Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीउत्तम सहजावस्था सद्गुरूकृपेने

उत्तम सहजावस्था सद्गुरूकृपेने

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

व्यवस्था होते ती ज्ञानातून होते व हे ज्ञान दिव्य ज्ञान असते. या अनुषंगाने आम्ही परमेश्वराची जी व्याख्या केली ती म्हणजे “Divine power endowed with divine consciousness, divine intuition and divine bliss is god”. ही अशी निर्गुण निराकार परमेश्वराची व्याख्या केली. या ठिकाणी ज्ञानात देवत्व आहे. आनंदात देवत्व आहे. शक्तीमध्ये देवत्व आहे. ही divinity manifested होते, प्रकट होते, तेव्हा विश्वामध्ये तीच देवत्व दिसतं. आपण पाहत नाही हा आपला दोष आहे. “न ओळखती” म्हणजे ओळखत नाही हा आपला दोष आहे. त्यासाठी सद्गुरू पाहिजे. सद्गुरू जेव्हा ज्ञान देतात तेव्हा देवाची ओळख होते. देवाची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही जे जे कराल ते एकेक पाऊल देवाच्या दिशेने असेल. ही ओळख फार महत्त्वाची आहे. स्वरूपानंदांनी म्हटलेच आहे, “आधी देवासी ओळखावे मग तयाचे भजन करावे’’. भजन करणे म्हणजे टाळ घेऊन भजन करणे हा त्याचा अर्थ नाही. भजन म्हणजे स्मरण. स्मरण कुणाचे? देवाचे !!! “स्मरण देवाचे करावे”. परमेश्वराचे स्मरण करावे. देवाचे स्मरण करायचे म्हणजे कोणाचे स्मरण करायचे? आता देव म्हटले की, तुमच्या डोळ्यांसमोर निरनिराळे देव येतात. संतांना हे अभिप्रेत नाही. ते सांगतात, साधकांमध्ये चार वर्ग आहेत. अ ब क ड असे चार वर्ग जसे शाळेत असतात, तसेच चार वर्ग साधकांमध्येही आहेत.

“उत्तम सहजावस्था मध्यमो ध्यानधारणा
कनिष्ठ प्रतिमापूजा तीर्थाटन अधमाधम”

प्रतिमापूजा करणारे जे आहेत ते तिसऱ्या पायरीवरती आहेत. चौथी पायरी म्हणजे तीर्थाटन. उत्तम सहजावस्था ! ही सहजावस्था सद्गुरुकृपेने मिळते, सद्गुरू ज्ञानाने मिळते. सद्गुरू सांगतात,

“सहज देव असतची असे, सायासे फुटे नासे
म्हणोनि सहज सांडोनि, सायासें पडोची नये”

देव सहज आहे. सहज ! ज म्हणजे जन्म व सह म्हणजे बरोबर. जन्मापासूनच तो आपल्या बरोबर आहे. पण हे किती जणांना ठाऊक आहे. हा देवाचा शोध करण्यासाठी व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, उपासतापास करतो. उभेआडवे गंध लावतो. हे वाईट आहे असे नव्हे. पण हे करून तुम्हाला देव कसा मिळणार? तो अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्याबरोबरच आहे. मेल्यावरसुद्धा तो तुमच्यासोबत असणार कारण तू अमर आहेस. जिथे “तू माझा सांगाती”. तुम्ही जितका सायास कराल तितका तो पुढे जाईल. झोप येण्यासाठी प्रयत्न कराल तर झोप येणारच नाही. प्रयत्न करायचे सोडून द्या, झोप कधी लागेल कळणारसुद्धा नाही.

तुम्ही जितका सायास कराल, जितकी धडपड कराल तितका तो जास्त दूर दूर जायला लागेल. प्रत्यक्षात तो दूर जात नाही, तर तुम्हीच त्याच्यापासून दूर जाता. तो कुठेही जात नाही, तो कायम, अगदी जन्मापासून मरेपर्यंत तुझ्याजवळच आहे. तुच त्याच्या पासून दूर जातोस. दुर्बुद्धी म्हणजे देवापासून दूर गेलेली बुद्धी व देवाच्या जवळ ती सद्बुद्धी! दुर्बुद्धी पाहिजे की सद्बुद्धी हवी ते तू ठरव. त्यासाठीच सद्गुरू केला पाहिजे.

सद्गुरुवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधीआधी
आपणासारिखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयां लागे
लोह परिसराची न साहे उपमा, सद्गुरुमहिमा अगाध
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा

आता सद्गुरू करायचा की नाही हे तू ठरव कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -