दी लेडी बॉस-अर्चना सोंडे
आज ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ ही संकल्पना सर्वश्रुत झाली आहे. मात्र जगाला या पद्धतीची सवय होण्याच्या कित्येक वर्षांपूर्वी एका भारतीय महिलेने या संकल्पनेवर विश्वास ठेवत स्वतःचा व्यवसाय उभा केला होता. केवळ २५ हजार रुपयांच्या भांडवलावर घरातून सुरू झालेला तिचा हा प्रवास भांडवलाच्या हजारपट पोहोचला आहे. ही कहाणी आहे श्वेता जैन सन्याल यांची.
२००९ मध्ये त्यांनी कोलकाता येथून ‘कनेक्शन्स’ ही रिक्रूटमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. सुरुवातीला ना मोठे कार्यालय, ना कर्मचारी, ना मोठी गुंतवणूक. फक्त एक डेस्कटॉप संगणक, एक मोबाईल फोन आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास. आज त्यांची कंपनी देशभरातील नामांकित एफएमसीजी, एफएमसीडी, उत्पादन उद्योग, बँकिंग, वित्तीय संस्था आणि नव्या युगातील स्टार्टअप्ससाठी वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांची भरती करते. कंपनीची उलाढाल काही कोटी रुपये इतकी झाली. श्वेताचा जन्म आणि शिक्षण झारखंडमधील हजारीबाग या छोट्याशा शहरात झाले. रांचीपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. सेंट झेवियर्स स्कूलमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने विनोबा भावे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात बी. ए. आणि एम. ए. केले. लग्नानंतर नोकरी सांभाळत श्वेताने दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए पूर्ण केले. शिक्षण आणि करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्याचा तिचा निर्धार पुढे तिच्या यशाचा पाया ठरला. २००४ मध्ये श्वेताचा विवाह मनुष्यबळ क्षेत्रातील व्यावसायिक ब्रंतिंद्र सन्याल यांच्याशी झाला. लग्नानंतर श्वेता मुंबईत स्थायिक झाली. सुरुवातीला तिने सिटीकॉर्पमध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. २००६ मध्ये तिने एका छोट्या एचआर आणि रिक्रूटमेंट कन्सल्टन्सीत काम सुरू केले. काही महिन्यांतच पतीच्या नोकरीमुळे तिला हैदराबादला स्थलांतर करावे लागले. तिथे श्वेताने टाइम्स जॉब्समध्ये रिक्रूटर म्हणून काम केले. कर्मचाऱ्यांची निवड आणि भरती या क्षेत्रातील तिचा अनुभव इथे अधिक समृद्ध झाला. २००७ मध्ये पुन्हा कोलकाताला स्थलांतर झाले. तिथे तिने जागतिक दर्जाच्या रिक्रूटमेंट कंपनी असलेल्या अडेकोमध्ये काम करत उद्योगातील बारकावे जवळून अनुभवले.
२००८ मध्ये श्वेता यांनी नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी करताना तिने अनेक कंपन्यांशी व्यावसायिक संबंध निर्माण केले होते. स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी तिने काही ग्राहकांशी चर्चा केली. जर मी उत्तम दर्जाचे उमेदवार उपलब्ध करून दिले, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नाला व्यावसायिक कंपन्यांकडून सकारात्मक उत्तर मिळाले. २००९ मध्ये श्वेताने अवघ्या २५ हजार रुपयांत ‘कनेक्शन्स’ची स्थापना केली. ही संपूर्ण रक्कम तिने ‘नोकरी डॉट कॉम’च्या डेटाबेसचे सदस्यत्व घेण्यासाठी खर्च केली. सुरुवातीला श्वेताकडे स्वतःचे कार्यालय नव्हते. आपल्या बेडरूममधूनच तिने काम सुरू केले. एक डेस्कटॉप, एक मोबाईल आणि स्वतःची मेहनत एवढीच तिची संपत्ती होती. आज अनेक कंपन्या घरून काम करण्याची सुविधा देतात. पण श्वेताने ही कल्पना २००९ मध्येच स्वीकारली होती. तिच्या मते, प्रत्येक कामासाठी कार्यालयात बसणे आवश्यक नसते. याच विचारातून तिने घरातून काम करणाऱ्या महिलांचे नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली. विशेषतः अशा महिला, ज्यांना मुलांची किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळत करिअर करायचे होते, त्यांच्यासाठी तिने लवचिक कामाची संधी निर्माण केली. कोरोनाच्या कित्येक वर्षांपूर्वीच तिने प्रत्यक्षात 'वर्क फ्रॉम एनीव्हेअर' मॉडेल यशस्वी करून दाखवले. आज श्वेताच्या कंपनीत ११ पूर्णवेळ कर्मचारी आणि १८ फ्रीलान्सर कार्यरत आहेत. ऑफिस नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक ग्राहक साशंक होते. काही कंपन्यांनी तर काम देण्यापूर्वी श्वेताच्या कार्यालयाची पाहणी करण्याची अट घातली होती. मात्र, श्वेताने दर्जेदार सेवा आणि योग्य उमेदवार उपलब्ध करून देत ग्राहकांचा विश्वास जिंकला. कोका-कोला आणि इमर्सन या दोन कंपन्यांपासून सुरू झालेला प्रवास हळूहळू विस्तारत गेला. आज तिच्या ग्राहकांमध्ये अनेक मोठ्या भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षी कंपनीचा महसूल ५.७५ लाख रुपये होता. त्यानंतर दरवर्षी व्यवसाय वाढत गेला आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कंपनीची उलाढाल २.५० कोटी रुपये झाली. आज तिची कंपनी पूर्णपणे नफा कमावणारी कंपनी आहे. तिच्या व्यवसायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. कंपन्यांकडूनच नियुक्तीच्या पदानुसार शुल्क आकारले जाते. ज्युनियर पदांसाठी एका महिन्याच्या पगाराइतके शुल्क, तर वरिष्ठ पदांसाठी वार्षिक सीटीसीच्या १० ते १८ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. आजही वरिष्ठ पदांसाठीचे उमेदवार श्वेता स्वतःच तपासते. ती उमेदवारांशी झूमवर संवाद साधते. आवश्यक वाटल्यास प्रत्यक्ष भेटही घेते. २०१३ मध्ये मुलगी ताशिका आणि २०१५ मध्ये मुलगा शौर्य यांच्या जन्मानंतर काही काळ श्वेताला व्यवसाय आणि कुटुंब यांच्यात समतोल साधावा लागला. मात्र, २०१७ पासून तिने पुन्हा पूर्ण क्षमतेने व्यवसायात लक्ष घातले. आज श्वेता यशस्वी उद्योजिका, आई आणि प्रेरणादायी नेतृत्वाचे उदाहरण बनली आहे. २०२० पासून ‘कनेक्शन्स’ने ‘लेट्स टॉक टॅलेंट’ हे डिजिटल एचआर न्यूजलेटर सुरू केले. एचआर क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे अनुभव आणि विचार यात प्रकाशित केले जातात. आजपर्यंत या न्यूजलेटरच्या १३ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘कनेक्शन्स’ने आतापर्यंत देशभरात १ हजारांहून अधिक मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील नियुक्त्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. श्वेतासाठी हा केवळ व्यवसाय नाही, तर लोकांच्या करिअरला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आहे.
श्वेताचा उद्योजकीय प्रवास सांगतो की मोठे कार्यालय, मोठी गुंतवणूक किंवा मोठा वारसा नसला तरी मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस असावे लागते. घरातील एका खोलीतून सुरू झालेला व्यवसाय आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो आहे. त्यामागे आहे सातत्य, गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या काळाची अचूक ओळख. एका छोट्या शहरातील मुलीने केवळ स्वतःचे भविष्यच घडवले नाही, तर शेकडो महिलांना घरबसल्या करिअरची नवी संधी उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थाने, श्वेता जैन सन्यालची ही कहाणी म्हणजे दूरदृष्टी, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उभ्या राहिलेल्या यशस्वी उद्योजकतेची प्रेरणादायी गाथा आहे.






