Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभक्तांच्या जीवनात गुढीपाडवा

भक्तांच्या जीवनात गुढीपाडवा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांची महती दाहीदिशांना पसरली होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं जे म्हणतात ते श्री स्वामींच्या बाबतीत तंतोतंत खरे होते. भक्तांची हाक ऐकून श्री स्वामी त्यांच्या मदतीला धावून जात असत. त्यांना धीर देत असत. यासाठी स्थळकाळाचे बंधन नसे. स्वामी दर्शनाने भक्तांना रोजच गुढीपाडवा आहे असे वाटत असे.

बडोदे येथे अलवणी महाराज नावाचे थोर विद्वान, ज्ञानी, आणि परमभक्त तपस्वी होते. एकदा ते आपल्या तीन शिष्यांसह जगन्नाथपुरीला भगवान् जगन्नाथांच्या दर्शनाला आले. पुरीला देवदर्शन घेतल्यानंतर एका धर्मशाळेत आपला मुक्काम ठेवला. काही दिवस आपण भगवान् जगन्नाथांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा करावी असा त्यांचा मानस होता. धर्मशाळेत एक-दोन दिवस राहिल्यानंतर अचानक चौघांची तब्येत बिघडली. इलाज करूनही अलवणी बुवा आणि त्यांच्या तिघा शिष्यांची प्रकृती सुधारली नाही. उलट अधिकच खालावत चालली होती. त्यामुळे चौघांची चिंता वाढली. पुढे तर ते एवढे अशक्त बनले की, त्यांच्याकडून जराही हालचाल होईना! लोक त्यांना मदत करत होते. आता आपले काही खरे नाही. आपण सारेजण या दुखण्यातून आता काही वाचणार नाही. भगवान् जगन्नाथांच्या दारातच आपला शेवट होईल. तसे झाले तर बरेच होईल. ‘देवाच्या दारी विसावा, पुढचा जन्म नसावा’ असा विचार अलवणी बुवांच्या मनात आला. तथापि मोठ्या श्रद्धेने बुवांनी भगवान् श्री जगन्नाथाला विनवणी केली. मनोमन हात जोडून त्यांची करूणा भाकली. ‘माय-बापा आम्हाला जगवणं किंवा मारणं सर्वस्वी तुमच्या हाती आहे. योग्य तो निर्णय घ्या. कृपा करा परमेश्वरा!’

आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून श्री स्वामी समर्थ तेथे प्रकट झाले. तेजस्वी प्रकाश झोत डोळ्यांवर पडताच सर्वांचे डोळे दिपले. डोळे किलकिले करून पाहिले तर, कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या श्री स्वामींचे त्यांना दर्शन झाले. सर्वांनी त्या तेजस्वी रूपाकडे पाहून हात जोडले. परमेश्वर श्री स्वामींनी कृपावंत होऊन त्यांच्या शिरावर आपला हात ठेवला. त्याबरोबर चौंघांच्या अंगात चैतन्य संचारले. ते उठून बसले. चौघांना दर्शन दिल्यानंतर श्री स्वामी नेहमीच्या रूपात दिसू लागले. काही दिवसांतच चौघांची प्रकृती ठणठणीत झाली. जगन्नाथपुरीत आलेल्या एका साधूच्या आशीर्वादाने अलवणी बुवा आणि त्यांचे शिष्य बरे झाल्याची वार्ता पुरीत हा हा म्हणता पसरली. श्री स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागू लागली. जगन्नाथपुरीत बघता बघता स्वामींचे महात्म्य सर्वांना समजले. जगन्नाथपुरीला राहून स्वामींनी अनेक भक्तांची संकटे दूर केली होती. त्यामुळे स्वामी परिवार वाढत होता.

एकदा स्वामी आपल्या सेवेकऱ्यांसह बसले असताना, एक ब्राह्मण अडखळत, धडपडत तेथे आला. तो जन्माने आंधळा होता. परंतु त्या ब्राह्मणाने विद्याभ्यास करून ज्ञान संपादन केले होते. त्याला दिसत जरी नसले, तरी त्याने मनापासून श्री भगवान् जगन्नाथांची भक्ती केली होती. तो एक गुणवान ब्राह्मण म्हणून ओळखला जायचा. त्या ब्राह्मणाने श्री स्वामींची महती ऐकली होती. स्वामींनी केलेले लोक-कल्याण त्याला समजले होते. म्हणूनच त्यांच्या चरणी त्याची भक्ती जडली होती. स्वामींच्या समोर हात जोडून तो म्हणाला, ‘हे माय-बापा, मी तुम्हाला ओळखतो. आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहात. सर्व सृष्टी तुम्हीच निर्माण केली आहे. हे माऊली, या लेकराची दया येऊ द्या. माझ्या हातून गतजन्मी कोणते पाप झाले, ते मला माहीत नाही. पण या जन्मी मी आंधळा जन्माला आलो. हे देवा, मला तुमचे दर्शन घेण्याची फार इच्छा आहे. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या.’त्या ब्राह्मणाचे कळकळीचे बोलणे ऐकून स्वामींच्या मनात दयेचा पाझर फुटला. त्यांनी आपल्या गळ्यातला पुष्पहार काढून त्या ब्राह्मणाच्या दिशेने भिरकावला. त्याने तो अलगद झेलला. तो सुगंधी हार त्याने प्रथम आपल्या कपाळी लावला आणि नंतर तो आपल्या डोळ्यांना लावला. हाराचा स्पर्श डोळ्यांना होताच चमत्कार झाला. त्या ब्राह्मणाला वेगळीच अनुभूती होऊन त्याला दृष्टिलाभ झाला. ते बघून तेथे जमलेले सर्व सेवेकरी आणि गावकरी चकित झाले. त्या ब्राह्मणाने तर स्वामींच्या चरणांवर साष्टांग दंडवत घातला. स्वामी अशक्यही शक्य करतात याची प्रचिती तिथे जमलेल्या लोकांना आली. सर्वांनी स्वामींना मनोभावे वंदन केले.

एकदा एक अतिशय वृद्ध माणूस श्रींच्या दर्शनाला आला. हात जोडून तो म्हणाला, ‘महाराज, माझी पत्नी कुठेतरी हरवली आहे. तिच्याबरोबर माझी मुलेही आहेत. पत्नी हरवल्यापासून मी बेचैन आहे. मला अजिबात करमत नाही. सर्वत्र तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. महाराज मला सांगा माझी पत्नी कुठे गेली ?’ ते ऐकून स्वामी हसू लागले. म्हणाले, ‘अरे, एवढे वय झाले तरी तुझी वासना काही गेली नाही. देवाच्या चरणी बसून भक्ती करायची ते सोडून पत्नी पत्नी करतो आहेस. तुला माहीत आहे का की, मागच्या जन्मी तू तेली होतास आणि आमचा सच्चा भक्त होतास?’‘नाही महाराज, मला मागचा जन्म कसा आठवणार?’ तो वृद्ध म्हणाला. स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवताच त्याला मागचा जन्म आठवला. साक्षात्कार होताच त्याला सत्य समजले. गत जन्मी आपण तेली होतो व श्री नृसिंह सरस्वतींच्या सेवेत होतो गत जन्मी समजताच भानावर येत त्याने श्री स्वामींचे चरण धरले आणि त्यांची माफी मागितली. यापुढे सदैव सेवेत राहण्याची इच्छा व्यक्त केली. तोवर भोवताली खूप दाटी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत एक स्त्री पुढे आली. ती त्या वृद्धाची पत्नी होती. पुढे त्या दोघांनी स्वामींची मनोभावे सेवा केली.

गुढीपाडवा स्वामी संदेश

स्वामी वदे भक्ता
हुशार रहा भक्ता ||१||
लोकशाही जिवंत तुझ्यामुळे
निवडणूक येते तुझ्यामुळे ||२||
वाटतील सायकली फुळे फळे
पाच वर्षातच चिकटतील मुंगळे ||३||
येत आहे शिवजंयती
जयजयकार करतील मुलेती ||४||
शिवाजी परी मावळेच बनती
झाशीराणी परी मुली बनती ||५||
अहिल्याराणी होळकर परी देशसेवी बनती
मदर टेरेसा परी रुग्णसेवक बनती ||६||
तदनंतर येई आनंदी गुडीपाडवा
सर्वदुर्गुणांना त्यादिवशी अडवा ||७||
रामविजयाचा झेंडा फडकवा
अयोध्याविजयाचा भगवा फडकवा ||८||
सद्‌गुणी रामाचे गुण मनी बिंबवा
दहारथ रामापरी पितृभक्त मुलां बनवा ||९||
राम लक्ष्मणापरी बंधुप्रेम वाढवा
हनुमानापरी पराक्रमी बनवा ||१०||
कैकेईला होळीत पेटवा
सीता, उर्मिला, कौशल्या राणी बनवा ||११||
तुकाराम बीजदिनी अभंग वाचा
ज्ञानेश्वराचे पसायदान वाचा ||१२||

vilaskhanolkarkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -