Monday, August 17, 2026

BMC Security : मुंबई महापालिका मुख्यालयाची नजर आता अधिक तीक्ष्ण

BMC Security : मुंबई महापालिका मुख्यालयाची नजर आता अधिक तीक्ष्ण

एआय आधारीत बसवले जाणार ८७ सीसी टिव्ही कॅमेरे

मुंबई (सचिन धानजी)  : मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतींमध्ये सध्या वापरात असलेले सी सी टिव्ही कॅमेरे हे जुने झाले असून आता याठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यात येणार आहे. परंतु हे कॅमेरे आता अत्याधुनिक पध्दतीचे असतील. नवीन बसवण्यात येणारे कॅमेरे हे ए आय आधारीत प्रणालीवरील असून तब्बल ८७ कॅमेरांची आता तीक्ष्ण नजर येथील प्रत्येक अभ्यागतांसह तेथील कर्मचारी,अधिकारी यांच्या हालचालींवर राहणार आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे नवीन कॅमेरे बसवताना सुरक्षा उपाय अधिक प्रबळ करण्याकरता नवीन परिसरासाठी अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानयुक्त सी सी टिव्ही कॅमेरांची आवश्यकता असल्याने त्यानुसार याची खरेदीची प्रक्रिया राबवली गेली. या ए आय तंत्रज्ञानायुक्त कॅमेरांमुळे रिअल टाईम धोका ओळखणे, चेहऱ्याची ओळख पटवणे आणि स्वयंचलित सूचना तथा इशारा यांसारख्या सुधारीत पाळत ठेवण्याची क्षमता मिळण्याची अपेक्षा असते. ज्यामुळे सर्व संबंधितांच्या अधिक सुरक्षित वातावरण सुनिश्चित होण्यास मदत होईल

या अनुषंगाने मुंबई महापालिका मुख्यालयासाठी ४१ डोम ए आय डोम कॅमेरा आणि ४४ ए आय बुलेट कॅमेरा तसेच २ पीटीझेड अशाप्रकारे ८७ सीसी टिव्ही कॅमेरांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी विविध करांसह ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. याकरता सहोरा कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरे बसवल्यानंतर पुढील चार वर्षांच्या देखभालीचा समावेश आहे. यासाठी ३५.४१ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. समितीच्या मान्यतेनंतर ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये हे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

हेतुपुरस्सर किंवा अपघाती अशा कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी इमारतीमध्ये विविध सीसीटिव्ही कॅमेरे धोरणात्मक दृष्ट्या बसवले पाहिजेत. त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ सुरक्षिततात वाढत आहे. तर रहिवासी आणि अभ्यागतांमध्ये जबाबदार वर्तनालाही प्रोत्साहन मिळते, मुख्य कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीसाठी सीसी टिव्ही निगराणी प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जुन्या इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार नव्याने सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याच्या जागा निश्चित करून कुठे डोम आणि कुठे बुलेट कॅमेरे बसवण्यात येईल याचा आराखडा बनवून त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचे संंबंधित यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा