नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान अचानक ३०० फूट खाली जाण्याच्या प्रकरणाने हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या घटनेतील मुख्य वैमानिकाची ‘डॉप टेस्ट’ (सायकोएक्टिव्ह पदार्थांच्या सेवनाबाबतची चाचणी) पॉझिटिव्ह आली असून, त्याने गांजा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर केंद्र सरकारने एअर इंडियाला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासह विमानांच्या देखरेखीमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरी उड्डाण महासंचालनालयाला ‘डॉप टेस्ट’चे नियम अधिक कठोर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (एआय २३७९) ही धाकधूक वाढवणारी घटना घडली. विमान ओडिसावरून जात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. विमानाचे तीन हायड्रोलिक सिस्टीम, दरवाजे आणि एलिव्हेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान अचानक ३०० फूट खाली गेले होते. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकेत-दिल्ली विमानाचा मुख्य वैमानिक वैयक्तिक समस्यांमुळे मानसिक तणावात होता. त्यामुळे त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. मात्र, चाचण्या दरम्यान वैमानिकाची पहिली आणि दुसरी ‘डॉप टेस्ट’ पॉझिटिव्ह आली. या चाचणीत त्याने गांजा घेतल्याचे उघड झाले आहे. सह-विमान कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आता त्या वैमानिकाच्या वर्तनाचीही चौकशी केली जात आहे.
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च ...
मागच्या वर्षी जून महिन्यात अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या अपघाताचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही, त्यातच एअर इंडियाच्या वैमानिकाने नशा केल्याचे समोर आल्याने केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विमानातील तांत्रिक समस्या आणि बिघाडाची चौकशी करण्यासाठी ‘एअरबस’चे एक विशेष पथक आणि फ्रान्सचे विमान नियामक अधिकारी भारतात आले आहेत. त्यांच्यासह 'विमान अपघात तपास विभाग' या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या कारभारावर आणि वैमानिकांच्या सुरक्षा नियमांवर कठोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.





