Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखShivsena VS Ubatha : घरात बसणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये...

Shivsena VS Ubatha : घरात बसणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये…

उबाठा सेनेचे पक्षप्रमुख मधूनमधून कुठे सभा घेतात आणि महिन्यातून एकदा-दोनदा पत्रकारांपुढे महायुती सरकारच्या नावाने ठणाणा करतात. आता त्यांना एवढेच काम उरले आहे. शिल्लक सेना संभाळायची कशी, हेच त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. पण शिल्लक सेनेत उरलेल्या माजी नगरसेवकांना व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना संभाळणेही त्यांना कठीण जात आहे. शिल्लक सेनेतून सतत कोणी ना कोणी एकनाथ शिंदे यांच्या दमदार शिवसेनेत जात आहेत किंवा जे शिल्लक सेनेत थांबले आहेत, त्यातले बरेचजण तोंडाला पट्टी बांधून गप्प बसले आहेत. ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून’, अशी उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांची अवस्था झाली आहे.
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे.  राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत, आदी भन्नाट वक्तव्ये उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषदेत केली. ती ऐकताना ते आपल्या अडीच वर्षांच्या सरकारच्या कारभाराची कबुली देत असावेत, असे अनेकांना वाटले. ते शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारकडे एक बोट दाखवतात तेव्हा त्यांची चार बोटे स्वत:कडे असतात, याचे त्यांनी भान ठेऊन बोलावे. शिवसेनाप्रमुख म्हणत, कोणीही कितीही वंदा, महाराष्ट्र हिताचा आमुचा धंदा… पण त्यांचे पुत्र की जे माजी मुख्यमंत्री होते, ते मात्र कोणी कितीही वंदा, शिंदे-फडणवीसांवर टीका करणे हाच आमुचा धंदा, असा विचार करीत असावेत. पक्षप्रमुखांना ऊठ-सूठ, दिवस-रात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. दिसणारच. कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अक्षरश: दिवस-रात्र काम करीत आहेत. दिवसाचे चोवीस तास त्यांनी महाराष्ट्र हिताला आणि महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेच्या सेवेला बांधून घेतले आहे. आदर्श मुख्यमंत्री कसा असावा, हे त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आता राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे विकासाच्या कामांना वेग आला आहे. ठाकरे सरकारच्या काळात स्वत: राज्याचे प्रमुखच कोणाला भेटत नव्हते, कोणाशी चर्चा करीत नव्हते. स्वत:च्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार यांना वेळ देत नव्हते. मग विकास होणार कसा, जनतेचे प्रश्न सुटणार कसे, केवळ कोविड काळात सग्या-सोयऱ्यांना कंत्राटे देणे यातच परिवार गुंतला होता. शिंदे-फडणवीस किंवा अजित पवार यांच्याबाबतीत तसे कोणाला म्हणता येत नाही. म्हणूनच जमेल तशा कोट्या करून शिंदे फडणवीसांच्या नावाचा उल्लेख करणे यातच पक्षप्रमुख समाधान शोधत आहेत.
सत्तेवरून पायउतार झाल्यावर मराठा आंदोलकांविषयी उबाठाच्या पक्षप्रमुखांना प्रेमाचे भरते आले आहे. म्हणे त्यांच्यावर लाठीमार झाला, पण सरकारने त्याची जबाबदारी घेतली नाही. जालन्यात ज्या ठिकाणी जरांगे-पाटील उपोषणाला बसले होते, तेथे जमलेल्या आंदोलक जमावावर पोलिसांनी लाठीमार केला, त्याचे महायुती सरकारने मुळीच समर्थन केलेले नाही. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली, तर काहींवर निलंबनाची कारवाई झाली. जरांगे- पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागेवर गेले होते. मराठा आंदोलकांना परके म्हणून कधीच महायुतीच्या सरकारने वागणूक दिलेली नाही. पक्षप्रमुखांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात वर्षा बंगल्यातून बाहेर पडून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जनतेचा प्रश्न सोडवला, असे एक तरी उदाहरण सांगता येईल का? कोविड काळात ऑक्सिजन व बेडअभावी लोक तडफडत होते, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घरातून ते का बाहेर पडले नाहीत? त्यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वत: मास्क लावून आणि अंगावर गाऊन घालून मुंबई व राज्यातील वेगवेगळ्या इस्पितळांना भेटी देत होते. प्रत्यक्ष पाहणी करून जिथे कोणती कमतरता असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. मग राज्याचे प्रमुख केवळ फेसबुक लाइव्हवर का समाधान मानत होते. स्वत:ला राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणवून घेत ते स्वत:चीच पाठ थोपटून घेत होते. कोविड काळात देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले, हे काय भूषण म्हणायचे का? या आकडेवारीने महाराष्ट्राला डाग लागला, ही काय जमेची बाजू आहे का? नांदेडच्या रुग्णालयात मृत्यू झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे का गेले नाहीत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या रुग्णालयात तेथे रुग्ण दगावल्यावर का गेले नाहीत, असे प्रश्न विचारणे सोपे आहे. कारण उबाठा सेनेचे पक्षप्रमुख आता प्रश्न विचारण्याशिवाय आणखी तरी काय करू शकतात? जेव्हा अडीच वर्षांत राज्यात सर्वत्र फिरायला हवे होते तेव्हा मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसून राहिले. आता शिंदे-फडणवीसांना प्रश्न विचारत सुटले आहेत.
सरकारी रुग्णालयातील औषध खरेदीची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी उबाठा सेनेच्या प्रमुखांनी केली आहे. मुंबई महापालिकेत गेली तीस वर्षे त्यांच्या पक्षाने मातोश्रीच्या आदेशानुसार जो काय धुडगूस घातला, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. कोविड काळात मुंबई महापालिकेच्या खजिन्यावर कसा डल्ला मारला याचे त्यांना विस्मरण होत असावे. अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्री झाल्याने उबाठाच्या पक्षप्रमुखांची अवस्था सांगता येत नाही व सहन होत नाही, अशी झाली आहे. अडीच वर्षांच्या त्या वाईट कारकिर्दीला कंटाळूनच अजित पवार हे शिंदे-फडणवीसांकडे गेले हे पक्षप्रमुखांना कळत नसेल तर ते मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -