Sunday, August 30, 2026

झऱ्यांचा उगम कसा होतो?

झऱ्यांचा उगम कसा होतो?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील

पाण्याच्या निर्मळ झऱ्यासारखा शिवम मित्रांना माहिती सांगत होता. त्याचे मित्रही ते ज्ञानामृत तल्लीन होऊन प्राशन करत होते. “बरे, पाण्याचे झरे कसे निर्माण होतात?” कौशलने विचारले. “त्याचे असे आहे,” शिवम सांगू लागला, “जमीन ती डोंगरावरील असो वा मैदानावरील असो, तिच्याखाली अनेक सच्छिद्र खडक असतात. जमिनीखालील सच्छिद्र खडकात साचलेल्या पाण्याला भूजल म्हणतात. त्या खडकांतून ते पाणी पाझरते व जमिनीच्या बाहेर येते. त्याचा झरा तयार होतो. अशा झ­ऱ्याचे पाणी थंडगार असते. तसेच जमिनीत अनेक पोकळ्या असतात. त्या पोकळ्यांंतही भरपूर पाणी असते. पोकळ्यांतील पाणीही त्याला एखादी वाट मिळाल्यास झ­ऱ्याच्या रूपाने बाहेर पडते.”

“मग, गरम पाण्याचे झरे कसे निर्माण होतात?” कपीलने प्रश्न केला.“पृथ्वीच्या पोटातही अतोनात उष्णता असते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. पृथ्वीमध्ये अतिशय तप्त खडक असतात. अति उष्ण असे ज्वालामुखी असतात. जमिनीतील पाणी जर अशा उष्ण भागाजवळून वाहत येत असेल तर त्याचे तापमान वाढते. असे गरम पाणी जेव्हा भूपृष्ठाच्या एखाद्या छिद्रातून बाहेर येते तेव्हा ते गरम पाण्याचा झरा बनते. तेच जेव्हा आतील खूप जोराच्या दाबाने बाहेर येते तेव्हा त्याचा सुंदर कारंजा बनतो.” शिवमने स्पष्ट केले.

“त्या गरम पाण्याच्या झ­ऱ्यात तांदळाचा भात बनतो म्हणतात.” यात्रेकरूने विचारले. शिवम म्हणाला, “काका, काही गरम पाण्याच्या झ­ऱ्यातील पाणी अतिशय उष्ण असते, उकळणारे असते. कदाचित त्या उकळणा­ऱ्या पाण्यामध्ये तांदळाचा भात बनतही असेल.” “औष्णिक झरा व खनिजयुक्त पाण्याचा झरा यात काय फरक असतो?” विपुलने आपली जिज्ञासा दाखवली. “कोणताही झरा ज्या खडकांजवळून वा खडकांवरून वाहत असतो तेव्हा त्या खडकातील खनिजद्रव्ये त्याच्या पाण्यात मिसळतात वा विरघळतात. त्यामुळे प्रत्येक झ­ऱ्याच्या पाण्यात ही खनिजे विरघळलेली असतात. फक्त ह्या खनिजांचे प्रमाण मात्र कमी-जास्त असते. ज्या झ­ऱ्याच्या पाण्यात खनिजांचे प्रमाण जास्त असते त्या झ­ऱ्याला खनिज पाण्याचा झरा म्हणून ओळखतात व त्या पाण्याला खनिजयुक्त पाणी म्हणतात; परंतु जेव्हा एखाद्या झ­ऱ्याचे पाणी हे उष्ण खडकांच्या सान्निध्यात येते व केवळ गरम होऊन झ­ऱ्यावाटे बाहेर पडते त्या झ­ऱ्याला औष्णिक झरा म्हणून ओळखतात.” शिवमने सांगितले.

“पृथ्वीच्या पोटात सोने कसे सापडते?” यात्रेकरूने प्रश्न केला. शिवम म्हणाला, “सोने हे दोन प्रकारे सापडते. एक म्हणजे ते केवळ सोनेच असते, फक्त ते अशुद्ध रूपात असते. दुसरे म्हणजे ते इतर धातूंबरोबर मिश्र स्वरूपात सापडते.” “मग पृथ्वीच्या पोटात कोळसा कसा तयार झाला गड्या?” अमोलने विचारले. “करोडो वर्षांपूर्वी भूकंप व इतर भौगोलिक घडामोडींमुळे जंगलेच्या जंगले जमिनीच्या पोटात गाडली गेली. तसेच विशिष्ट प्रकारची शेवाळे सुद्धा जमिनीत गाडली गेली. ह्या सर्वांवर माती, वाळू, खडक व खडकांचा चुरा यांचे थरावर थर साचत गेले. त्यांवर जमिनीच्या पोटातील हालचालींचा प्रचंड दाबही पडत गेला. त्यामुळे त्या मृत वनस्पती कोळसा बनल्या. शिवमने उत्तर दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा