरीत अधिकारी, कर्मचारी मिळुन ५५ पदे मंजूर आहेत.

मात्र प्रत्यक्षात १४ कर्मचारी उपलब्ध असून एकाच व्यक्तीला अनेक भूमिका बजवाव्या लागत होत्या, तर तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. एका बाजूला दुग्ध व्यावसायाला चालना देण्याच्या गप्पा मारणारे सरकार दूध डेअरीबाबत उदासीन असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -