Friday, August 7, 2026

Western Railway : सणासुदीत प्रवास झाला सोपा, पश्चिम रेल्वेने वाढवल्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या

Western Railway : सणासुदीत प्रवास झाला सोपा, पश्चिम रेल्वेने वाढवल्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या

Western Railway : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी (Railway passengers) एक महत्त्वाची बातमी आहे. वाढती गर्दी आणि आरक्षणाचा ताण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (Western Railway ) भुसावळ - दादर आणि साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वे गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने (Western Railway Administration) या दोन महत्त्वाच्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने वाढवल्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या

रेल्वे प्रशासनाकडून (Western Railway Administration) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वेचा परिचालन कालावधी यापूर्वी ३१ जुलैपर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रवाशांचा सातत्याने वाढणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन या गाडीचा कालावधी आता २५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०४९ दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष रेल्वेचाही (Weekly special train) परिचालन कालावधी २५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही दिशांनी मिळून एकूण १६ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ

मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय विशेष दिलासादायक मानला जात आहे. सण, सुट्ट्या तसेच नोकरी, व्यवसाय आणि शासकीय कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आरक्षण मिळवणे सोपे होणार आहे. दरम्यान, राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष रेल्वे ९ आणि १६ ऑगस्ट रोजी धावणार असून, बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष रेल्वे ८ आणि १५ ऑगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण चार अतिरिक्त विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच धावतील. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी आरक्षणाची सुविधा संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याच्या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, सणासुदीच्या काळात हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा