Wednesday, August 12, 2026

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. साईराज बेणारे असे मृत तरुणाचे नाव असून तो उल्हासनगर परिसरात राहत होता. मुंब्रा रेल्वे पुलाजवळ सकाळी सुमारे 6.10 वाजता हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, साईराज लोकलमधून खाली पडून मुंब्रा खाडीच्या दिशेने गेला. तो काही काळ लोखंडी रॉडला अडकला होता. त्यानंतर तो खाडीच्या पात्रात पडला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलीस, मुंब्रा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू वाहनाच्या मदतीने खाडीच्या पात्रातून साईराजचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

साईराज नेमका लोकलमधून कसा पडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सकाळच्या वेळी लोकलमध्ये तुलनेने कमी गर्दी असल्याने तो स्वतःच्या चुकीमुळे पडला की यामागे दुसरे काही कारण होते, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

दरम्यान, परभणीमध्येही रेल्वे रुळावर मृतदेह पडलेला असताना त्याच रुळावरून दुसरी एक्स्प्रेस गेल्याची घटना समोर आली आहे. पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावर गणेश बालाजी या 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. लोको पायलटने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानंतर काही स्थानिक तरुणांनी लाल कापड दाखवून येणारी रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे थांबली नाही आणि ती मृतदेहावरून पुढे गेली. या घटनेवरून रेल्वे व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >