- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. राज्याच्या गृह विभागाने तातडीने अधिसूचना जारी करत मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही भागात धरणे, मोर्चे किंवा जाहीर सभा घेण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानातही एका दिवसासाठी आणि निश्चित केलेल्या वेळेतच आंदोलन करण्याची मुभा असणार आहे.
- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी ...
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली असून मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही १ सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही आंदोलनांच्या शक्यतेमुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, आझाद मैदानात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आंदोलनास परवानगी असेल. तसेच शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी आंदोलनांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे.
गृह विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आझाद मैदानावर आंदोलनासाठी जास्तीत जास्त ५ हजार आंदोलकांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच आंदोलनात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, रिक्षा, जड वाहने किंवा प्राणी आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. लाठ्या, तलवारी किंवा भाले बाळगण्यावर बंदी असून पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. तसेच नऊ बाय सहा फुटांपेक्षा मोठे बॅनर आणि दोन फुटांपेक्षा मोठी काठी असलेला झेंडा बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मैदानावर तंबू किंवा मंडप उभारण्यास मनाई असून आंदोलकांनी ठरलेल्या वेळेत मैदान सोडणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





