- जीवनगंध, पूनम राणे
१५ ऑगस्टचा दिवस. विनीत आजपासूनच मी उद्या शाळेत जाणार नाही, असे सतत म्हणत होता. उद्या बाबांना सुट्टी आहे. आईला सुट्टी आहे. त्यामुळे “मी सुद्धा सकाळपासून घरी राहणार आणि खूप वेळ उशिरापर्यंत झोपणार!” असे तो सतत म्हणत होता.
संध्याकाळची वेळ होती. आजोबा रामरक्षा, मारुती स्तोत्र वाचत बसले होते. विनीतलाही ते अधून मधून आपल्या सोबत बस असे सांगत होते; परंतु विनीत आजोबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. उद्या मी मुळी शाळेत जाणारच नाही असे तो ठणकावून बोलत होता.
आजोबांनी देवघरातील देवाला नमस्कार केला आणि खुर्चीत जाऊन बसले. “एकटा उरलो तरी फिकीर नाही, हातातला ध्वज सोडणार नाही या देशाकरिता मरण यावे हे वस्त्रची माझे कफन व्हावे” या देशभक्तीपर गीताच्या ओळी आजोबा गुणगुणत होते. विनीतने आजोबांना विचारले,“आजोबा काय गुणगुणताय!”
आजोबा म्हणाले, “बाळ विनीत, अरे, ज्या स्वातंत्र्य वीरांनी मग त्यामध्ये नऊ वर्षांचा शिशिर कुमार असेल. भगतसिंग सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाष चंद्र बोस, राजगुरू या सर्वांनी देशाकरिता बलिदान दिलं. त्यामुळे या देशात आपण स्वतंत्र श्वास घेत आहोत. सुखाची झोप घेत आहोत. हे विसरून कसे चालेल.” बाळ विनीत, तुला एक कथा सांगतो, ‘अरे तुझ्यासारखाच एक मुलगा शाळेमध्ये गेला होता. शाळेमध्ये स्वातंत्र्याच्या कथा इतिहासाचे शिक्षक वर्गात सांगत होते. या मुलाच्या धमनीतील रक्त सळसळत होते. काय करू आणि काय नको असे त्याला झाले होते. शाळा सुटताच त्यांनी सर्व मित्रांना एकत्र केले आणि एका मंदिरात सभा भरवली. आज शस्त्राचा साठा घेऊन येणाऱ्या ट्रेनला आपण अडवायचे असे त्यांनी ठरवले. आपल्या चार-पाच मित्रांसहित तो रेल्वे रूळ उघडायचा प्रयत्न करू लागला. रात्रीच्या अंधाऱ्या प्रकाशात त्यांनी ते काम सुरू केले. एवढ्यात बॅटरीच्या प्रकाशाचे झोत त्यांच्या दिशेने आले. त्यांनी आपल्या मित्रांना दूर जायला सांगितले आणि स्वतः मात्र तिथेच राहिला. त्या येणाऱ्या दोन इसमानी त्याला पकडले. सांग, ‘तुझ्याबरोबर अजून कोण होते ते सांग!’ ‘तुझ्या मित्रांची नावे सांग!’ परंतु हा मुलगा आपल्या मित्रांची नावे सांगायला तयार होईना. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तिथेही न्यायालयात न्यायाधीशाने सांगितले. ‘तुझी शिक्षा कमी होईल फक्त त्या मित्रांची नावे सांग.’ त्यांनी मानेने होकार दिला.
आणि म्हणाला,“हो, मी मित्रांची नावे सांगायला तयार आहे. माझे मित्र याच न्यायालयात आहेत. आत्ता त्यांची नावे सांगतो” ...असे म्हणून हातोडा, प्रहार, फावडा, कुदळ, पक्कड, ही माझ्या मित्रांची नावे आहेत.” हे ऐकताच न्यायाधीश संतापले त्यांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याचे फर्मान ठोठावले. ‘वंदे मातरम्’ म्हणत हा मुलगा हसत हसत फासावर गेला. विनीत बेटा, मुलगा होता हेमू कलानी. विनीत, देशभक्तांनी आपल्या हातात हा देश सोपवलेला आहे. त्यांची काळजी घेणं, त्याला सुरक्षित ठेवणे हे आपल्या हातात आहे. बेटा,” आज आपल्याला शस्त्र घेऊन लढायला जायचं नाही पण आपल्या देशात चालणारा भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार पूर्णपणे नाहीसा करण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वातंत्र्यदिनी न चुकता न कंटाळता आपल्या शाळेत जाऊन ध्वजाला प्रणाम केला पाहिजे. हे आपले प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
विनीत आजोबांची कथा ऐकून भावुक झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला आणि शाळेत निघाला. आपल्या वर्ग शिक्षकांना भेटला आणि म्हणाला, सर मी आज स्वातंत्र्यदिनाचे भाषण करणार आहे. आजोबांनी सांगितलेली कथा विनीतने सर्वांना सांगितली. ती कथा सर्वांना खूपच आवडली. सर्वांनी जोरात टाळ्यांचा कडकडाट केला. शाळा सुटताच विनीत थेट घरी आला आणि आजोबांच्या गळ्यात पडला आणि म्हणाला,“आजोबा तुम्ही मला सांगितलेली कथा मी आज शाळेत सांगितली. ती सर्वांना खूपच आवडली यापुढे मी केव्हाही शाळेत जायचा कंटाळा करणार नाही.”






