Saturday, August 29, 2026

मदत

मदत

-  कथा; रमेश तांबे

एके दिवशी मी समुद्रावर फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजले होते. सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. चौपाटीवर बऱ्यापैकी गर्दी होती. तरुण मंडळी पाण्यात खेळत होती. मुलं वाळूत किल्ले बनवत होती. वयस्कर लोक वाळूत बसून समुद्राच्या अथांग रूपाकडे बघत गप्पा मारत बसले होते. मीदेखील एक मोकळी जागा बघून वाळूत बसकन मारली आणि समुद्राच्या लाटांचा खेळ बघत बसलो. हळूहळू सूर्य समुद्रात बुडू लागला. सारी पश्चिम दिशा लाल रंगाने न्हाऊन निघाली. निसर्गाचं एक सुंदर नयनरम्य रूप सारेच लोक मोठ्या कुतूहलाने बघत होते. बराच वेळ मी मनातल्या मनात माझ्याशी बोलत होतो. दुरून कोणालाही वाटावं की मी ध्यानाला बसलो आहे.तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं. तर एक लहान मुलगी अगदी रडवलेल्या सुरात मला म्हणाली, “काका मला खूप भूक लागली आहे हो, काहीतरी खायला द्याल का? मी कालपासून काहीच खाल्लेलं नाही.” मला तिची दया आली. माझ्या मनात विचार आला, कोण असतील हिचे आई-बाबा! या मुलीला एकटे सोडून कुठे गेले असतील. काही काळजी आहे की नाही त्यांना! असे नाना विचार मनात येत होते. पण पुन्हा “काका” अशी निरागस हाक कानी पडताच मी भानावर आलो आणि तिथून उठलो. मुलीचा हात धरून तिला एका चांगल्या हॉटेलमध्ये नेलं. तिच्यासाठी जेवण मागवलं, तर समोरची भरलेली थाळी ती बघतच बसली. मी म्हटलं, “बाळ कर सुरुवात.” मग ती दोन दिवस उपाशी असलेली मुलगी पटापट खाऊ लागली. आपण एका भुकेलेल्या मुलीला जेवण देऊ शकलो याचं समाधान मला मिळत होतं. पण दोन-तीन घासातच तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी म्हणालो, “बाळ काय झालं? जेवण नाही आवडलं का तुला? तू अशी रडतेस तरी का!” मी म्हणालो.

तशी ती खाता खाता म्हणाली, “काका अजून एक थाळी मला बांधून द्याल का? माझी आई आजारी आहे. दोन दिवसांपासून तिनेसुद्धा काहीच खाल्ले नाही.” आता मात्र मला आश्चर्यच वाटलं. एवढ्या लहान वयात ती मुलगी आपल्या आजारी आईची किती काळजी करते आहे. मी म्हणालो, “पोरी तू सावकाश जेव. मी एक नाही जेवणाच्या अजून दोन थाळ्या तुला बांधून देतो.” आता मुलीचा चेहरा थोडासा फुलल्यासारखा वाटला. मग मुलीने पटापट जेवण आटोपले. हाॅटेलमधून निघताना अजून दोन माणसांचं जेवण बांधून घेतलं. पैसे भरून मी त्या मुलीच्या सोबत घराकडे निघालो. आता मात्र त्या छोट्या मुलीने माझा हात धरला होता आणि ती ओढतच मला तिच्या घराकडे नेऊ लागली.

एका झोपडपट्टीत तिचं पत्र्याचं घर होतं. घरात एक छोटासा पिवळा बल्ब जळत होता. आई खाटेवर पडली होती. शेजारी मुलीचा मोठा भाऊ साधारण दहा-बारा वर्षांचा आईची काळजी घेत बसला होता. तेवढ्यात मुलगी म्हणाली, “दादा, आई... बघ ना, आपले काका आले आहेत. आई तुझ्यासाठी त्यांनी जेवणदेखील आणले आहे. “आपले काका आले आहेत” या निरागस वाक्याने माझ्या अंगावर सरर्कन काटा आला. मग त्यांची विचारपूस करून मी त्यांना जेवण दिले. निघताना मी त्या मुलीला म्हणालो, “काय गं तू एकच जेवण घ्या असं मला का सांगितलंस. भावासाठी का नाही मागितलं!” ती मुलगी म्हणाली, “नाही काका... फक्त आई आजारी आहे ना, म्हणून एक थाळी सांगितलं. दादा नाही जेवला तरी हरकत नाही. तशी दोन तीन दिवस उपाशी राहण्याची सवय आहे त्याला.” मुलीचा एक एक शब्द माझ्या मनावर खोलवर जखम करीत होता. माझे डोळे भरून आले. मग त्या मुलीकडे न बघताच मी तेथून बाहेर पडलो. एकविसाव्या शतकातला विकसित भारत, जगातली चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि वस्तुस्थिती याची तुलना करत मी सुन्न मनाने घराकडे परतलो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा