- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ
साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात मी निमंत्रित होते. तो कार्यक्रम अहमदाबादला होता. सर्वसाधारण सात-साडेसात तासांचा प्रवास; परंतु एकटीने करण्याचा खूप कंटाळा आलेला होता. शेवटी आपले वाचत जाऊ म्हणजे वेळही जाईल आणि वेळ सार्थकी लागेल असे वाटून गेले. समोरच्या सीटवर आणि बाजूच्या सीटवर मिळून एक कुटुंबीय प्रवास करत होते. आजी-आजोबा, आई-वडील आणि दोन नातवंड. मुलांच्या खेळण्यात गप्पांमध्ये मी रमून गेले. त्यानंतर सुनेच्या आणि सासूच्या वेगळ्याच गप्पा सुरू झाल्या. म्हणजे पुरणपोळी कशी करायची, किती वेळ डाळ शिजवायची वगैरे. सासू सांगत होती आणि सून ऐकून घेत होती याचे नवल वाटले. त्यानंतर त्यांनी आणलेले पराठे आणि बटाट्याची भाजी सगळ्यांनी मिळून गप्पागोष्टी करत खाल्ली. वडील बहुधा चहाचे चहाते असावेत कारण प्रत्येक स्टेशनवर ट्रेनपेक्षा प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या चहा चांगला असतो सांगत मुलाने त्यांच्यासाठी खिडकीतून चहा घेतला. त्या मुलाच्या आणि वडिलांच्या मी गप्पा ऐकू लागले. अगदी शेअर मार्केटपासून ते भाजीमार्केटपर्यंत सगळ्या विषयांवर ते गप्पा मारत होते. अधूनमधून वडील त्याला म्हणायचे, “तुझ्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त पाहिले आहेत.” आणि गंमत म्हणजे मुलगा सुद्धा हसून ते कबूल करायचा. खाणे पिणे झाल्यावर त्या कुटुंबीयांनी पत्त्याचा डाव टाकला. होय, म्हणजे वडिलांना जो पत्त्याचा खेळ आवडत होता आणि मुख्य म्हणजे आईला जो चांगला जमत होता असा खेळ त्यांनी खेळायला सुरुवात केली. ती लहान मुलं आपसात खेळत होती. कधी कधी आई-वडिलांच्या हा तर कधी आजी-आजोबांच्या अंगावर चढून त्यांचे लक्ष आकर्षित करत होते. कितीतरी दिवसानंतर मी असं हसते-खेळते कुटुंब पाहिले. ज्या कुटुंबात मुलाला आपल्या वडिलांचा अजिबात त्रास होत नव्हता, तर सुनेला आपल्या सासू-सासऱ्यांचा! शेवटी उतरायची वेळ झाली तेव्हा नेमके आजी-आजोबा छोटे छोटे सामान घेऊन पुढे गेले आणि मुलगा आणि त्याची बायको आपल्या मुलांसहित मोठे सामान गोळा करत होते. हीच संधी साधून मी त्या मुलाशी संवाद साधला. त्याला म्हटले, मला तुझ्या कुटुंबाला नजर लावायची नाही; परंतु कितीतरी वर्षांनंतर मी असे हसते-खेळते कुटुंब पाहिले ज्याच्यात कोणालाच कोणाकडून समस्या नाही.
तो मुलगा हसून उत्तरला, “तुम्ही आमचे बोलणे ऐकले असणारच! त्या दोघांची प्रत्येक गोष्ट आम्हाला आवडते किंवा पटते, असे नाही; परंतु मला जन्म दिल्यानंतर, अत्यंत खस्ता खात त्यांनी मला वाढवले, प्रत्येक गोष्ट पुरवली. ज्या मुलीशी लग्न करायचे ठरवले त्यालाही त्यांनी आनंदाने होकार दिला. आज आम्ही दोघेही चांगले कमवतो त्यामुळे कुटुंबात कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत मग खोदून खोदून इतर समस्या का काढायच्या, असे आम्हाला वाटते.” मी प्रश्न विचारला नाही तरी सून स्वतःहून म्हणाली, “आता बाबांचे वय सदुसष्ट वर्षे आहे आणि आईचे त्रेसष्ट. मला माहीत नाही आणखी किती वर्षे ते अशा तऱ्हेने चालत फिरत आमच्याबरोबर येऊ शकतील... त्यामुळे दरवर्षी आम्ही दोघे एकत्रित सुट्टी काढून या दोघांना जाणीवपूर्वक फिरायला घेऊन जातो. त्यांना आनंदात ठेवतो. बाकी दिवसभर ते मुलांना संभाळतातच!” त्यादिवशी माझे भाषण वाचून पाहण्याचेसुद्धा राहून गेले आणि त्याची गरजही वाटली नाही. एक नवीन गोष्ट मी शिकले होते जी तुमच्यापर्यंत पोहोचवावी असे मला वाटते. कोणत्याही एका माणसाचे कधीही दुसऱ्या माणसाबरोबर जमणे कठीण असते पण जमवून घेणे सोपे असते. जेव्हा दोन पिढ्यांमधील अंतर आपण पाहतो तेव्हा तर ते आणखी कठीण असते, हे आपण सर्वांनी लक्षात घेऊया. बऱ्याच कुटुंबात आई-वडिलांच्या व आजी-आजोबांच्या फोटोंना रोज ताज्या फुलांचा हार घातला जातो, त्यांच्यापुढे दिवा लावला जातो, त्यांच्यापुढे नैवेद्य ठेवला जातो आणखी काही काही... त्यापेक्षा ते जिवंत असताना त्यांना थोडासा का होईना आनंद देऊया. त्यानंतर तुम्हाला आयुष्यात हार-फुलांचा, तेलवातींचा, नैवेद्याचा कोणताही खर्च करण्याची आवश्यकता उरणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त माणसं जिवंत असताना त्यांच्यासाठी थोडासा वेळ खर्च करा, इतकेच!






