Friday, August 7, 2026

Nashik TCS Case : TCS प्रकरणात मोठी कारवाई ! 'या' नगरसेवकाला अटक

Nashik TCS Case : TCS प्रकरणात मोठी कारवाई ! 'या' नगरसेवकाला अटक

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला स्वतःच्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचा (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून अटक केली आहे. न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंट (NBW) नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मतीन पटेलची आतापर्यंत तीन वेळा चौकशी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली होती. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून अनेक महत्त्वाची माहिती घेण्यात आली असून, तपासासाठी त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे. दरम्यान, नाशिक रोड न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश असूनही मतीन पटेल न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी प्रशासनाने मतीन पटेल यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवत त्याचे घर आणि कार्यालय पाडले होते. तर प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या निदा खानला जुलै महिन्यात जमीन मिळाला होता. या प्रकरणातील आरोपी निदा खान ही गरोदर असल्याने तिला जुलै महिन्यात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ६ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ महिन्यांची गरोदर असलेल्या निदा खानच्या पोटातील बाळाच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करत हा निर्णय दिला होता.

जुलै अखेर पाच आरोपींना जामीन

तर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक सत्र न्यायालयाने जुलै अखेर आणखी पाच आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींमुळे साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि मानसिक छळ यांसारख्या ९ वेगवेगळ्या तक्रारींवर SIT कडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >