Saturday, August 8, 2026

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी वाढत जावून ९० टक्क्क्यांच्या पुढे जावून पोहोचल्याने पाणीकपात मागे घेण्याची मागणी होत आहे. परंतु आता तलावातील पाणी साठ्याचा आकडा आता उलट्या दिशेने फिरु लागला आहे. ९० टक्क्यांवरून आता पाणी साठा तलाव क्षेत्रांत पाऊस पडत नसल्याने चक्क ८८.५० टक्क्यांवर येवून पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून तलाव क्षेत्रातील पाणी साठ्याचे प्रमाण वाढण्याऐवजी घटत चालले असून अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पाऊस होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच वाढलेला साठा कमी होवून लागल्याने ही भीती अधिक दृढ होत चालली आहे. (Water Storage Declining)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यानुसार अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमध्ये ७ ऑगस्ट २०२६ रोजी १२ लाख ८० हजार ९३१ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे हा पाणीसाठा ८८.५० टक्के एवढा आहे. मागील ३ ऑगस्ट रोजी या ९०.०६ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे चार दिवसांमध्ये दीड टक्का पाणीसाठा कमी झाला आहे. (Water Storage Declining)

विशेष म्हणजे मागील तीन वर्षांच्या तुलनेत ७ ऑगस्ट रोजीचा तलावातील पाणी साठा हा सर्वांत कमी आहे. याच दिवशी सन २०२५मध्ये ८९.१८ टक्के तर सन २०२४मध्ये ९०.२३ टक्के एवढा पाणी साठा होता. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका तुलिफ मिरांडा यांनी विभागात पाणी पुरवठा दुषित होत असून तलावांमध्ये पाणी साठा वाढला आहे, तलाव ओसंडून वाहत आहेत. तर मग लागू करण्यात आलेली पाणी कपात मागे का घेण्यात येत नाही असा सवाल केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पावसामुळे काही भागांमध्ये पाणी गढुळ येत असून हे पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेने केलेले आहे. तसेच अल निनोचे संकट असल्याने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज जरी तलाव भरलेले दिसत असले तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्यास तलावातील पाणी साठा कमी होईल. त्यामुळे १ ऑक्टोबर मध्ये जेवढा पाणी साठा उपलब्ध असेल त्यावर आधारीत पाणी पुरवठ्याची दिशा ठरवून कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला पाणी साठा आता वजावट होवून कमी होत असल्याने भविष्यात पाऊस किती पडतो आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Water Storage Declining)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >