मराठवाड्यात समाधानकारक सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचीही चिंता कमी झाली आहे. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यातील तीनशे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जायकवाडी धरण ६७.९९ टक्के भरले असून पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे हजारो गावांसाठी लाभदायक असलेल्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील महिन्याभरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात २५ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला जायकवाडी धरणातील पाणीसाठा संपल्यात जमा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात होती; परंतु जुलै महिन्यात नाशिकसह गोदावरीच्या वरील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यामुळे पिकांना देखील नवसंजीवनी मिळाली आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली निर्भत्सना मुंबई : परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी, काँग्रेस आणि संजय राऊत यांनी संसदेतून ...
पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. गेल्या आठ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. अलीकडच्या पावसामुळे मराठवाड्यातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात २४ तासांत ८९ मंडळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३७, जालना जिल्ह्यातील २४ आणि बीड जिल्ह्यातील २८ मंडळांचा यामध्ये समावेश आहे. या तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असल्याने आगामी काळातील पर्जन्यमानावर धरणांमध्ये जमणारा जलसाठा आणि पाणीसाठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भावसिंगपुरा, बालानगर, लोहगाव, पाचोड, विहामांडवा, गाजगाव, आसेगाव, सिद्धनाथ, वडगाव, करंजखेड, नाचनवेल, जरंडी, बनोटी या ठिकाणी दहा मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस झाला, तर बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, गेवराई, धोंडराई, गंगामसला, नांदुर घाट, हनुमंत पिंपरी, केज, नागापूर या ठिकाणी देखील जवळपास १५ मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाला. त्यापैकी नांदूरघाट येथे सर्वाधिक ३० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात ४.२ तसेच जाफराबाद ३.९, जालना २.२, अंबड ४.८, परतुर २.८, बदनापूर १.६, घनसांगवी ३.८ आणि मंठा ०.९ मिलिमीटर पाऊस गेल्या २४ तासांत झाला. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागली जाणार आहे. याबरोबरच या धरणातून जवळपास ३०० गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जायकवाडी धरणात उपलब्ध झाला आहे.
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता, ...
नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत. पिकांना जीवदान मिळाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार नाही हे मात्र निश्चित आहे. लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू आहे. एकंदरीत मराठवाड्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक मानली जात आहे. शेतकरी समाधानी असून खरीप हंगामासाठी सिंचनाची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता पाण्याची आवक वाढल्यास संपूर्ण मराठवाड्याची चिंता मात्र नक्कीच मिटणार आहे.
नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७ वर्षीय होतकरू महिला क्रिकेटपटूने ...
संपूर्ण मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे. नांदेड व लातूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर हिंगोली, परभणी, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारपर्यंत नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला मराठवाड्यातील पिकांबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्यमान शेती आणि पिकांवर अवलंबून असते. निसर्गाने कृपा केली तर शेतकरी ताठ मानेने जगू शकतो; परंतु निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकऱ्यांच्या हातातील पिके निघून जातात. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेवर त्याचा परिणाम होतो. अलीकडच्या वातावरणामुळे तसेच पावसामुळे मराठवाड्यातील पिके तरारली आहेत. सध्याच्या परिस्थितीला तरी पिकांसाठी आवश्यक असलेला पाऊस पडलेला असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी समाधानी आहे. पावसामुळे पिकांना जीवदान तर मिळाले पण आणखी मोठा पाऊस झाला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटणार आहे. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही भविष्यातील पावसामुळे सुटू शकतो.






