Saturday, August 22, 2026

भेदभाव

भेदभाव

- कथा, रमेश तांबे

या समोर पुस्तक ठेवून बसली होती. पण तिचं लक्ष पुस्तकात अजिबात नव्हतं. दूरवरून कुणालाही वाटेल की रिया वाचन करते आहे. पण तसं मुळीच नव्हतं. कारण आज सकाळीच रियाचं आणि तिच्या आईचं जोरदार भांडण झालं होतं. तसं भांडणाचं कारण हे साधच होतं. ‘घरातली कामं पूर्ण कर आणि मगच अभ्यासाला बस.’ आईने असं सांगताच रिया संतापली. ‘मीच का सगळी कामं करायची? आणि तो तुझा लाडका मुलगा आरामात मोबाइल बघत बसणार. नाही तर मुलांबरोबर हुंदडायला जाणार. असा हा मुलगा-मुलगी भेदभाव मी सहन करणार नाही.’ असं ठणकावून रिया आपल्या खोलीत जाऊन बसली. समोर पुस्तक घेतलं, पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं.

सध्या तब्येतीमुळे आईला पटापट कामं करणे जमत नव्हतं. म्हणून गेले काही दिवस रियाच आईला मदत करत होती. दोन तास घरकामात मदत करून प्रिया अभ्यासाला बसायची. आईची काळजीदेखील घ्यायची. कालचीच गोष्ट... जेवणाची वेळ होती. आईचं सगळं लक्ष मुलगा चिन्मयकडेच! त्याला काय वाढू आणि किती वाढू असं तिला झालं होतं. पण रियाने भाजी मागितली, तर ‘हात मोडलेत का तुझे?’ असं उत्तर तिला मिळालं आणि असं नेहमीच घडायचं. त्यामुळे रियाच्या मनात चिन्मयबद्दल एक अढीच बसली होती. पण आपल्या घरात मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो याची जराही जाणीव चिन्मयला नव्हती.

रियाची आई मागच्या पिढीची, मोठ्या संस्कारी घरात वाढलेली. त्यामुळे मुलींना घरातली कामे आलीच पाहिजेत या विचारांवर ती ठाम होती. त्यात तिला काहीच गैर वाटत नव्हतं. लहानपणापासून लाडात वाढलेल्या चिन्मयला आता आरामाची सवय लागली होती. शाळेतून घरी आलं की, पाठीवरच्या वह्या-पुस्तकांची बॅग पलंगावरती फेकून द्यायची. अन् शाळेचे कपडे न बदलताच लोळत पडायचं. पडल्यापडल्या मोबाइल बघत बसायचं. मग टीव्ही नाही तर मित्रांसोबत खेळायला जायचं. मग थेट जेवणाच्या वेळीच घरी परतायचं. इकडे रिया आईला मदत करून आपला अभ्यास पूर्ण करायची. पण आपल्या बहिणीवर अन्याय होतो याची त्याला जराही कल्पना नव्हती. एके दिवशी रियाची दोन दिवसांची सहल जाणार होती. त्यासाठी रिया तयारी करून निघाली. आता दोन दिवसांच्या कामाचा ताण आईवर येणार होता. रिया सहलीला गेली पण इकडे आईची तब्येत अचानक बिघडली. रियाचे बाबादेखील कामानिमित्त बाहेर होते. आई आजारी पडली ही गोष्ट रियाला फोनवरून कळाली, पण सहल सोडून रिया एकटी परत येऊ शकत नव्हती.

दोन दिवसांनंतर रिया घरी आली. तेव्हा तिने पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यावेळी चिन्मय आईला चक्क जेवण भरवत होता. रिया धावतच आई जवळ गेली. आईच्या अंगात अजूनही बारीक ताप होता. पण तशी ती बरी होती. थोडासा अशक्तपणा होता. मग आईने चिन्मयबद्दलची सारी इत्थंभूत माहिती रियाला सांगितली. मी सांगितलेली सगळी कामे त्याने केली. अगदी डाळ-भातसुद्धा! सकाळ, संध्याकाळ घराची साफसफाईची सर्व कामे कशी व्यवस्थित केली. आई सांगत असताना चिन्मयची नजर मात्र जमिनीवर खिळली होती. पण चिन्मय एवढे सगळे करू शकतो हे रियाला पटतच नव्हतं. तिचे डोळे भरून आले. म्हणाली, ‘चिनू माफ कर. मला वाटलं तू खूपच बेजबाबदार आणि खुशालचेंडू मुलगा आहेस. पण ज्या पद्धतीने तू आईची काळजी घेतली आहेस ते बघून तुला सलाम करावासा वाटतो.’ मग आई, चिन्मय आणि रिया तिघेही डोळे पुसत पुसत एकमेकांकडे बघत हसू लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा