Wednesday, July 15, 2026

कातरवेळ

कातरवेळ

माेरपीस-पूजा काळे

 

असेल काळाहाती मरणे, परि आमुच्या हाती जगणे. काळा एवढा उत्तम शिक्षक विरळचं असावा. सामान्यतः आयुष्यात खुणा पेरत आलेली सांजवेळ अटळ आणि अढळ असल्याने तिला न नाकारता झेलत स्वीकारणाचा पर्याय उत्तमचं मानावा लागेल. अर्थात परमेश्वर एकावेळी एकच सण देतो, तर दुसरा देण्यापूर्वी पहिला सण काढून घेतो असंच काहीसं कातर वेळेबाबत आहे. दिवसभर इथं तिथं नाचणाऱ्या, भुकेलेल्या, तहानलेल्या श्रमिकांच्या सावल्या सांजेच्या अंधारात गुडूप होतात, अंतर्मनात शोक निर्माण होतो, चर्र अशी उरातली धडधड, काळोख्या रात्रीला स्वच्छंदी स्वप्नांना आपल्या कुशीत घेऊन, कुणासाठी न थांबणारी तिन्हीसांज परतायला आतूर असते. पहाटेच्या प्रहरी आभाळ भरून येतं स्वप्नांनी. या स्वप्निल वाटेवर धावणं सोपं नसलं तरी हिंमत करून महत्त्वाकांक्षा उंची गाठते. इच्छापूर्तीचा व्यासंग निर्विघ्नपणे पार पडतो. पावलांना जोर चढतो. मी कोण? तू कोण? यात न पडता सिद्धी पूर्ततेसाठी जो तो झटतो अन् कामाच्या व्यापात झोकून देतो स्वत:ला. पोटासाठी कामाचं व्यसनचं जडतं. वेळेनुसार कामाची गणितं पाळली जातात. श्रमाला विश्रांतीची गरज असल्याने सायंकाळी घर खुणावू लागतं. प्रपंचाचे दरवाजे बोलावू लागतात, कुटुंबाचं सुख डोळ्यांसमोर तरळू लागतं. कामाच्या व्यतिरिक्त कक्षेबाहेर केलेला विचार सांजवेळी मनात येतो. मनुष्यगण पशूपक्ष्यांच्या परतीच्या वेळा नियमित असल्याने आसमंतास वेळेची चाहूल लागते आणि शांत शांत पावलांनी कावऱ्या बावऱ्या उदासवाण्या चित्ताने चालत येते कातरवेळ!

क्षितीजावर केंद्रित झालेले धुंद मन अंतर्मनात आठवणी घेऊन व्याकुळ होते. काही स्वप्न पूर्णत्वास जातात, आनंद देतात, तर काही मनोदशेतल्या मैलांचे अंतर कापत अदृश्य सीमारेषेला स्पर्श करतात. वेळ सरल्याची ही ओढ कुठून येते? रम्य पहाटेला खुणावणारी सांजवेळ का थरथरते? काय मागणं असतं तिचं? हृदयाजवळचा निनावी शोध सुटत नाही. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको, यातायात संपत नाही. तिथं पोहोचेस्तोवर कुणाचे पडसाद नसतात, ना कुणाचा मागमूस ना सीमेवर पोहोचण्याचं समाधान असतं. मोकळं रान, डांबरी रस्ते, सुसाट वळती घराकडे, कातरवेळी मन हुरहुरते वेग घेई वाटेकडे. वाईट साईट विचारी इंगळ्यांचे डसणारे वेदनादायी सूर लागता, घायाळ अवस्थेतील जेरबंद व्याकुळल्या मनाला आवरण्याची आणि आवरलेल्या भाव भावनांना सावरण्याची साधून आलेली वेळ कातरवेळ होऊ पाहते. नि:शब्द जड पावलांनी संध्या येऊ लागता, सांजदिशा मंदगतीने अंधारू लागतात. पलीकडे क्षितीजावरच्या साध्या बहुसंख्य रेषा मावळत्या रंगांनी भरून आलेल्या असताना त्याकडे पाहताच गलबलून उठतं, वातावरणात भरलेली जगावेगळी ओढ नकळत खेचत राहते. आभाळातून कुणीतरी आर्त साद घालावी आणि त्या हृदयस्पर्शी हाकेला आपण प्रतिसाद द्यावा पण तो तिथपर्यंत पोहोचू नये अशी केविलवाणी अवस्था होते. त्या वेळची मनातली कालवाकालव अन् जीवाची घालमेल म्हणजे कातरवेळ असते.

प्रकाशाकडून अंधाराच्या वाटेवर एका दृष्टिक्षेपात मावणारं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य, रंगबिरंगी रानफुलं, वाऱ्याच्या झोतावर मुरडणारी नाजूक लवलवती पाती, डेरेदार वृक्षावर संसार थाटलेली पाखरं, शहरात, वस्त्यांवर, आडमुठ्या वळणाशी दोन पायांवर चालणारी आया बाया, मुलं, माणसं धूसर होतात. केवळ अस्तित्वाचे भास मानत राहायचे. समयी घटिकेचे अंधाराला एकचं मागणे असते की, हे मळभ दूर सार आणि प्रकाशास अधिक तेजोमय कर. पूर्ण दिवसात तसूभरही बदल झाला नसल्याने निरागस झाडं, पानं, फुलं उदास वाटतात. सारा आसमंत निपचित पडल्यासारखा भासतो. माणसांचे थवेच्या थवे रस्त्यावर आक्रमण करतात. पांथस्थ होतात. निर्मितीला रंगाचे धुमारे फुटत नाहीत. फुलांचा रंगगंधाचा मोह सरतो. सुगंधी दरवळ वाऱ्याला मोहवत नाही, सारं असूनही मन कशात रमत नाही. बोलघेवड्या अबोलतेला कवच फोडता येत नसल्याने आठवणींनी मन गाभारा भरून येतो. अधूरेपणाची सल कातरत जाते. दारामागचा आक्रोश ऐकू न आल्याने, मनाची कवाडं मिटली जातात अन् परतीच्या प्रवासात सोबत करणारी कुणाची तरी आठवण बैचेन करते. डोळ्यांदेखत विरत जाणारी कृष्णधवल रंगीत दिवास्वप्नांची लकेर तरंग उठवत नाही. मन सैरभैर करणारी कातरवेळचं असते. अस्तित्वाचे सारे रंग होती गगनात दंग, हा कातरवेळचा खेळ चाले मनात जनात. कुणीतरी म्हटलेल आहेच की, आतल्या आत शब्दाचा भार आसवांचा पाऊस, झाकोळलेल्या आशा अपेक्षा सारं काही नि:शब्द, निपचित तरी कवाडावरची थाप तसंच बंद दारावरची टकटक ऐकण्यासाठी मनाच्या सांदी कोपऱ्यात अधिक आतूर अधिरलेली संवेदना वाट पाहत असते. ही टकटक नुसत्या आवाजावरून ओळखता येते. प्रतीक्षेची पूर्तता होणं अथवा न होणं ही त्या टकटकीची चाहूल सांगते. आज जानेकी जीद ना करो म्हणणारी सांज कातरवेळ मनपूर्तीचं समाधान देताना कधी खुलते, तर कधी प्रतीक्षेची नुसती हुरहूर लावून जाते. खत्म नहीं होती कुछ बातें कुछ मुलाकाते. खत्म नहीं होते कुछ अच्छे पल, कुछ खुशिया. खत्म नहीं होती कुछ गलिया कुछ शाम के अंधियारे पल... खत्म नहीं होते... खत्म नहीं होते...!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा