Sunday, August 30, 2026

तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीचे भान

तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीचे भान

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर

आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्या आज आपल्या हातातील मोबाईलमधून सहज शक्य झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन निश्चितच सोपे, वेगवान आणि सुविधाजनक झाले आहे.परंतु या प्रगतीसोबत एक महत्त्वाचा प्रश्नही आपल्यासमोर उभा राहतो - तंत्रज्ञानाच्या वेगाने पुढे जात असताना आपण माणूस म्हणून मागे तर पडत नाही ना? आज माणसाकडे संवादाची साधने वाढली आहेत; पण प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. संपर्कांची संख्या वाढली आहे; पण मनापासून बोलणारी माणसे कमी झाली आहेत. माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे; पण तिचा योग्य उपयोग करण्याची विवेकबुद्धी तितकीच विकसित होत आहे का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञान आवश्यक आहे; पण त्याचे भान त्याहून आवश्यक आहे. तंत्रज्ञानाला विरोध करणे हा या समस्येचा उपाय नाही. उलट आजच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना एआय, इंटरनेट आणि डिजिटल साधनांपासून दूर ठेवणे शक्यही नाही आणि योग्यही नाही; परंतु साधनांचा वापर आपण करायचा की साधने आपल्यावर नियंत्रण ठेवणार, हा खरा प्रश्न आहे.

मोबाईल आपल्या हातात असावा; पण आपले मन मोबाईलच्या हातात नसावे. सोशल मीडिया आपल्या संवादाचे माध्यम असावे; पण आपल्या भावनांचे नियंत्रण त्याने करू नये. एआय आपले काम सोपे करणारे साधन असावे; पण विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्याने हिरावून घेऊ नये. मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांच्या मनाकडेही पाहूया. आजच्या पिढीसमोर अनेक नवीन आव्हाने आहेत. सतत स्क्रीनवर राहणे, सोशल मीडियावरील तुलना, लगेच यश मिळण्याची अपेक्षा, कमी संयम, चिडचिड, एकटेपणा आणि अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या वर्तनावर दिसू शकतो. आपण मुलांना मोबाईल देतो; पण त्यांना मोबाईलचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवतो का? आपण त्यांना इंटरनेट वापरायला शिकवतो; पण काय पाहावे आणि काय टाळावे हे शिकवतो का? आपण त्यांना स्पर्धेत पुढे जाण्यास सांगतो; पण अपयश स्वीकारण्याची ताकद देतो का? आपण त्यांना मोठे होण्याचे स्वप्न दाखवतो; पण चांगला माणूस होण्याचे महत्त्व सांगतो का? या प्रश्नांची उत्तरे पालक, शिक्षक आणि समाज या तिन्ही घटकांनी शोधणे आवश्यक आहे.

शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे. आज शिक्षणक्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. डिजिटल साधने, स्मार्ट क्लासरूम, एआय आणि विविध ऑनलाइन संसाधनांमुळे शिकण्याच्या संधी वाढल्या आहेत. हे निश्चितच स्वागतार्ह आहे; परंतु शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे किंवा मोठी नोकरी मिळवणे हा नसावा. शिक्षणाने माणूस विचारशील, संवेदनशील, जबाबदार आणि विवेकी बनला पाहिजे. एखादा विद्यार्थी गणितात हुशार असेल, विज्ञानात प्रावीण्य मिळवेल, संगणकाचे उत्तम ज्ञान त्याला असेल; पण त्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव नसेल, सहकार्याची भावना नसेल, अपयश पचवता येत नसेल किंवा ज्येष्ठांचा आदर करता येत नसेल, तर त्याच्या शिक्षणात काहीतरी अपूर्ण राहिले आहे.म्हणूनच आजच्या शिक्षणात ज्ञानाबरोबर मूल्यशिक्षणाची गरज अधिक आहे. शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. पूर्वी शिक्षक हा माहिती देणारा प्रमुख स्रोत होता. आज एका क्लिकवर हजारो माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षकाची भूमिका बदलली आहे.

आज शिक्षकाने केवळ माहिती देणारा न राहता मार्गदर्शक, विचारप्रवर्तक आणि मूल्यसंस्कार करणारा व्यक्ती बनणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर त्याला फक्त उत्तर देण्याऐवजी त्या प्रश्नामागे विचार करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. “हे बरोबर आहे का?” एवढेच नव्हे, तर - तुला असे का वाटते? याचा दुसरा दृष्टिकोन कोणता असू शकतो? याचा समाजावर काय परिणाम होईल? असे प्रश्न विचारणारे शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करेल. पालकांनीही मुलांचे ‘मार्क्स’ नव्हे तर ‘मन’ समजून घ्यावे.आज अनेक पालक मुलांच्या भवितव्याबद्दल काळजीत असतात. त्यांच्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे; परंतु प्रत्येक मुलाची क्षमता, गती आणि आवड वेगळी असते. सतत तुलना करणे - “पाहा, अमुक मुलाला एवढे मार्क्स मिळाले”-यामुळे मुलामध्ये प्रेरणा निर्माण होण्याऐवजी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलाला सर्वप्रथम हे जाणवले पाहिजे की, “मी चुकलो तरी माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत.”

घरात संवादाची जागा निर्माण झाली पाहिजे. दिवसातून काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी बोलणे, त्यांच्या मनातील प्रश्न ऐकणे, त्यांच्या छोट्या यशाचे कौतुक करणे आणि अपयशाच्या वेळी धीर देणे - हीदेखील पालकत्वाची महत्त्वाची जबाबदारी आहे. एआयच्या युगात ‘स्वतः विचार करण्याची’ क्षमता जपूया. एआय हे आधुनिक काळातील अत्यंत प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत त्याचा उपयोग वाढत आहे. पण एआय ने उत्तर दिले म्हणून ते अंतिम सत्य असेलच असे नाही. विद्यार्थ्यांनी एआयकडून माहिती घ्यावी; पण ती तपासावी. त्यावर विचार करावा. स्वतःचे मत तयार करावे. एआयनेआपले काम सोपे व्हावे; आपला विचार बंद होऊ नये. हे भान आजच्या पिढीला देणे अत्यंत आवश्यक आहे.

संवेदनशीलता हीच खरी ताकद-आजच्या वेगवान जगात आपण यश, पैसा आणि प्रसिद्धीला खूप महत्त्व देतो. पण माणसाच्या खऱ्या मोठेपणाचे मोजमाप त्याच्याकडे किती आहे यावर नव्हे, तर तो इतरांसाठी काय करतो यावर झाले पाहिजे.एखाद्याला अडचणीत पाहून मदतीचा हात पुढे करणे, दुःखी व्यक्तीचे दोन शब्द ऐकून घेणे, चूक झाल्यावर माफी मागणे, दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेणे, अपयशी व्यक्तीला प्रोत्साहन देणे - या छोट्या गोष्टीच समाजाला सुंदर बनवतात. तंत्रज्ञान आपल्याला जोडते; पण संवेदनशीलता आपल्याला माणसांशी जोडते. पुढील पिढीला आपण काय देणार? आपण मुलांना उत्तम शिक्षण देऊ, चांगल्या शाळेत शिकवू, आधुनिक तंत्रज्ञान देऊ, चांगली नोकरी मिळवून देऊ. पण त्याबरोबर त्यांना प्रामाणिकपणा, कष्ट, संयम, सहकार्य, कृतज्ञता, पर्यावरणाची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी दिली तरच त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. कारण भविष्यातील जग फक्त बुद्धिमान लोकांनी नव्हे, तर बुद्धिमान आणि संवेदनशील लोकांनी घडवायचे आहे. काळ बदलत राहणार आहे. तंत्रज्ञान अधिक प्रगत होणार आहे. एआय अधिक सक्षम होणार आहे. शिक्षणाच्या पद्धती बदलणार आहेत. पण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रेम, करुणा, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांची किंमत कधीच कमी होणार नाही.म्हणूनच आज आपल्याला तंत्रज्ञानापासून दूर जाण्याची गरज नाही; तंत्रज्ञानासोबत विवेकाने जगण्याची गरज आहे. मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांच्या हातात पुस्तकही असू द्या.त्यांना एआय शिकवताना स्वतः विचार करायलाही शिकवूया. त्यांना स्पर्धेत पुढे जाण्यास सांगताना इतरांना मागे ओढून पुढे जायचे नाही, हेही शिकवूया.

आणि सर्वांत महत्त्वाचे - “मोठे व्हा” असे सांगताना “चांगले माणूस व्हा” हे सांगायला विसरू नका. कारण उद्याचे जग कितीही आधुनिक झाले, तरी त्या जगाला सर्वांत जास्त गरज असेल ती तंत्रज्ञानाची नव्हे, तर माणुसकीची.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा