Tuesday, August 11, 2026

Yeola Paithani : येवला पैठणीचा राष्ट्रीय सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते येवला पैठणीचे टपाल तिकीट प्रकाशित

Yeola Paithani : येवला पैठणीचा राष्ट्रीय सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते येवला पैठणीचे टपाल तिकीट प्रकाशित

Yeola Paithani postage stamp : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या नासिक जिल्ह्यातील येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित १२ व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या (National Handloom Day) कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले.

येवला पैठणी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक

येवला पैठणी ही केवळ साडी ( पैठणी ) नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानली जाते. हातमागावर अत्यंत कौशल्याने आणि बारकाईने विणली जाणारी पैठणी आपल्या पारंपरिक नक्षीकामासाठी देशभर प्रसिद्ध आहे. मोर, कमळ, आसावली, नारळी आणि मुनीया यांसारख्या पारंपरिक नक्षींमुळे येवला पैठणीला (Yeola Paithani) वेगळी ओळख मिळाली आहे. पिढ्यांपिढ्या विणकर आणि कारागिरांनी ही कला जपल्यामुळे आज येवला पैठणी राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.

हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला बळ

येवल्याची ओळख देशाच्या वस्त्रोद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) सातत्याने प्रयत्नशील आहेत. पैठणी हा येवल्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून या उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि विविध घटक जोडलेले आहेत. त्यामुळे पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे केवळ एका पारंपरिक कलेचा विकास नसून हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक स्थैर्याला बळ देणे आहे. त्यामुळे या पारंपरिक उद्योगाला आधुनिक बाजारपेठ, पर्यटन आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

पैठणी पर्यटन केंद्रामुळे नवी ओळख

येवल्यात पैठणी पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या माध्यमातून पर्यटकांना पैठणी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवता यावी, पैठणी निर्मितीचा इतिहास आणि परंपरा समजावी, कारागिरांशी संवाद साधता यावा आणि थेट पैठणी खरेदी करता यावी, यावर भर देण्यात येत आहे. पैठणी पर्यटन केंद्रामुळे येवल्याला केवळ पैठणी खरेदीचे केंद्र म्हणून नव्हे, तर ‘पैठणी नगरी’ म्हणून पर्यटनाच्या नकाशावर विकसित करण्यास मोठी मदत होत आहे. देश-विदेशातील पर्यटक येवल्यात आले, त्यांनी हातमागावर पैठणी तयार होताना पाहिली, कारागिरांशी संवाद साधला आणि थेट पैठणी खरेदी केली, तर त्याचा थेट फायदा विणकर व कारागिरांना होत आहे.

येवला पैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

यासोबतच पैठणी क्लस्टरच्या माध्यमातून विणकरांना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण, डिझाइन विकास, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक पैठणीची ओळख कायम ठेवत आधुनिक ग्राहकांच्या पसंतीनुसार नवीन डिझाइन आणि उत्पादनांना चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट प्रकाशित झाल्याने येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या राष्ट्रीय सन्मानामुळे येवला पैठणीची ओळख देशभरात अधिक बळकट होण्यासोबतच स्थानिक विणकर आणि कारागिरांच्या पारंपरिक कलेलाही नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >