Thursday, August 13, 2026

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

· संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान

नवी दिल्ली : भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२४ आणि २०२५ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Sangeet Natak Akademi Award)

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, योजना, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संस्कृती राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. (Draupadi Murmu)

महाराष्ट्रातील कलावंतांनी हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, अभंग गायन, अभिनय, पारंपरिक रंगभूमी, लोकनृत्य, नृत्य संशोधन, शहनाई वादन, दिग्दर्शन, नाट्यसंगीत आणि कथक अशा विविध कलाप्रकारांत केलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.

महाराष्ट्रातील कलावंतांचा गौरव

वर्ष २०२४ च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहा कलावंतांचा समावेश आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायनासाठी अरुण कशाळकर, अभंग गायनासाठी आनंद भाटे, अभिनयासाठी अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमीसाठी मुकुंद मराठे, लोकनृत्यासाठी सुभाष नारायण नकाशे आणि नृत्य क्षेत्रातील संशोधनासाठी शुभदा वरदकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्ष २०२५ च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवर कलावंतांना गौरविण्यात आले. शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शनासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि कथक नृत्यासाठी मनीषा साठे यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१९५२ पासून प्रदान करण्यात येणारे संगीत नाटक अकादमी पुरस्कार हे भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहेत. कलाक्षेत्रातील प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण योगदानाची दखल घेत कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्या सर्व कलावंतांचे अभिनंदन करून भारतीय कला आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात कलाकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. कलाकारांच्या साधना व सर्जनशीलतेमुळे भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा