Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीShiv Shankar : स्वामीच शिवशंकर!

Shiv Shankar : स्वामीच शिवशंकर!

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

ब्रह्मांडनायक, परमकृपाळू, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर आदी परिसरातील लोकांचे कल्याण झाले होते. त्यांना अध्यात्माचे महत्त्व समजून गेले होते. त्यांच्या मनात श्रद्धा-भक्ती वाढली होती. श्री दत्तावतार स्वामी आपल्या अक्कलकोट गावात राहतात, याचा तेथील लोकांना आनंद आणि अभिमान वाटत होता. स्वामींची कीर्ती सर्वत्र झाली होती.

त्याकाळी हैदराबाद येथे निजामांची सत्ता होती. त्याच्या पदरी शंकरराव नावाचे एक मोठे अधिकारी होते. परमेश्वरावर त्यांची श्रद्धा होती. देवाची ते खूप सेवा करायचे. श्री काशी-विश्वेश्वर हे त्यांचे आराध्य दैवत होते. एकदा त्यांच्या मनात विचार आला की, आपण सहकुटुंब काशी येथे जावे. तेथे जाऊन श्री काशी-विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. त्यानुसार शंकरराव आपल्या कुटुंबासह काशी येथे गेले. मंदिरात जाऊन ते देवासमोर दर्शन घ्यायला उभे राहिले; परंतु तिथे आश्चर्यच घडले. शंकररावांना श्री काशी – विश्वेश्वराच्या पिंडीच्या जागी एक साधू ध्यानस्थ बसलेला दिसला. ते बघून शंकररावांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पुन्हा पुन्हा पाहिले, पण त्यांना पिंडीच्या जागी साधूच दिसत होता.

शंकररावांनी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेली घटना सांगितली. ते लगबगीने गाभाऱ्यात आले. मात्र, त्यांना पिंडीच्या रूपाने देवांचे दर्शन झाले. शंकररावांना मात्र अजूनही तो साधूच दिसत होता. हा काय प्रकार आहे, हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते. खूप विचार केल्यानंतर पुजाऱ्यांनी शंकररावांना विचारले की, ‘तुम्ही एखाद्या देवाकडे किंवा साधू-संन्याशाकडे पूजापाठ करण्याचा किंवा दर्शनासाठी जाण्याचा विचार केला होता का?’

शंकररावांना मग आठवले की, आपण अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते. शंकररावांनी श्री स्वामींना कधीच बघितले नव्हते. मात्र, त्यांच्याबद्दल खूप ऐकले होते. अशा साक्षात्कारी साधूचे दर्शन अक्कलकोटला जावून घ्यावे, असे त्यांना वाटले होते. पण प्रत्यक्ष जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी काशीलाच जाणे पसंत केले. ही गोष्ट शंकररावांनी पुजाऱ्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी शंकररावांना श्री स्वामींची क्षमा मागायला आणि त्यांच्या दर्शनाला जायला सांगितले.

शंकररावांनी लगेच श्री स्वामींची क्षमा मागून मी लगेच दर्शनाला येतो, असे वचन दिले. त्यानंतर मात्र त्यांना श्री काशी-विश्वेश्वराच्या पिंडीचे दर्शन झाले.

आता येथून हैदराबादला न जाता परस्पर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचे, असे शंकररावांनी ठरवले. त्यानुसार ते सर्व जण अक्कलकोटला आले. मठात दर्शनार्थीची व सेवेकऱ्यांची मोठी गर्दी होती. शंकरराव स्वामींच्या पुढ्यात जाताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. श्री विश्वेश्वरांच्या पिंडीच्या जागी दिसलेले साधू साक्षात स्वामीच होते. त्यांनी स्वामींच्या पायांवर लोळण घेतली आणि म्हणाले की, ‘आपणच काशी-विश्वेश्वर आहात. साक्षात परमेश्वर आहात. मला माफ करा !’ श्री स्वामी कृपेने पुढे शंकररावांचे कल्याण झाले.

महाशिवरात्रीचा संदेश

हैदराबादी निजामाची सत्ता
शंकरराव अधिकारी मोठा भत्ता ||१||
आले मनात जावे काशी
करू पुण्य गोळा पटदीशी ||२||
त्वरेने पोचले काशी
शंकराच्या पिंडी पाशी ||३||
शंकराला भक्त नकोशी
दिसे साधू पिंडी पाशी ||४||
पुजारी पुसे का आले काशी
मनातले साधू देव अविनाशी ||५||
घ्या त्यांची भेट प्रत्यक्षी
पूरी होईल इच्छा न येता काशी ||६||
भक्तांना दिसे स्वामी पिंडीशी
स्वामी होते अक्कलकोट निवासी ||७||
भक्त शरण गेलो स्वामीशी
चूक कबूल कराया निघाला स्वामीपाशी ||८||
स्वामींच्या पायावर गेला शरण
धरले स्वामींचे प्रेमल चरण ||९||
तुम्हीच काशी विश्वेश्वर
तुम्हीच दत्तमूर्ती परमेश्वर ||१०||
तुम्ही भोळा सांब शिवशंकर
स्वामीच खरे दिपंकर ||११||
जगाचे स्वामी मालक चालक
स्वामी प्रेमळ निर्मळ पालक ||१२||
स्वामींचे भक्त बालक
स्वामींचा जगभर झेंडा फलक ||१३||
स्वामी शंकर शांत परमेश्वर
जगात नाही असा ईश्वर ||१४||
साऱ्या इच्छा पूर्णंकर
विलास म्हणे तूच सूर्य दिवाकर ||१५||

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -